ग्रीन फटाके काय असतात, ते किती परिणामकारक असतात?

बेरियम आणि तत्सम रसायनांपासून तयार झालेल्या फटाक्यांवर सर्वोच्च न्यायलयाने बंदी घातली आहे. ही बंदी फक्त दिल्लीत लागू न होता संपूर्ण देशात लागू होईल, असं न्यायालयाने म्हटलं आहे.
 
दिवाळीच्या काळात ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी व्हावं या उद्देशाने सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले होते.
 
मुंबई हायकोर्टानेही मुंबईत संध्याकाळी फक्त 8 ते 10 फटाके उडवण्याची परवानगी दिली होती. राज्यातल्या इतर शहरातही फटाके उडवण्यावर निर्बंध होते. पण प्रत्यक्षात मात्र या नियमांची अंमलबजावणी झाली नाही.
 
दिवाळीत फटाके फोडण्याचा मोह अनेकांना आवरतच नाही, मग त्यासाठी कित्तीही निर्बंध घाला आणि प्रदूषणाची चिंता व्यक्त करा. कोर्टांनी वारंवार सांगूनही फटाक्यांना हवा तसा आळा घालणं कधीच शक्य झालेलं नाही.
 
लक्ष्मीपूजनाच्या रात्री मुंबईसह राज्यातल्या अनेक भागात रात्री उशीरापर्यंत फटाके वाजत होते.
 
फटाक्यांनी होणाऱ्या प्रदुषणावर ग्रीन म्हणजेच हरित फटाके उपाय असू शकतात असं कोर्टाने म्हटलं होतं. पण काय असतात हे ग्रीन फटाके आणि ते किती परिणामकारक असतात जाणून घेऊया.
 
राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेनं (NEERI) हरित स्वरुपाच्या फटाक्यांचा शोध लावला आहे. हे फटके पारंपारिक फटाक्यांप्रमाणेच असतात. दिल्लीतली NEERI ही संस्था वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (CSIR) अखत्यारीत येते.
 
इकोफ्रेंडली फटाक्यांचा आकार, आवाज आणि प्रकाश हा सामान्य फटाक्यांसारखाच असतो. फक्त त्यामुळे प्रदूषण कमी होतं.
 
NEERIच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. साधना रायलू सांगतात, "इकोफ्रेंडली फटाक्यांपासून कमी प्रमाणात हानिकारक गॅस निर्माण होतो म्हणजे सामान्य फटाक्यांपेक्षा 40 ते 50 टक्के कमी. याचा अर्थ असा नाही की, या प्रदूषणावर पूर्णपणे ताबा मिळवता येईल. पण हे फटाके कमी हानिकारक असतील."
 
ग्रीन फटके फोडले तर वातावरणात मिसळणाऱ्या PM कणांमध्येहील 25 टक्क्यांपर्यंत घट होते असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
 
सामान्य फटाके फोडल्याने मोठ्या प्रमाणात नायट्रोजन आणि सल्फर गॅस तयार होतो. अशा गॅसचं प्रमाण कमी करणं हा या संशोधनाचा उद्देश होता, असं त्या पुढे सांगतात.
 
इको फ्रेंडली फटाक्यातले घटक हे सामान्य फटाक्यांतील घटकांपेक्षा वेगळे असतात. NEERIने त्यांची वेगळी रासायनिक सूत्रं बनवली आहेत.
 
हरित फटाक्यांचे प्रकार
पाण्याचे कण तयार करणारे फटाके
 
या प्रकारचे फटाके फोडल्यावर त्यातून पाण्याचे कण तयार होतील. त्यामध्ये नायट्रोजन आणि सल्फर गॅस मिसळले जातील. NEERIने याला Safe Water Releaser असं नाव दिलं आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी हे फटाके अधिक प्रभावी ठरणार आहेत.
 
सल्फर आणि नायट्रोजन कमी करणारे फटाके
 
NEERIने या फटाक्यांना STAR फटाके असं नाव दिलं आहे. यामध्ये ऑक्सिडायझिंग एजंटचा उपयोग केला जातो. ते जाळल्यानंतर कमी प्रमाणात नायट्रोजन आणि सल्फर तयार होतो.
 
अॅल्युमिनियमचा कमी वापर
 
या फटाक्यांमध्ये 50 ते 60 टक्के अॅल्युमिनियम कमी वापरलं जातं. याला Safe Minimal Aluminium म्हणजे SAFAL असं नाव दिलं आहे.
 
सुगंधी फटाके
 
या फटाक्यांतून केवळ हानिकारक गॅस कमी होणार नाहीत. हे फटाके फोडल्यानंतर एक छानसा सुगंध येईल.
 
ग्रीन फटाक्यांचा जन्म कसा झाला?
2018 साली एका जनहित याचिकेवर निकाल देताना सुप्रीम कोर्टाने विषारी आणि गोंगाट करणाऱ्या फटाक्यांवर बंदी घातली. त्यावेळी कोर्टाने म्हटलं की ‘हरित किंवा कमी प्रदूषण करणाऱ्या’ फटाक्यांचा वापर केला पाहिजे.
 
त्यानंतर भारतात ग्रीन फटाक्यांच्या संकल्पनेवर काम सुरू झालं. 2019 साली सुप्रीम कोर्टाने या प्रकारच्या फटाक्यांच्या घाऊक उत्पादनाला परवानगी दिली. तसंच औद्योगिक संशोधन परिषदेला निर्देश दिले की हे फटाके बाजारपेठांमध्ये उपलब्ध होतील हे पाहावे.
 
यानंतर औद्योगिक संशोधन परिषदेने 230 कंपन्यांची पडताळणी करून त्यांना ग्रीन फटाक्यांच्या उत्पादनांची, विक्रीची आणि साठवणुकीची परवानगी दिली.
 
ग्रीन फटाके किती परिणामकारक?
पण ग्रीन फटाके हे पूर्णपणे पर्यावरण स्नेही आहेत असं तज्ज्ञांना वाटत नाही. ग्रीन फटक्यांमुळे वातावरणात मिसळणाऱ्या PM कणांमध्येही 25 ते 30 टक्क्यांपर्यंत घट होत असली तर प्रदूषण पूर्णपणे थांबत नाही. खूप मोठ्या प्रमाणात ग्रीन फटाके फोडले तर प्रदूषण होणार आहेच.
 
दुसरं म्हणजे ग्रीन फटाके बनवण्याची आणि विकण्याची परवानगी काही ठराविक कंपन्यांना आहे. त्यामुळे ते देशातल्या प्रत्येक लहान मोठ्या शहरात, गावात उपलब्ध असतीलच असं नाही. तसंच त्यांची किंमतही इतर फटाक्यांपेक्षा जास्त असल्यामुळे लोक स्वस्तातले रासायनिक फटाके खरेदी करण्याची शक्यता जास्त आहे.
 
त्यामुळे अनेकांना ग्रीन फटाक्यांच्या परिणामकारकतेबाबत साशंकता आहे.
 
त्यामुळे यावेळी तुम्हालाही प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करायची असेल तर फटाक्यांऐवजी दिवे उजळण्यावर भर द्या.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती