श्रद्धा वालकरच्या वडिलांनी केला वसई पोलिसांवर “हा” गंभीर आरोप; श्रद्धाचे वडील म्हणाले…

शुक्रवार, 9 डिसेंबर 2022 (14:35 IST)
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या श्रद्धा हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. दरम्यान नुकतेच श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. मेघदूत या शासकिय निवासस्थानी ही भेट झाली असून भेटीच्या वेळी किरिट सोमय्या आणि श्रद्धाचे कुटुंबीय उपस्थित होते. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
 
विकास वालकर म्हणाले की, माझी मुलगी श्रद्धाबाबात मी मनोगत व्यक्त करतो. दिल्ली राज्यपाल आणि दिल्ली पोलिसांनी असे सांगितले आहे, की तुम्हाला न्याय मिळवून देऊ. देवेंद्र फडणवीस यांनी देखील आश्वासन दिले आहे. नीलम गोऱ्हे, सोमय्या यांनी घरी येऊन आमची चौकशी केली. सोमय्या यांनी दिल्लीला विमान प्रवास, राहण्याचा खर्च केला, यासाठी सगळ्यांचे आभार मानतो, असे ते म्हणाले.
 
पुढे ते म्हणाले की, वसई येथील माणिपूर पोलीस स्टेशनच्या असहकार्यामुळे मला बराच त्रास झाला आहे. तसे झाले नसते तर माझी मुलगी आज जिवंत असती, त्यामुळे याची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि कायम राहील. आफताब पुनावालाला कठोर शिक्षा करा. आफताबच्या कुटुंबीयांची सखोल चौकशी करा. या कटामध्ये अन्य कुणी सहभागी असतील तर त्यांची देखील चौकशी करून शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती