पोलीस अधिकाऱ्यानेच केला पीडितेवर बलात्कार, 4 वर्षांनंतर असं आलं प्रकरण उघडकीस

रविवार, 10 जुलै 2022 (15:39 IST)
हैदराबादमधील राचकोंडा पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पोलीस अधिकाऱ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप या पोलीस अधिकाऱ्यावर आहे. नागेश्वर राव असं या आरोपी पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.
 
नागेश्वर राव याच्यावर बलात्कार, गुन्हेगारी अत्याचार, हत्येचा प्रयत्न, अपहरण आणि शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत वनस्थलीपुरम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नागेश्वर राव याला काल (9 जुलै) अटक करण्यात आल्याची माहिती राचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी माहिती दिली.
 
नागेश्वर राव यांनी एका प्रकरणात आरोपी असलेल्या व्यक्तीच्या पत्नीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
 
नागेश्वर राव हा पोलीस निरीक्षक दर्जाचा पोलीस अधिकारी आहे. मारेदपल्ली पोलीस ठाण्यात सर्कल इन्स्पेक्टर किंवा एसएचओ म्हणून कार्यरत होता. नागेश्वर रावला आता पदावरून निलंबित करण्यात आलं आहे.
 
नेमकं प्रकरण काय?
या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात 2018 मध्ये झाली.
 
पीडित महिलेनं 8 जुलै 2022 रोजी वनस्थलीपुरम पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, 2018 साली तिच्या पतीविरोधात टास्कफोर्सकडून तक्रार नोंदवली होती आणि त्याची चौकशी तपास अधिकारी म्हणून नागेश्वर राव करत होता.
नंतर याच आरोपीला (पीडित महिलेच्या पतीला) फेब्रुवारी 2021 पर्यंत नागेश्वर राव याने आपल्या फार्महाऊसवर कामावर ठेवलं.
 
एक दिवस पीडित महिलेचा पती नागेशवर राव याच्या फार्महाऊसवर काम करत असताना, पीडित महिलेला नागेश्वर राव याने जबरदस्तीने त्यांच्या शेतजमिनीच्या परिसरात नेलं.
 
याबाबत पीडितेनं तिच्या पतीला सांगितलं असता, पतीनं नागेश्वर रावला फोन करून इशारा दिला की, "माझ्या कुटुंबापासून दूर राहा, अन्यथा तुमच्या पत्नीला तुमच्या वागणुकीबद्दल सांगेन."
 
त्यानंतर नागेश्वर रावने पीडितेच्या पतीला विनवणी केली की, माझ्या पत्नीला याबाबत काहीही सांगू नका.
 
मात्र, काही दिवसांनी एक पोलीस निरीक्षक, एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि एक कॉन्स्टेबल पीडितेच्या घरी आले आणि तिच्या पतीला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. तिथे त्याला मारहाण केली गेली आणि हातात गांजाचे पॅकेट्स देऊन फोटो काढले गेले. तसंच, नागेश्वर रावच्या पत्नीला काहीही सांगितल्यास खोटा गुन्हा नोंदवण्याचीही धमकी पीडितेच्या पतीला देण्यात आली.
 
त्यानंतर 6 जुलै 2022 रोजी नागेश्वर रावने पीडित महिलेला व्हॉट्सअप कॉल केला आणि लैंगिक भूक भागवण्यास सांगितलं. शिवाय, काही अपशब्दही त्यांनी वापरले. त्यावेळी पीडितेचा पती त्याच्या मूळगावी होता.
 
पीडित महिलेनं हे तातडीनं तिच्या पतीला सांगितलं. त्यानंतर पती मुलाबाळांना गावीच सोडून तातडीनं परतला.
 
पण पती पोहोचण्याच्या आधी 7 जुलै 2022 च्या रात्री साडेनऊच्या सुमारास नागेश्वर राव वनस्थलीपुरममधील पीडितेच्या घरी पोहोचला आणि तिला मारहाण केली. शिवाय, तिच्यावर बलात्कार केला.
तेवढ्यात पीडितेचा पती घरात पोहोचला आणि त्यानं धक्का मारून घराचा दरवाजा उघडला. त्यांनी नागेश्वर रावला काठीनं मारहाण केली.
 
त्यानंतर नागेश्वर रावनं बंदुकीचा धाक दाखवत पीडितेच्या पतीला मारहाण केली. शिवाय, हैदराबाद सोडून जाण्यास सांगितलं. हैदराबाद सोडलं नाही, तर वेश्याव्यवसायाच्या गुन्ह्यात अटक करण्याची धमकी दिली.
 
त्यानतंर पीडित महिला आणि तिचा पती गाडीनं हैदराबाद सोडून निघत असताना 8 जुलै 2022 च्या सकाळी इब्राहिमपटणम तलावाजवळ त्यांचा अपघात झाला. तिथं घटनास्थळी पोलीस पोहोचले आणि त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं.
 
रांचाकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवतांच्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपी असलेला पोलीस अधिकारी नागेश्वर राव याला अटक करण्यात आलीय.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती