सावध राहा, हा विनोद नाही, शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी

शुक्रवार, 8 एप्रिल 2022 (15:41 IST)
कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये मोठा हल्ला होण्याची शक्यता आहे. शहरातील अनेक शाळांना शुक्रवारी सकाळी धमकीचे ई-मेल आल्याचे वृत्त आहे, ज्यामध्ये बॉम्ब पेरण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीसही सतर्क आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी बॉम्बशोधक पथके तैनात करण्यात आली आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी शहराला भेट दिली.
 
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, बेंगळुरू शहरातील अनेक शाळांना धमकीचा मेल आला आहे. शाळेत 'अत्यंत शक्तिशाली बॉम्ब' पेरण्यात आला आहे. शहरातील अनेक शाळांना असे मेल आल्याची माहिती बेंगळुरू पोलिसांनी दिली आहे. या शाळांमध्ये शोध सुरू आहे. याशिवाय तपासात बॉम्बशोधक पथकाचीही मदत घेतली जात आहे.
 
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, मेलमध्ये लिहिले आहे की, 'तुमच्या शाळेत एक अतिशय शक्तिशाली बॉम्ब पेरण्यात आला आहे. सावध राहा, हा विनोद नाही, तुमच्या शाळेत खूप शक्तिशाली बॉम्ब पेरला गेला आहे, ताबडतोब पोलिसांना कळवा, तुमच्यासह शेकडो जीवांना त्रास सहन करावा लागू शकतो, उशीर करू नका, आता सर्व काही तुमच्या हातात आहे.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिल्ली पब्लिक स्कूल, गोपालन इंटरनॅशनल, न्यू अकादमी स्कूल, सेंट व्हिन्सेंट पॉल स्कूल, इंडियन पब्लिक स्कूल आणि एबेनेझर इंटरनॅशनल स्कूलला सकाळी 10.15 ते 11 दरम्यान धमकीचे ई-मेल आले आहेत. सध्या पोलीस या मेलची सत्यता तपासण्यासाठी सखोल तपास करत आहेत. विशेष म्हणजे हे ई-मेल वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या आयडीवरून पाठवण्यात आले होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती