काश्मीर: लष्कराच्या ताब्यात तिघांचा मृत्यू; नातेवाईक म्हणतात, 'छावणीबाहेर येत होता किंकाळ्यांचा आवाज'
काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात लष्करानं ताब्यात घेतलेल्या 8 जणांपैकी 3 जणांच्या मत्यू प्रकरणी आता चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
गेल्या आठवड्यात गुरुवारी 21 डिसेंबरला पूंछ जिल्ह्यांमध्ये लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला करण्यात आला होता. त्यात 4 सैनिकांचा मृत्यू झाला होता. तर दोन जण जखमी झाले आहेत.
याच हल्ल्याची चौकशी करण्यासाठी सुरक्षा दलांनी 8 जणांना ताब्यात घेतलं होतं.
त्यापैकी 3 जणांचा मृत्यू झाला आहे. टोपा पीर भागात रात्री त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे या परिसरात सध्या तणावाची स्थिती आहे.
भारतीय लष्करानं एक पत्रक जारी करून या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याच स्पष्ट केलं आहे. तसंच या चौकशीत लष्कर पूर्णपणे सहकार्य करेल असंही सांगितलं आहे.
या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता जम्मू काश्मीर प्रशासनानं पूंछ आणि राजौरी भागामध्ये इंटरनेट बंद केलं आहे. तर या भागात सुरू असलेल्या मोहिमेचा आढावा घेण्यासाठी लष्कर प्रमुख मनोज पांडे यांनी जम्मूचा दौरा केला आहे.
ज्या तीन लोकांचा मृत्यू झाला आहे त्यात 48 वर्षांच्या सफीर अहमद यांचा तसंच त्यांच्याच गावातले त्यांचे दोन नातेवाईक मोहम्मद शौकत आणि शबीर अदमद या अनुक्रमे 28 आणि 25 वर्षांच्या तरुणांचा समावेश आहे.
जम्मू-काश्मीरच्या प्रशासनाने या तिघा मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत आणि नोकरी देण्याची घोषणा केली आहे.
दरम्यान, या तिघांचा नेमका मृत्यू कशामुळे झाला याची मात्र माहिती देण्यात आलेली नाही.
पण या घटनेनंतर मेहबुबा मुफ्ती, फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला यांच्यासह काश्मीरच्या सर्व बड्या नेत्यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे.
आर्मी अॅडिशनल डायरेक्टोरेट जनरल ऑफ पब्लिक इन्फर्मेशनने आपल्या अधिकृत एक्स हँडलवरुन ट्वीट केलं आहे, “ जनरल मनोज पांडे यांनी पुंछ सेक्टरचा दौरा किला आणि त्यांना सध्याच्या संरक्षण स्थितीची माहिती दिली. लष्करप्रमुखांनी कमांडोंशी चर्चा केली आणि सर्वांना मोहीम प्रोफेशनल पद्धतीने संचालित करण्याचे निर्देश दिले. जनरल पांडे यांनी सर्व अडथळ्यांच्या बाबतीत दृढ राहाण्यासाठी प्रोत्साहित केले.”
सैन्याच्या छावणीबाहेर आल्या किंकाळ्या
सफीर अहमद यांचे भाऊ नूर अहमद यांनी बीबीशी फोनवर बोलताना सांगितलं, “आमच्या घरापासून साधारण चार किमी अंतरावर गुरुवारी सैन्याच्या गाड्यांवर हल्ला झाला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी जवळच असलेल्या सैन्यछावणीतील काही सैनिक गावात आले. ते माझ्या भावासकट 9 लोकांना छावणीत घेऊन गेले.”
“सैन्याची ही छावणी सफीर यांच्या घरापासून साधारणतः दोन किमी अंतरावर आहे. छावणीत नेल्यावर त्यांना मारहाण सुरू झाली. त्यांच्या किंकाळ्या आजूबाजूला राहाणाऱ्या लोकांनी ऐकल्यावर काही महिला छावणीच्या दिशेने आल्या. त्यांनी छावणीत जाण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना तिथून पळवून लावण्यात आलं. त्यांना छावणीतच मारहाण करुन मारण्यात आलं. तीन जणांचे जीव केल्यावर त्यांना दुसऱ्या छावणीत नेण्यात आलं. ही छावणी त्यापासून 2 किमी अंतरावर आहे.”
नूर अहमद स्वतः बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजे बीएसएफमध्ये शिपाई होते. सफीर अहमद शेतकरी होते आणि त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता.
नूर सांगतात, “जम्मू काश्मीर पोलिसांच्या एका डीएसपींनी संध्याकाळी 7 वाजता मला फोन करुन तीन जणांचे प्राण गेल्याचं सांगितलं मग आम्ही थावणीत गेलो तिथं पुंछचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि सैन्याचे अनेक अधिकारी उपस्थित होते.”
नूर सांगतात, “तिघांचंही पोस्टमार्टम सुरू होतं. पोस्टमार्टमनंतर आम्हाला त्यांचे चेहरे दाखवण्यात आले. प्रशासनानं आम्हाला भरपूर मदत केली मात्र ज्या लोकांनी आमच्या लोकांना मारलं ते क्रूर होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ते मृतदेह आमच्याकडे सोपवण्यात आले. त्यानंतर गावामध्ये दफनविधी झाला.”
32 वर्षं बीएसएफमध्ये नोकरी करणाऱ्या नूर अहमद अत्यंत दुःखी स्वरात म्हणाले, “देशासाठी काम करण्याचं असं फळ मिळालं आहे, माझ्या भावाला सैन्याच्या ताब्यात असताना मृत्यू झाला.
त्यांच्या मृतदेहांवर कोणत्या खुणा होत्या असं विचारल्यावर नूर म्हणाले, “छळाची खूण नाही अशी शरीरावर एकही जागा उरलेली नव्हती. आम्ही त्याचा व्हीडिओ आणि फोटो घेऊन ठेवलेले आहेत. त्यांना भरपूर मारण्यात आलेलं होतं, मानही तुटलेली होती.”
सोशल मीडियात व्हीडिओ
दरम्यान एक व्हीडिओ सोशल मीडियात दिसत आहे. ज्या लोकांना ताब्यात घेण्यात आलं होतं त्यांचा हा व्हीडिओ शल्याचा दावा केला जात आहे. बीबीसीने या व्हीडिओची स्वतंत्रपणे पडताळणी केलेली नाही.
काही सेकंदांच्या या व्हीडिओत दोन लोकांना दंडुक्यांनी जबर मारहाण होताना दिसते. तसेच त्यांच्या जखमांवर मिरचीपूडीसारखं काहीतरी टाकलं जात आहे. आणि यात काही जवान सैन्याच्या पोशाखात दिसत आहेत.
हा व्हीडिओ आपल्याच गावचा असल्याचा दावा नूर अहमद करत आहेत.
लष्करावर छळ केल्याचा आरोप
न्यूज एजन्सी एपीनं त्यांच्या रिपोर्टमध्ये स्थानिकांच्या हवाल्यानं म्हटलं आहे की लष्करानं या लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर लष्कराच्या ताब्यातच त्यांचा मृत्यू झाला. परिणामी परिसरामध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे.
या रिपोर्टमध्ये स्थानिकांच्या हवाल्यानं हा सुद्धा दावा करण्यात आला आहे की, 'लष्करी अधिकारी या लोकांना जवळच्याच मिल्ट्री कॅम्पमध्ये घेऊन गेले आणि त्यांचा छळ केला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.'
त्यानंतर त्यांचे मृतदेह पोलिसांना देण्यात आले आणि नंतर ते त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले. स्थानिक लोकांनी दावा केला आहे की त्यांच्या मृतदेहांवर त्यांचा छळ करण्यात आल्याच्या खुणा आहेत.
तर उरलेल्या 5 जणांच्या कुटुंबीयांचा दावा आहे की त्यांच्या नातेवाईकांचा वाईटपद्धतीने छळ केल्यानंतर त्यांना लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
याच सर्व घडामोडींच्या दरम्यान रविवारी बारामुलामध्ये एका मशिदीमध्ये अजानच्या वेळी एका रिटायर्ड पोलीस अधिकाऱ्याची कट्टरतावाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली आहे.
तिखट प्रतिक्रिया
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती या सोमवारी पीडितांच्या कुटुंबीयाना भेटण्यासाठी जाणार होत्या. पण त्यांना आता नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा आरोप पीडीपीनं केला आहे.
त्याआधी रविवारी एक ट्वीट करत महबुबा मुफ्ती यांनी भारत सरकारवर टीका केली होती.
त्यांनी लिहिलं होतं, “लष्करावर झालेल्या हल्ल्यात 5 जवान शहीद झालेत. तर लष्करानं केलेल्या छळामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. काही लोकांवर रुग्णालयाच उपचार सुरू आहेत. त्यातच एका रिटायर्ड एसपीची गोळी मारून हत्या करण्यात आलीय. भारत सरकार ज्या सामान्य परिस्थितीचा देखावा करत आहे ती कायम ठेवण्याची किंमत निर्दोष लोकांना चुकवावी लागत आहे.”
“जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्येकाचं जीवन धोक्यात आहे. भारत सरकार जमिनीवरील प्रत्येक गोष्टीला यासाठी दाबत आहे कारण समोर आलं तर त्यांचं खोटं नरेटिव्ह संपुष्टात येईल,” असं सुद्धा त्यांनी पुढे लिहिलं आहे.
तर दुसरीकडे नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारला या कट्टरतादाचं मूळ शोधून काढण्याचं आवाहन केलं आहे.
एका पुस्तकाच्या प्रकाशानाच्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
त्यावेळी ते म्हणाले, “परिस्थिती सामान्य झाल्याचा दावा करणे आणि पर्यटकांच्या वाढत्या आकड्याचा वापर शांती प्रस्थापित झाल्याच्या प्रचारासाठी केल्यामुळे दहशतवाद संपुष्टात येणार नाही. दहशतवाद इथं अजूनही जिवंत आहे. ते दावा करतात की कलम 370 हटवल्यानंतर दहशतवाद संपुष्टात आला. पण 4 वर्षं झाले इथं दहशतवाद अजूनही कायम आहे. त्याचं मूळ कारण शोधल्याशिवाय तो संपुष्टात आणता येणार नाही.”
माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनीदेखील या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली आहे.
ते लिहितात, “जर तब्यात घेण्यात आलेल्या लोकांची हत्या झाल्याची बातमी खरी असेल तर हा सुरक्षा यंत्रणा आणि आफ्स्पा अंतर्गत त्यांना मिळणाऱ्या अधिकारांचा दुरुपयोग आहे. आतातर मानवाधिकारांच्या उल्लंघनाच्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी आणि शिक्षेची मागणीदेखील तकलादू झाली आहे. कारण जे लोक यामध्ये दोषी ठरवले गेले ते शिक्षा पूर्ण न करताच खुलेआम फिरताना दिसत आहेत.”
माकप नेते सीताराम येचुरी यांनी एक्सवर पोस्ट लिहून या प्रकरणाच्या तातडीनं चौकशीची मागणी केली आहे.
त्यांनी लिहिलं आहे, “लष्करानं छळ केल्यामुळे 3 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी लवकरात लवकर चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणात उत्तरदायित्व ठरवून पीडितांना लवकारात लवकर न्याय मिळावा. मृत्यू झालेल्या तिघांच्या कुटुंबाप्रति माझ्या सहवेदना.”
सरकारने काय म्हटलं?
या तिघांचा नेमका मृत्यू कसा झाला आहे यावर जम्मू-काश्मीर प्रशासनानं काहीच टिप्पणी केलेली नाही. पण या प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आल्याच त्यांनी सांगितलं आहे. तसंच मृतांचा नातेवाईकांना मदतीची घोषणा केली आहे.
जम्मू-काश्मीरच्या सूचना आणि जनसंपर्क विभागानं सोशल मीडियावर म्हटलं आहे, “पूंछ मधल्या बुफलियाज भागात तीन जणांच्या मृत्यूचं वृत्त आहे. या प्रकरणात मेडिकल आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
"तसंच अधिकारी कायदेशीर कारवाई करत आहेत. सरकारने मृतांच्या सर्व नातेवाईकांना मदतीची घोषणा केली आहे. तसंच मृतांच्या प्रत्येकी एका नातेवाईकाला नोकरीसुद्धा दिली जाईल," असं जनसंपर्क विभागाने म्हटलं आहे.
इंडियन एक्स्प्रेसने त्यांच्या एका रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, या प्रकरणी लष्करानं कोर्ट ऑफ इंक्वायरीचे आदेश दिले आहेत.
दुसरीकडे सुरनकोट पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार या प्रकरणाची चौकशी पीर पंजाल भागातल्या सोळाव्या कोर कमांड ऐवजी अखनूर भागातल्या कमांडकडे देण्यात आली आहे. तसंच स्थानिक पोलिसांना सुद्धा चौकशीमध्ये सामाविष्ट करण्यात आलं आहे.
ही फास्ट ट्रॅक चौकशी असेल जी 72 तसांमध्ये पूर्ण करण्यात येईल आणि यामध्ये लष्करावर झालेल्या हल्ल्याचीदेखील चौकशी करण्यात येईल.
शिवाय काही वृत्तपत्रांनी बातम्या दिल्या आहेत की सोळाव्या कोर कमांडमधल्या काही अधिकाऱ्यांनादेखील तिथून हटवण्यात आलं आहे. त्यापैकी काही अधिकाऱ्यांना आधीपासूनच हटवलं जाणार होतं. तर काहींना तीन जणांच्या मृत्यूनंतर हटवण्यात आलं आहे.
तसंच या सोळाव्या कोर कमांडचे लेफ्टनंट जनरल संदीप जैन यांची लवकरच देहरादूनच्या इंडियन मिलट्री अकॅडमीच्या कमांडरपदी नियुक्ती केली जाणार आहे. त्यांच्या जागी लेफ्टनंट जनरल नवीन सचदेव पदभार स्वीकारणार आहेत.