केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला असून या परीक्षामध्ये बिहार राज्यातील शुभम कुमार देशात प्रथम आला आहे. तर जागृती अवस्थी आणि अंकिता जैन यांनी अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांक पटकावला आहे. तर महाराष्ट्राची मृणाल जोशी आणि विनायक नरवदे हे 36 आणि 37 व्या क्रमांकावर आहेत. त्याचबरोबर विनायक महामुनी हा युपीएससी परीक्षामध्ये 95 व्या स्थानी आला आहे.
कोरोना महामारीमुळे सगळ्याच परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. त्यामुळे युपीएससीची मुलाखत प्रक्रिया देखील लांबणीवर गेली होती. त्यामुळे मुख्य निकालही उशिरा लागला आहे. युपीएससीची मुख्य परीक्षा जानेवारी 2021 मध्ये पार पाडली होती. तर मुख्य परीक्षेतून निवड झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात झाल्या होत्या.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षासाठी जनरल मधून 263, ईडब्लूएसमधून 86, ओबीसीप्रवर्गातून 229, तर एससी 122 आणि एसटी मधून 61 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. एकूण 761 जागांसाठी निवड करण्यात आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने 180 आयएएस, आयएफएस 36, आयपीएस 200, अ गटातील केंद्रीय प्रशासकीय सेवा 302 आणि ब गटातील प्रशासकीय सेवा 188 या पदांसाठी उमेदवारांची निवड झाली आहे.