ऐतिहासिक लाल किल्ला उडवण्याची धमकी देणाऱ्यास अटक

ऐतिहासिक लाल किल्ला बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या युवकास रविवारी दिल्ली पोलिसांनी अटक केली. महरुप असे त्याचे नाव असून तो पहाडगंज येथील हॉटेलमध्ये मॅनेजर आहे. शनिवारी संध्याकाळी रोहिणी येथे राहणाऱ्या एका इसमाला अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन फोन आला. समोरच्या व्यक्तीने त्याला लाल किल्ला उडवणार असल्याची धमकी दिली. पोलिसांच्या 100 नंबरवरही त्याने फोन केला व लालकिल्ला उडवण्याची धमकी दिली. त्यानंतर पोलिसांनी ताबडतोब फोन करणाऱ्याचा पत्ता शोधून काढला व रविवारी सकाळी त्याला पहाडगंज येथून अटक केली. सध्या पोलिस व सुरक्षा संस्था त्याची कसून चौकशी करत आहेत.
 
ऐतिहासिक लाल किल्ल्याला विशेष महत्व असून काही महिन्यांपूर्वी साफसफाई करताना किल्ल्यातील एका विहीरीत ग्रेनेडचा मोठा साठा सापडला होता. तपासात ग्रेनेड निकामी असल्याचे समोर आले होते. 6 फेब्रुवारी रोजी साफसफाई करत असताना पुरातन विभागाच्या कर्मचाऱ्यांना किल्ल्याच्या एका भागात काडतूसे व स्फोटकांचा साठा सापडला होता. किल्ल्यात सलग दोनवेळा शस्त्रसाठा सापडल्याने खळबळ उडाली होती. पण ती स्फोटके निकामी असल्याचे निदर्शनास आले होते. लष्कराचे लाल किल्ल्यावर वास्तव्य होते. त्यांचाच हा शस्त्रसाठा असावा असे बोलले जात आहे.

वेबदुनिया वर वाचा