गौरी लंकेश हत्या प्रकरण, तपास एसआयटीकडे

गुरूवार, 7 सप्टेंबर 2017 (11:25 IST)
अज्ञात इसमांनी केलेल्या गोळीबारात मंगळवारी मरण पावलेल्या कर्नाटकातील पुरोगामी पत्रकार श्रीमती गौरी लंकेश यांच्यावर बुधवारी धार्मिक विधी न करता, सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. भाजपा व हिंदुत्ववादाच्या विरोधात सातत्याने लिखाण करणा-या गौरी लंकेश यांच्या मारेक-यांच्या तपासासाठी कर्नाटक पोलिसांची तीन पथके स्थापन करण्यात आली आहेत. विशेष तपास पथक (एसआयटी) ही चौकशी करेल, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जाहीर केले.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या, वीरप्पा मोईली यांच्यासह अनेक काँग्रेस, तसेच विरोधी नेत्यांनी त्या आधी गौरी यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. त्यांच्या अंत्ययात्रेत कन्नड चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर सहभागी झाले होते.

सामनातून गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येवरुन काही प्रश्न उपस्थित करत सडकून टीका केली आहे. सामना संपादकीयच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा फक्त निषेध आणि धिक्कार करून चालणार नाही असं सांगितलं आहे. जे लोक आपल्या विचाराचे नाहीत व आपल्या भूमिकेचे समर्थन करीत नाहीत अशा लोकांचा आवाज कायमचा बंद करणारी एखादी यंत्रणा पोलादी भिंतीमागे अदृश्यपणे काम करीत आहे काय? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला
आहे. 

पंतप्रधानांनी एका महिलेस देशाच्या संरक्षणमंत्रीपदी नेमले व ‘तीन तलाक’वरून मुस्लिम महिलांना कायद्याचे संरक्षण दिले, पण गौरी लंकेश मात्र मरून रस्त्यावर पडली. तिचे विचार, तिच्या भूमिका कदाचित आम्हाला पटत नसतील; पण या देशातील गुंड, अंडरवर्ल्ड डॉन यांनीही कधी महिलांच्या हत्या केल्या नाहीत. गौरी लंकेशच्या बाबतीत मात्र अमानुषतेचे टोक गाठले स्पष्ट करण्यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती