ब्राझील आणि भारतादरम्यानचा वादग्रस्त करार अखेर रद्द

शनिवार, 24 जुलै 2021 (19:44 IST)
हैदराबादमधल्या भारत बायोटेक या लस उत्पादक कंपनीची कोव्हिड-19 विरोधातल्या कोव्हॅक्सिन लशीची क्लिनिकल ट्रायल ब्राझील सरकारने रद्द केली आहे.
 
ब्राझीलमधल्या कंपनीसोबतचा भारत बायोटेकचा करार संपुष्टात आणल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं असल्याचं ब्राझीलच्या आरोग्य नियामकांनी म्हटलं आहे.
 
ब्राझीलमधल्या बाजारपेठेसाठी कोव्हिड-19विरोधातील कोव्हॅक्सिनसाठी प्रेसिसा मेडिकामेंटॉस अँड अॅन्विक्सिया फार्म्यास्युटिकल्स LLC कंपनीसोबतचा करार रद्द करत असल्याची घोषणा भारत बायोटेकने शुक्रवारी 23 जुलै रोजी केली होती.
 
ब्राझील सरकारला लशीचे दोन कोटी डोस देण्याचा करार वादग्रस्त ठरल्याने आणि ब्राझीलमध्ये अधिकाऱ्यांनी याबद्दल तपास सुरू केल्याने हा करार रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात आलं.
 
'एन्विसा' या ब्राझीलच्या आरोग्य नियामकांनी शुक्रवारी सांगितलं, "एन्विसासोबतचा क्लिनिकल रिसर्च आणि ब्राझीलमधल्या कोव्हॅक्सिन लशीच्या क्लिनिकल ट्रायल्स रद्द करण्यात येत आहेत. भारतीय कंपनी भारत बायोटेक लिमिटेड इंटरनॅशनलतर्फे शुक्रवारी एन्विसाला एक निवेदन पाठवण्यात आल्यानंतर या चाचण्या रद्द करण्यात आल्या आहेत."
 
ब्राझीलमधलं लशीचं लायन्सन्स, वितरण, विमा आणि तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांसाठी प्रेसिसा मेडाकामेंटॉस अँड एन्विक्सिया फार्मास्युटिकल्स कंपनी भारत बायोटेकची साथीदार कंपनी होती.
 
प्रेसिसा कंपनीला भारताचं ब्राझीलमध्ये प्रतिनिधित्वं करण्यासाठीचे अधिकार यापुढे नसतील, असं सांगणारं निवेदन ईमेलद्वारे भारत बायोटेकने एन्विसाला पाठवल्याचं ब्राझीलच्या या आरोग्य नियामकांनी म्हटलं आहे.
 
भारत बायोटेककडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एन्विसा आता त्यांच्याकडे सुरू असणाऱ्या प्रक्रियांचा पुन्हा आढावा घेऊन पुढची पावलं उचलणार आहे.
 
2021च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीदरम्यान कोव्हॅक्सिनचे 2 कोटी डोस देण्यासाठी ब्राझील सरकारसोबत आपण करार केला असल्याचं भारत बायोटेकने 26 फेब्रुवारीला जाहीर केलं होतं.
 
भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर ब्राझील सरकारने कोव्हॅक्सिनसाठीची ही ऑर्डर तात्पुरती थांबवली आहे.
 
तर कोव्हॅक्सिनला ब्राझीलमध्ये परवानगी मिळावी यासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपण ब्राझीलच्या औषध नियामकांसोबत यापुढेही काम करणार असल्याचं भारत बायोटेकने म्हटलं होतं.
 
भारताच्या लशीवरून वाद का?
भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लशीवरून ब्राझीलमध्ये वाद निर्माण झाला होता.
 
मोठी रक्कम देऊन भारताची ही लस विकत घेण्याचा करार ब्राझीलचं बोल्सनारो सरकार करत असल्याचा आरोप करण्यात येत होता.
 
जास्त किंमत द्यावी लागली तरी भारताच्या लशीसाठी करार केला जावा, असा दबाव आपल्यावर होता असं ब्राझीलच्या आरोग्य खात्यातल्या एका अधिकाऱ्याने म्हटलं होतं.
 
या सगळ्या वादामध्ये ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सनारोंविषयी सवाल उपस्थित केले जात आहेत. पण ब्राझीलमध्ये भारत बायोटेकची लस आलेली नसून कोणतीही रक्कम भरण्यात आलेली नसल्याचं राष्ट्राध्यक्ष बोल्सनारोंनी म्हटल्याचं वृत्त रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलंय.
 
भारत बायोटेकच्या लशीसाठी करण्यात आलेल्या कराराचा ब्राझीलमध्ये तपास करण्यात येतोय. 2 कोटी डोससाठी 32 कोटी डॉलर्सचा करार करण्यात आला होता. फायझरने गेल्या वर्षी कोव्हॅक्सिनपेक्षाही कमी किंमतीत लस देऊ केली होती, असं सांगितलं जातंय. पण त्यावेळी सरकारने या सौद्यात रस दाखवला नव्हता.
 
ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सनारो गेल्या महिन्यात म्हणाले होते, "आम्ही कोव्हॅक्सिनवर ना एक पैसा खर्च केलाय, ना आम्हाला कोव्हॅक्सिनचा एकही डोस मिळालाय. यात भ्रष्टाचार कुठून आला?"
 
आपल्या सरकारमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचं समोर आल्यास कारवाई केली जाईल असं बोल्सनारोंनी म्हटलं होतं. भारत बायोटेकच्या लशीची दुसऱ्या देशांमध्ये जी किंमत आहे तीच ब्राझीलमध्ये असल्याचं बोल्सनारो म्हणाले होते.
 
ते म्हणाले, "फेडरल हेल्थ अथॉरिटीने लशीच्या वापराची परवानगी दिल्यानंतरच सरकार लशीसाठी करार करतं. कोव्हॅक्सिनच्या वापरासाठीची मंजुरी अजून मिळालेली नाही. पण तिसऱ्या टप्प्यातल्या क्लिनिकल ट्रायलसाठी ब्राझीलच्या भागीदार कंपनीमार्फत परवानगी मिळालेली आहे."
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती