दक्षिण रेल्वेने या दुःखद घटनेबद्दल माफी मागितली आहे आणि रेल्वे फाटकावर तैनात असलेल्या गेटकीपरला निलंबित करून अटक करण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, सकाळी ७:४५ वाजता विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल बसने कुड्डालोर आणि अलप्पक्कम दरम्यान रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक १७० ओलांडण्याचा प्रयत्न केला आणि या दरम्यान ती ट्रेन क्रमांक ५६८१३ विल्लुपुरम-मयिलादुथुराई पॅसेंजर ट्रेनच्या तावडीत सापडली.
पोलिसांनी सांगितले की, धडकेनंतर, शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस रेल्वे क्रॉसिंगपासून काही अंतरावर पडली. काही अंतर गेल्यानंतर लोको पायलटने ट्रेन थांबवली. टेलिव्हिजनवर प्रसारित झालेल्या घटनेच्या दृश्यांमध्ये पिवळ्या शाळेची बस तुटलेली दिसत आहे. दक्षिण रेल्वेने सांगितले की फाटक बंद होते आणि बस चालकाने उशीर टाळण्यासाठी फाटक उघडण्याचा आग्रह धरला, तर बस चालक आणि जखमी विद्यार्थ्यांपैकी एकाने फाटक उघडा असल्याचा दावा केला.
दक्षिण रेल्वेने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, दुर्दैवाने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आणि एक विद्यार्थी आणि बस चालक जखमी झाले आहे, ज्यांना कुड्डालोरमधील सरकारी रुग्णालय/जिपमेर पुडुचेरी येथे दाखल करण्यात आले आहे. एका जखमी विद्यार्थ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.