उत्तरकाशी : मजुरांच्या सुटकेसाठी आता मॅन्युअल ड्रिलिंग, नेमकं कसं केलं जातं हे ड्रिलिंग?

मंगळवार, 28 नोव्हेंबर 2023 (15:10 IST)
उत्तरकाशी जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 50 किमी अंतरावर असलेल्या सिलक्यारा येथील यमुनोत्री महामार्गावर निर्माणाधीन बोगद्यात भूस्खलन झाल्यामुळे 12 नोव्हेंबरपासून अडकलेल्या 41 कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी 16 दिवसांपासून मदतकार्य सुरू आहे.
 
या बचाव मोहिमेच्या 16 व्या दिवशी बोगद्याच्या आतील ऑगर मशीनसह काम थांबवण्यात आलं असून, मजुरांकडून मॅन्युअल खोदकाम सुरू करण्यात आलं आहे.
 
मॅन्युअल मोहीम 24 तास सुरू राहण्याची अपेक्षा आहे. या मोहिमेत 24 मजुरांचा सहभाग आहे.
 
सिलक्यारा बोगदा बांधणारी संस्था, नॅशनल हायवे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएचआयडीसीएल) चे व्यवस्थापकीय संचालक महमूद अहमद यांनी सांगितलं की, "सिलक्याराच्या बाजूचे ढिगारे भेदून पोलादी पाईप्सच्या सहाय्याने एक्झिट बोगदा बांधण्याचं काम सुरू होतं, त्यातील अडथळे दूर करुन आता मॅन्युअल ड्रिलिंगचं काम सुरू झालं आहे."
 
याबाबत माहिती देताना ते म्हणाले, "आतापर्यंत ऑगर मशीनने ड्रिलिंग केलं जात होतं, आता मॅन्युअल ड्रिलिंगद्वारेच बचाव कार्य पूर्ण केलं जाईल."
 
सोमवारी ( 27 नोव्हेंबर) सायंकाळी उशिरा या कारवाईबाबत माहिती देताना ते म्हणाले, "शुक्रवारी रात्री बोगद्याच्या ढिगाऱ्यात दबलेल्या लोखंडी गर्डरमध्ये मशीनचा मोठा भाग अडकला.
 
यानंतर काम थांबवावं लागलं. आता हा भाग कापून वेगळा करण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळी 7.45 वाजेपर्यंत, 800 मिमी पाईप मॅन्युअल ड्रिलिंगद्वारे 0.9 मीटर आत पुश केलं."
 
दरम्यान, सिलक्यारा बोगदा बचाव कार्याविषयी मंगळवारी (28 नोव्हेंबर) सकाळी माहिती देताना उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले,
 
"सर्व अभियंते, तज्ज्ञ आणि इतर सर्व शक्तीनिशी काम करत आहेत. आत्तापर्यंत पाईप 52 मीटर आत गेला आहे. ज्या पद्धतीने काम सुरू आहे, आम्हाला आशा आहे की लवकरच ब्रेकथ्रू होईल. पाइप आत जाताच अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. सर्व मजूर ठीक आहेत "
 
पुढे धामी सांगतात की, "जवळजवळ 52 मीटर कार्य पूर्ण झाले आहे. (पाईप टाकले आहे). 57 मीटरच्या आसपास एक ब्रेकथ्रू होईल अशी अपेक्षा आहे. माझ्या समोरच 1 मीटर पाईप ढकलले गेले होते, जर 2 मीटर आणखीन ढकलले तर ते सुमारे 54 मीटर आत जाईल. त्यानंतर, आणखी एक पाईप वापरला जाईल. पूर्वी स्टील गर्डर ढीगाऱ्यात सापडले होते ते आता कमी झाले आहे. आत्ता आम्हाला काँक्रीट जास्त सापडत आहे, ते कटरने कापले जात आहे."
 
रॅट मायनिंग तंत्रज्ञानाचा वापर
सोमवारी संध्याकाळी मदत मोहिमेचे नोडल अधिकारी डॉ. नीरज खैरवाल म्हणाले, "पाईपमध्ये अडकलेल्या ऑगर मशीनचे ब्लेड आणि शाफ्ट कापण्याचं काम पूर्ण झालं आहे आणि ऑगर मशीनचे हेड देखील कापून काढण्यात आलं."
 
मॅन्युअल मोहिमेची माहिती देताना नीरज खैरवाल म्हणाले, " रॅट मायनिंग टेक्नॉलॉजीशी संबंधित टीम मॅन्युअल कटिंगसाठी सिलक्यारा बोगद्यावर पोहोचली आहे. याशिवाय सीवर लाईनमध्ये काम करणाऱ्या कामगारांनाही दिल्लीहून बोलावण्यात आलं आहे."
 
त्यांनी सांगितलं की, "या दोन्ही लोकांना अरुंद जागा आणि प्रतिकूल परिस्थितीत काम करण्याची सवय आहे. हे काम रॅट मायनिंग तंत्रज्ञानाद्वारे केलं जाणार आहे. रॅट मायनर्स प्लाझ्मा आणि लेझर कटरच्या सहाय्याने पुढे एक मार्ग तयार करतील आणि मागून, 800 मिमी व्यासाचे पाईप ऑगर मशीनने आत ढकलले जातील."
 
नीरज खैरवाल यांच्या मते, "सध्या बोगद्याच्या मुख्य प्रवेशद्वारापासून म्हणजेच सिलक्यारा बोगद्यात जिथं पर्यंत पाइप पोहचला आहे, तिथून मजुरांचं अंतर केवळ 10 ते 12 मीटर आहे."
 
त्यांनी सांगितलं, या योजनेंतर्गत, " रॅट खाण कामगार हँड टूल्स वापरून ढीगारा उपसून काढत बोगदा बनवण्याचं काम करतील. जेव्हा ते एक ते दोन मीटर माती काढून टाकतील, तेव्हा त्यामध्ये पाईप टाकणाऱ्या ऑगर मशीनचा वापर करून मागून दुसरा पाइप आत ढकलला जाईल."
बोगद्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा असल्याच्या शक्यतेवर नीरज खैरवाल म्हणाले, " हे काम सहजतेनं होईल, अशी अपेक्षा आहे. जर तेथे लोखंडी रॉड, लोखंडी जाळी किंवा पुढे कोणताही अडथळा असेल तर खाण कामगार हे अडथळे प्लाझ्मा कटर किंवा लेझर कटरने कापून पुढील मार्ग तयार करतील."
 
ते म्हणाले, "तीन-चार दिवसांत हे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. काही कारणास्तव 800 मिमी व्यासाचा पाइप पुढे ढकलण्यात अडथळा निर्माण झाल्यास 700 मिमी व्यासाच्या पाइप लावण्याचे प्रयत्न केले जातील."
 
नीरज खैरवाल पुढे म्हणाले,बोगद्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून (सिलक्याराच्या बाजूने) कामगारांना बाहेर काढण्यासाठी, स्टील पाईप्स ढकलून अंदाजे 49 मीटर लांबीचा एक्झिट बोगदा तयार करण्यात आला आहे. सात ते दहा मीटरचं काम बाकी आहे.
 
उभं आणि आडव्या ड्रिलिंगवर लक्ष
कामगारांना वाचवण्यासाठी रविवारपासून (26 नोव्हेंबर) उभ्या आणि आडव्या ड्रिलिंगचं काम सुरू आहे.
 
21 नोव्हेंबरपासून रखडलेल्या बोगद्याच्या वर उभं ड्रिलिंगद्वारे रेस्क्यू बोगदा तयार करण्याच्या योजनेवर काम देखील सुरू झालं आहे.
 
सतलज जल विद्युत निगम लिमिटेडने (SJVSL ) त्यावर काम सुरू केले आहे.
 
NHIDCLचे व्यवस्थापकीय संचालक महमूद अहमद म्हणाले, "सोमवारी सायंकाळी 7.30 वाजेपर्यंत 36 मीटर ड्रिलिंग करण्यात आलं आहे. कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी एकूण 86 ते 88 मीटर ड्रिलिंग करावं लागणार असून, त्यासाठी सुमारे चार दिवस लागण्याची शक्यता आहे.
 
बोगद्यात ऑगर मशिन अडकल्याने बचावकार्याच्या प्रगतीबाबत शनिवारी सायंकाळपर्यंत शंका होती.अशा परिस्थितीत अधिकाऱ्यांनी रविवारी (26 नोव्हेंबर) सकाळी तज्ज्ञांसोबत बैठक घेऊन व्हर्टिकल ड्रिलिंगचा निर्णय घेतला.
 
महमूद अहमद म्हणाले, "सामान्यपणे एवढ्या ड्रिलिंगसाठी 60 ते 70 तास लागतात, परंतु एका पाईप ड्रिलरने पूर्ण ड्रिलिंग शक्य नाही. इतर पाईप ड्रिलर्सचा देखील वापर केला जाईल."
 
बरकोट टोकापासून बोगदा बांधणी
NHIDCLचे व्यवस्थापकीय संचालक महमूद अहमद म्हणाले, "एजन्सी बरकोट टोकापासून (बोगद्याचं दुसरं प्रवेशद्वार) बोगदा बांधण्याच्या पर्यायावर काम करत आहेत. DHDC बरकोट टोकापासून एक अत्यंत लहान (मायक्रो) बोगदा बांधत आहे. त्यात 300 मीटरपेक्षा जास्त लांबीचा लहान बोगदा बांधण्यात येणार आहे.
 
ते म्हणाले, "त्यात ब्लास्टिंग केलं जात आहे आणि ब्लास्टिंग करुन फोडलेले दगड हे नंतर हटवले जात आहेत. बोगदा सुरक्षित केल्यानंतर आत जाता येईल. आतापर्यंत येथे 12 मीटरचा बोगदा बांधण्यात आला आहे, परंतु या टोकापासून कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी 25 दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागणार आहे."
 
त्यासाठी मुख्य बोगद्यात अडकलेल्या कामगारांपर्यंत बोगद्याच्या उजव्या टोकापासून आडवे (हॉरिझॉन्टल) ड्रिलिंग करून पोहोचले जाईल.
 
महमूद अहमद म्हणाले, "हे काम आरव्हीएनएलकडे सोपवण्यात आलं आहे. त्यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठी मुख्य बोगद्यापासून 180 मीटर अंतरावर आडवं ड्रिलिंग करावं लागेल. त्यासाठीची उपकरणं आली आहेत."
 
अहमद पुढे सांगतात की, "त्यासाठी काँक्रिट बेस तयार केला जात आहे. हे ड्रिलिंग मंगळवारपासून (28 नोव्हेंबर) सुरु करण्याचं उद्दिष्ट आहे. या खोदकामासाठी 15 दिवसांचा कालावधी ठेवण्यात आला आहे."
 
डॉक्टरांचं पथक मजुरांच्या सतत संपर्कात
उत्तरकाशी बोगदा बचाव दलात डॉक्टरांचाही मोठा वाटा आहे. बोगद्यात अडकलेल्या कामगारांशी डॉक्टर सतत बोलत आहेत.
 
त्यांच्या तब्येतीत होणारे बदल आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत डॉक्टर सातत्याने त्यांच्याशी चर्चा करत असतात.
 
उत्तरकाशी जिल्ह्याचे CMO डॉ. आरसीएस पंवार म्हणाले, "सुरुवातीला कामगारांना भीती आणि बेचैनी यासारख्या काही समस्यांचा सामना करावा लागला, परंतु डॉक्टरांशी बोलल्यानंतर ते समाधानी आहेत."
 
ते पुढे सांगतात की, "त्यांना भीती, बेचैनी आणि चिंता यांच्याशी संबंधित औषधं देण्यात आली आहेत. डॉक्टरांनी त्याला सर्दी आणि पोटाच्या समस्यांशी संबंधित औषधंही दिली आहेत. बोगद्याच्या बाहेर 20 डॉक्टरांचं पथक तैनात करण्यात आलं असून, त्यात 15 डॉक्टर आणि 5 वैद्यकीय कर्मचारी आहेत. कामगारांना ज्या काही समस्यांना सामोरं जावं लागतं, तेव्हा तज्ज्ञांशी त्यांचा संवाद घडवून आणला जातो."
 
बोगद्यातील कामगारांना गेल्या अनेक दिवसांपासून सूर्यप्रकाश मिळत नाहीय, त्यामुळे त्यांना 'विटामिन डी' पाठवण्यात आलं आहे, त्यांना प्रोटीन आणि कॅल्शियमही देण्यात आलं आहे.भर उन्हात कामगारांची सुटका झाली तर त्यांच्यासाठी गॉगलचीही व्यवस्था करण्यात आली आहे."
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव डॉ. पीके मिश्रा आणि गृह मंत्रालयाचे सचिव अजय भल्ला यांनी सोमवारी (27 नोव्हेंबर) उत्तरकाशीतील सिलक्यारा बोगदा इथं बचाव मोहिमेचा आढावा घेतला.
 
यावेळी त्यांनी बोगद्यात अडकलेल्या मजुरांशी बोलून त्यांना धीर दिला.
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती