राहुल गांधींना देशाबाहेर हाकलून लावलं पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या भोपाळमधील लोकसभा खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केली आहे. राहुल गांधींनी त्यांच्या लंडन दौऱ्यात केलेल्या वक्तव्यावर प्रज्ञा ठाकूर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. मागच्या सोमवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी लंडन दौऱ्यावर होते. केंब्रिज विद्यापीठातील व्याख्यान तसेच लंडनमधील खासदारांसोबत पार पडलेल्या एका कार्यक्रमात ते म्हटले होते की, भारतात विरोधी पक्षाच्या नेत्यांचे माईक बंद केले जातात.
यावर प्रज्ञा ठाकूर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, "चाणक्यच्या मते, परदेशी आईच्या पोटी जन्मलेला मुलगा कधीही देशभक्त असू शकत नाही आणि राहुल गांधींनी हे विधान खरं असल्याचं सिद्ध केलंय."
त्या पुढे म्हणाल्या की, "तुम्हाला (राहुल गांधी) देशातील जनतेने निवडून दिलंय. पण तुम्ही मात्र जनतेचा आणि देशाचा अपमान करत आहात. तुम्ही आमच्या भारताचे नाही हे दाखवून दिलंय, कारण तुमची आई इटलीची आहे."
त्या पुढे म्हणाल्या, "हे आम्ही नाही तर चाणक्याने लिहून ठेवलंय की, परदेशी महिलेच्या पोटी जन्मलेला मुलगा कधीही देशभक्त होऊ शकत नाही. आणि आता तुम्ही ते सिद्ध करून दाखवलं आहे. भारतातील जनतेने तुम्हाला खासदार म्हणून निवडून दिलं. कित्येक वर्ष काँग्रेसचं सरकार सत्तेवर होतं, पण तुम्ही देश पोखरला."
"तुम्ही परदेशात जाता आणि म्हणता की आम्हाला संसदेत बोलण्याची संधी मिळत नाही. यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट असूच शकत नाही. मी अशा राहुल गांधींचा धिक्कार करते. यांच्या राजकारणावर प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. यांच्या राजकारणाला संधी मिळता कामा नये. त्यांना देशाबाहेर हाकललं पाहिजे."
प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.