तामिळनाडू निकाल: द्रमुकची निर्णायक आघाडीच्या दिशेने वाटचाल

रविवार, 2 मे 2021 (11:52 IST)
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून एम. के. स्टॅलिन यांचा द्रविड मुनेत्र कळघम निर्णायक आघाडीच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे.
 
सध्या द्रमुक पक्षाचे उमेदवार 128 ठिकाणी आघाडीवर असून त्यांच्या प्रतिस्पर्धी अण्णाद्रविड मुनेत्र कळघम पक्षाचे उमेदवार 81 ठिकाणी पुढे असल्याची माहिती मिळाली आहे.
 
सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हापासूनच तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत काँटे की टक्कर सुरू असल्याचं दिसून आलं.
 
तामिळनाडू विधानसभेत एकूण 234 जागा आहेत. येथे बहुमतासाठी 118 जागांची आवश्यकता आहे.
 
विशष म्हणजे दोन्ही पक्षांचे उमेदवार बराच वेळ समसमान जागांवर आघाडीवर होते.
 
अगदी दोन्ही पक्षांचे उमेदवार प्रत्येकी 65 ठिकाणी आघाडीवर अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
 
पण नंतर द्रमुकने मुसंडी मारली. त्यानंतर द्रमुक पक्ष वेगाने पुढे गेला.
 
सध्या द्रमुक 128 ठिकाणी आघाडीवर असून अण्णाद्रमुक 81 जागांवर पुढे आहे.
 
कमल हासन आघाडीवर
अभिनेते आणि मक्कल निधी मायम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष कमल हासन या निवडणुकीत रिंगणात उभे आहेत.
 
कोईंबतूर दक्षिण मतदारसंघात कमल हासन आघाडीवर असल्याची माहिती ANI वृत्तसंस्थेकडून मिळाली आहे.
 
सर्वोच्च नेत्यांशिवाय पहिलीच निवडणूक
सध्यातरी विरोधी पक्ष असणारा द्रमुक पक्ष इथे बाजी मारण्याची शक्यता असल्याचं एक्झिट पोल्सनी म्हटलं आहे. त्यामुळे अण्णा द्रमुकचं स्थान हिसकावून घेण्यात द्रमुक यशस्वी ठरेल का, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
 
शिवाय, यंदाची निवडणूक दोन्ही पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांशिवाय होणारी पहिलीच निवडणूक आहे. माजी मुख्यमंत्री जयललिता आणि करूणानिधी हे दोघेही सध्या हयात नाहीत.
 
जयललिता यांचं 2016 मध्ये तर करुणानिधी यांचं 2018 मध्ये निधन झालं. दोघेही एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जात होते. करुणानिधी यांना मात देत जयललिता यांनी 2011 आणि 2016 अशा सलग दोन निवडणुकांमध्ये विजय मिळवला होता. पण दोघांच्याही निधनामुळे राज्यातील राजकारणाचं समीकरण बदलल्याचं पाहायला मिळतं.
 
सध्या अण्णाद्रमुकची धुरा पूर्णपणे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांच्या हातात आहे. तर द्रमुकची कमान करुणानिधी यांचे कनिष्ठ चिरंजीव एम. के. स्टॅलिन सांभाळत आहेत.
 
नुकत्याच आलेल्या एक्झिट पोल्समध्ये तामिळनाडूत द्रमुक बाजी मारणार, असा अंदाज सर्वेक्षण करणाऱ्या संस्थांनी व्यक्त केला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती