1993 मुंबई स्फोट : अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा, ताहिरला फाशी
गुरूवार, 7 सप्टेंबर 2017 (13:22 IST)
1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी विशेष टाडा न्यायालयाने अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसंच दोन लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. अबू सालेमच्या आधी न्यायालयाने करीमुल्लाह खानला शिक्षा सुनावत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यालाही दोन लाखांचा दंडही ठोठावण्यात आला. इतर दोषींनाही शिक्षा सुनावली जात आहे. 1993 साखळी बॉम्बस्फोटातील अटक आरोपींना दोषी ठरविल्यानंतर विशेष सीबीआय वकिलांनी सालेम सोडून, सर्वांना फाशीची शिक्षा ठोठावण्याची विनंती केली होती. पोर्तुगाल व भारत यांच्यातील करारानुसार, सालेमला फाशीची शिक्षा देता येणार नाही. त्यामुळे त्याला जन्मठेप द्यावी, अशी विनंती विशेष सीबीआय वकिलांनी विशेष टाडा न्यायालयाला केली होती. तर बचाव पक्षाच्या वकिलांनी या सर्वांना कमीतकमी शिक्षा देण्याची विनंती केली होती.
16 जूनला विशेष टाडा न्यायालयाने 1993 साखळी बॉम्बस्फोटांच्या दुस-या टप्प्यातील आरोपी, अबू सालेमसह सहा जणांना दोषी ठरविले होते. त्यात 28 जून रोजी हृदयविकाराने मृत्यू पावलेल्या मुस्तफा डोसाचाही समावेश होता. न्यायालयाने अबू सालेम, मुस्तफा डोसा, ताहीर मर्चंट, करीमुल्ला खान, फिरोझ अब्दुल राशिद खान यांना दोषी ठरवले होते. गुन्हेगारी कट रचणे आणि दहशतवादी कारवायांसाठी सालेमला न्यायालयाने दोषी ठरवण्यात आले होते. शस्त्रास्त्र कायद्याखालीही न्यायालयाने त्याला दोषी ठरवले. सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने अब्दुल कय्यूमची सुटका केली. त्याची तात्काळ मुक्ततता करण्याचे न्यायालयाने आदेश दिले होते.
सालेमने गुजरातला जाऊन नऊ एके-56 रायफल्स आणि 100 ग्रेनेडस घेतले. जानेवारी 1993 मध्ये अभिनेता संजय दत्त, झैबुनीसा काझीच्या घरी ही शस्त्रास्त्र उतरवण्यात आली होती. अनिस इब्राहिमच्या इशा-यावरुन ही शस्त्रास्त्रे या दोघांकडे ठेवण्यात आली होती. अबू सालेमला त्याच्या कृत्यासाठी फाशीची शिक्षा होऊ शकते पण पोर्तुगालकडून फाशीची शिक्षा न देण्याच्या अटीवर त्याचे प्रत्यर्पण झाले आहे. हवाला ऑपरेटर राहिलेल्या ताहीर मर्चंटलाही न्यायालयाने कट रचल्या प्रकरणी दोषी धरले. हल्ल्यासाठी ज्यांना प्रशिक्षित करण्यात आले त्यांच्यासाठी मर्चंटच्या दुबईमधील घराचा वापर झाल्याचे न्यायालयाने आपल्या निकाल वाचनात सांगितले होते.
12 मार्च 1993 रोजी 13 ठाकाणी झालेल्या शक्तिशाली साखळी बॉम्बस्फोटात 257 जण ठार तर 713 जण जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटाला 24 वर्ष उलटून गेली आहेत. साखळी बॉम्बस्फोट घडवूण्यासाठी 3 हजार किलो आरडीएक्स पाकिस्तानातून आणले गेले होते. त्यापैकी फक्त 10 टक्के आरडीएक्सचा वापर केला गेला. यामध्ये एकूण 27 कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं होतं. या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीमध्ये अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम, मुस्तफा डोसा, फिरोज खान, ताहिर मर्चंट, रियाज सिद्दीकी, करीमुल्लाह शेख आणि अब्दुल कयूम यांचा समावेश होता.