Navy uniform नौदलाच्या गणवेशावर शिवरायांची राजमुद्रा

मंगळवार, 5 डिसेंबर 2023 (08:08 IST)
Navy uniform : भारताने आज गुलामीची मानसिकता मागे टाकली. यामागे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे. नौदलाच्या ध्वजाला मागच्या वर्षी शिवाजी महाराजांच्या विचारांशी जोडण्यात आले, हे माझे भाग्य आहे. आता नौदलाच्या गणवेशावर शिवरायांची राजमुद्रा असेल आणि नौदलाच्या पदांना भारतीय पद्धतीची नावे देणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधुदुर्ग दौ-यावर आले होते. नौदल दिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ््याचे अनावरण केले. तारकर्ली येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान पुढे म्हणाले की, कोणत्याही देशासाठी समुद्री सामर्थ्य किती महत्त्वाचे असते, हे छत्रपती शिवाजी महाराज ओळखून होते. त्यामुळे त्यांनी शक्तिशाली नौसेना बनवली. त्यांचे सगळे मावळे आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत. भारताने आज गुलामीची मानसिकता मागे टाकली आहे, ती छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे.
 
थरारक प्रात्याक्षिके
दरम्यान, नौदल दिनानिमित्त येथे नौदलाच्या वतीने येथे हवाई प्रात्याक्षिकही सादर करण्यात आली. यावेळी विमानांची थरारक उड्डाणे मोदींच्या उपस्थितीत पाहता आली. या थरारक उड्डाणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळी हवाई दलाचेही कौतुक करण्यात आले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती