दिल्लीत सीएए वरून हिंसाचार, एका पोलिसासह इतर तीन ठार

मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020 (10:20 IST)
सुधारित नागरिकत्व कायद्यावरून (सीएए) ईशान्य दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी हिंसाचार उसळला. त्यात एका पोलिसासह इतर तीन नागरिकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले. विशेष म्हणजे भारत दौऱ्यावर
आलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दिल्लीत पोहोचण्याच्या काही तास आधी हिंसाचार भडकला. 
 
दिल्लीतील जाफराबाद, मौजपूर भागात सुधारित नागरिकत्व कायद्याचे विरोधक आणि समर्थक सलग दुसऱ्या दिवशी आमने-सामने आले. त्यांनी एकमेकांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यानंतर रस्त्यांवरील वाहने, आसपासच्या घरांना तसेच, गोदाम-दुकाने यांनाही आग लावण्यात आली. एका तरुणाने पोलिसांवर पिस्तूल रोखून धरले आणि नंतर हवेत गोळीबार केला. या हिंसाचारात रतन लाल या पोलीस हवालदारासह तीन नागरिकांचा मृत्यू झाला. हिंसाचारात पोलीस उपायुक्तासह किमान दहा पोलीस जखमी झाले.
 
हिंसाचार नियंत्रणात आणण्यासाठी निमलष्करी जवान तनात करण्यात आले. पोलिसांनी अश्रुधुरांच्या कांडय़ा फोडून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. या भागात जमावबंदी लागू करण्यात आली असून, मेट्रो रेल्वे स्थानकेही बंद करण्यात आली आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती