टाटा समूहाचे अध्यक्ष चंद्रशेखरन झाले अंबानींचे शेजारी; घेतले एवढ्या किंमतीत घर

शनिवार, 7 मे 2022 (21:40 IST)
टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन हे जगप्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचे शेजारी बनले आहेत. चंद्रशेखरन यांनी मुंबई येथील  पेडर रोडवरील अंबानींच्या अँटालिया या आलिशान घराच्या शेजारी असलेल्या आलिशान टॉवरमध्ये घर खरेदी केले आहे. मिडिया रिपोर्टसनुसार, चंद्रशेखरन यांनी 33 साउथ नावाच्या लक्झरी टॉवरच्या 11व्या आणि 12व्या मजल्यावर डुप्लेक्स खरेदी केले आहेत.
 
टाइम्स ऑफ इंडियाच्याच्या वृत्तानुसार, दक्षिण मुंबईतील जसलोक हॉस्पिटलजवळ 33 साऊथ ही 28 मजली आलिशान इमारत आहे. या टॉवरमध्ये चंद्रशेखरन आणि त्यांचे कुटुंबीय गेल्या ५ वर्षांपासून भाडेतत्त्वावर राहत होते. आणि आता हेच भाडेतत्वावरील घर स्वतःसाठी खरेदी केले आहे. विशेष म्हणजे त्याची किंमत तब्बल 98 कोटी रुपये आहे.
 
11व्या आणि 12व्या मजल्यावरील या डुप्लेक्सचे एकूण चटईक्षेत्र 6 हजार चौरस फुटांवर पसरलेले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एन चंद्रशेखरन आणि त्यांचे कुटुंबीय गेल्या पाच वर्षांपासून या डुप्लेक्समध्ये राहत होते आणि त्यासाठी ते दरमहा 20 लाख रुपये भाडे देत होते. मात्र, आता टाटा समूहाचे चेअरमन एन चंद्रशेखरन हे या लक्झरी डुप्लेक्सचे मालक झाले आहेत. या व्यवहाराची माहिती असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, “चंद्रशेखरन 21 फेब्रुवारी 2017 रोजी टाटा सन्सचे चेअरमन झाल्यापासून 33 साऊथ या आलिशान घरात शिफ्ट झाले होते.
 
चंद्रशेखरन, त्यांची पत्नी ललिता आणि मुलगा प्रणव यांच्या नावावर तीन दिवसांपूर्वी हा व्यवहार झाला आहे. हा करार 1.6 लाख रुपये प्रति चौरस फूट या दराने झाला आहे. हा आलिशान टॉवर 2008 मध्ये भोजवानी आणि विनोद मित्तल यांनी बांधला होता. हा डुप्लेक्स बिल्डर समीर भोजवानी यांच्या नियंत्रित कंपनी जीवेश डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडने विकला आहे. चंद्रशेखरन हे देशातील सर्वाधिक पगार घेणार्‍या कॉर्पोरेट मालकांपैकी एक आहेत. गेल्या वर्षी चंद्रशेखरन यांना जवळपास 91 कोटी रुपये पगार मिळाला होता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती