पाकच्या गोळीबारात दोन जवान शहीद

शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016 (10:19 IST)
श्रीनगर– जम्मु-  कश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकड्यांकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असून, २४ तासात हिंदुस्थानी लष्कराचे दोन जवान शहीद झाले आहेत. दरम्यान हिंदुस्थानच्या जवानांनी जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तानी रेंजर्सच्या एका सैनिकाचा खात्मा केला आहे. 
 
सर्जिकल स्ट्राईकनंतर तब्बल ४२ वेळा पाकने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. सर्जिकल स्ट्राईकनंतर सातत्याने दहशतवाद्यांची घुसखोरी करण्याचा प्रयत्न आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन पाकिस्तानकडून सुरु आहे. विशेषत: जम्मु विभागात आंतरराष्ट्रीय सिमेवर पाकचा गोळीबार वाढला आहे. पुंछ, मेंढर, अब्दुलियात सेक्टरमध्ये रात्री उशिरापर्यंत गोळीबार सुरु होता. या गोळीबाराला सिमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. 
 
पाकच्या गोळीबारात जवान जितेंदर कुमार हे शहीद झाले. आर.एस. पुरा सेक्टरमध्ये बीएसएफच्या जवानांनी मुहतोड जवाब देत पाक रेंजर्सच्या एका सैनिकाला ठार केले तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. अर्निया येथे गोळीबारात सहा नागरिक जखमी झाले. दरम्यान, कश्मिर खोर्‍यात तंगधर विभागात दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. हिंदुस्थान जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. यात एक जवान शहीद झाला आहे.

वेबदुनिया वर वाचा