Sharad Yadav शरद यादव यांचं निधन : 3 राज्यांमधून 7 वेळा खासदार झालेला नेता

शुक्रवार, 13 जानेवारी 2023 (08:09 IST)
जनता दल यूनायटेडचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांचं निधन झालं. काल (12 जानेवारी 2023) रात्री गुरुग्रामस्थित फोर्टीस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 75 वर्षांचे होते.
 
गेल्या अनेक दिवसांपासून शरद यादव हे आजारी होते. काल रात्री त्यांना श्वास घेताना त्रास सुरू झाला. त्यानंतर तातडीनं फोर्टीस रुग्णालयात भरती करण्यात आलं. मात्र, काही तासांतच त्यांची प्राणज्योत मालवली.
 
शरद यादव यांच्या निधनाची माहिती त्यांची कन्या आणि काँग्रेसच्या नेत्या सुभाषिनी यादव यांनी रात्री 10.48 वाजता ट्विटरवरून दिली. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, “पापा नहीं रहे..”
 
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह दिग्गजांनी शरद यादव यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आदरांजली व्यक्त केलीय.
 
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून शरद यादव यांना श्रद्धांजली अर्पण केली.
 
मोदींनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, "शरद यादव यांच्या निधनाची वार्ता ऐकून दु:ख झालं. ते मोठा कालावधी सार्वजनिक आयुष्यात वावरले. खासदार आणि मंत्री म्हणून त्यांच्याबद्दल आदर होता. राममनोहर लोहिया यांच्या विचारांना ते आदर्श मानत. त्यांच्यासोबत झालेल्या चर्चा मला कायम आठवत राहतील. शरद यादवांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबासोबत माझ्या सहवेदना आहेत. ओम शांती."
 
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी ट्वीट करत म्हटलंय की, "शरद यादव समाजवादी विचारांचे मोठे नेते होते, ते विनम्र स्वभावाचे होते. मी त्यांच्याकडून बरंच शिकलो आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त करतो. भारत देश शरद यादवांच्या योगदानाला कायम लक्षात ठेवेल."
 
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार ट्वीटमध्ये म्हणाले की, "माजी केंद्रीय मंत्री नितीश कुमार यांचं निधन दु:खदायक आहे. शरद यादव यांच्याशी माझे घनिष्ठ संबंध होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने धक्का बसला. ते प्रखर समाजवादी नेते होते. त्यांच्या निधनानं समाजवादी आणि राजकीय क्षेत्र अपूर्णतेच्या स्थिती गेलाय. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो."
 
बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी ट्वीट करत म्हटलंय की, "मंडल मसीहा, राजदचे ज्येष्ठ नेते, महान समाजवादी नेते आणि माझे मार्गदर्शक आदरणीय शरद यादव यांच्या निधनानं प्रचंद धक्का बसलाय. काही बोलण्यासही असमर्थ आहे. माताजी आणि बंधू शांतनु यांच्यासोबत बोलणं झालं. या दु:खाच्य प्रसंगी संपूर्ण समाजवादी कुटुंब त्यांच्यासोबत आहे."
 
तीन राज्यातून 7 वेळा लोकसभेत, 3 वेळा राज्यसभेत
शरद यादव यांचा जन्म 1 जुलै 1947 रोजी मध्य प्रदेशातील होशंगाबाद जिल्ह्यातील अखमाऊ गावी झाला होता.
 
जबलपूरच्या रॉबर्ट्सन कॉलेजमधून बॅचलर ऑफ सायन्सची पदवी घेतल्यानतर पुढ त्यांनी जबलपूर इंजिनिअरिंग कॉलेजमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बीईची पदवी घेतली.
 
स्वातंत्र्यसेनानी जयप्रकाश नारायण यांच्या शिष्यांपैकी ते एक मानले जात.
 
आणीबाणीविरोधात जेपींनी पुकारलेल्या आंदोलनात शरद यादव हे सक्रीय होते.
 
मात्र, त्यांची बहुतांश राजकीय कारकीर्द बिहार आणि उत्तर प्रदेशात सक्रीय राहिली.
 
त्यातही बिहार हे त्यांच्या राजकीय कारकीर्दीचं केंद्र राहिलं.
 
1974 साली शरद यादव पहिल्यांदा खासदार झाले. त्यानंतर ते एकूण सातवेळा लोकसभेचे खासदार म्हणून निवडून गेले होते.
 
बिहारमधील मधेपुरा लोकसभा मतदारसंघातून ते चारवेळा, मध्य प्रदेशातील जबलपूरमधून ते दोनवेळा, तर उत्तर प्रदेशातील बदायूँमधून एकदा खासदार बनले होते.
 
राष्ट्रीय जनतांत्रिक आघाडीचे ते संयोजकही होते.
 
केंद्रीय मत्रिमंडळातही त्यांनी विविध खाती सांभाळली. 1989 साली ते पहिल्यांदा केंद्रीय मंत्री झाले. वस्त्रोद्योग मंत्रालयाचं काम त्यांनी पाहिलं.
 
त्यानंतर 1999 साली ते पुन्हा मंत्री झाले आणि नागरी उड्डाण मंत्रालय, कामगार मंत्रालय, अन्न व सार्वजनिक पुरवठा मंत्रालय अशी खाती त्यांनी सांभाळली.
Edited by : Ratnadeep Ranshoor
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती