साईबाबा संस्थानचा कर्मचारी वर्गासाठी मोठा निर्णय, कर्मचारी आनंदात

बुधवार, 27 फेब्रुवारी 2019 (08:27 IST)
शिर्डी साई संस्थान येथे कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याचा, सोबतच दोन हजार कायम कर्मचाऱ्यांना सातवा आयोग देण्याचा महत्त्वपुर्ण निर्णय साईबाबा संस्थानने घेतला असे साई संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली आहे.  या दोन्ही निर्णयामुळे संस्थानला  वर्षाला 25 कोटींचा अधिक बोजा पडणार आहे असेही हावरे यांनी स्पष्ट केले.
 
मागील पंधरा वर्षांपासून शिर्डी संस्थानकडे अगदी कमी  पगारावर काम करणाऱ्या अडीच हजार कंत्राटी कामगारांच्या लढ्याला अखेर यश मिळताना दिसत आहे. 2018 पर्यंतच्या सर्व कर्मचाऱ्यांना साई संस्थान सेवेत कायम करण्याचा निर्णय संस्थान विश्वस्त मंडळाच्या बैठकीत घेतला आहे. या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटूंबियांना संस्थानच्या दोन्ही रुग्णालयात मोफत वैद्यकीय सेवा देखील मिळणार आहे. याबरोबर गंभीर आजारासाठी  इतर दवाखान्यात उपचारासाठी एक लाखापर्यंत उचल दिली जाणार आहे. 
 
मुलांच्या शिक्षणासाठी संस्थानच्या शाळेत शुल्क परतावा 
महिन्याला चार पगारी सुट्ट्या देण्याचा महत्त्वपुर्ण निर्णय 
निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात यापुढे 40 टक्के वाढ 
दोन हजार कर्मचाऱ्यांना सरकारने जाहीर केलेल्या तारखेपासून 7 वा वेतन आयोग सुरु केला जाणार
सेवानिवृत्ती रकमेतही वाढ पूर्वी 10 लाख रुपये सेवानिवृत्ती रक्कम मिळत होती. ती आता 20 लाख रुपये करण्यात आली  
सर्व कर्मचाऱ्यांचा 10 लाखापर्यंत अपघात विमाही उतरवला जाणार आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कायम सेवेत घेण्यात यावे यासाठी अनेक वर्षांपासून लढा सुरु होता. अनेकवेळा याप्रश्नी कर्मचाऱ्यांनी आंदोलनंही केली. ही मागणी अखेर मान्य करण्यात आली आहे. एकाच वेळी सर्व 2500 कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न संस्थानने केला आहे.यामुळे आता कर्मचारी फार खुश आहेत आणि त्यांनी संस्थानच्या मंडळाचा सत्कार देखील केला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती