अबब, शिपायाकडे चक्क १०० कोटींची संपत्ती

बुधवार, 2 मे 2018 (16:17 IST)
आंध्र प्रदेश परिवहन विभागात शिपायाची नोकरी करणाऱ्या आणि  ४० हजार पगार घेणाऱ्या शिपायाकडे चक्क  १८ फ्लॅट ५० एकर जमीन, अशी १०० कोटींची संपत्ती आहे. शिपायाने जमवलेली ही माया बघून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारीही चक्रावले आहेत. नरसिंह रेड्डी (५५) असे त्याचे नाव असून नेल्लूर येथून त्याला अटक करण्यात आली आहे.
 

नेल्लूर वाहतूक विभागिय सहआयुक्त कार्यालयात रेड्डी शिपाई आहे. त्याने नुकताच १८ वा फ्लॅट खरेदी केला आणि गडबड झाली.  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  रेड्डीच्या नेल्लूर येथील घरावर छापा घातला. यावेळी  रेड्डीने पत्नी व नातेवाईकांच्या नावावर १८ फ्लॅट खरेदी केले होते. त्याशिवाय त्याच्या घरातून अधिकाऱ्यांनी रोख साडे सात लाख रुपये जप्त केले, त्याच्या बँकेत २० लाख रुपये होते, तर २ किलो सोन्याचे दागिने, एलआयसीमध्ये १ कोटीहून अधिक रुपये त्याने गुंतवले होते. तसेच ५० एकर शेती त्याच्या नावार होती. नेल्लूर येथे ३,३००० चौ. क्षेत्रफळ असलेल्या दुमजली पेंट हाऊसमध्ये तो राहतो. तसेच चांदीची आवड असलेल्या रेड्डीने काही दिवसांपूर्वीच ७.७० किलो चांदीची भांडी व अन्य सामान खरेदी केल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. 
रेड्डी २२ ऑक्टोबर १९८४ ला सहाय्यक पदावर रुजू झाला होता. त्यावेळी त्याला अवघा ६५० रुपये पगार मिळत होता. या विभागात लोकांचे काम लवकर करुन देण्यासाठी चिरमिरी मिळत असल्याने तो खूश होता. थोड्याच दिवसात लोक त्याला ओळखू लागली होती. काम वेळेआधी करण्याचा विश्वास तो लोकांना द्यायचा व त्या मोबदल्यात लाच घ्यायचा. हळूहळू रेड्डी हजारो व लाखो रुपये घेऊन काम करू लागला. या विभागातून आपली बदली होऊ नये यासाठी तो वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही खुश ठेवत होता. त्यामुळे ३४ वर्षापासून एकाच विभागात तो काम करत होता. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती