रोहित पवार म्हणाले पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवणे चुकीचे !

मंगळवार, 18 जानेवारी 2022 (21:58 IST)
दाओसमध्ये आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाइन बैठकीत बोलता बोलता थांबले.
त्या संबोधनावेळी टेलिप्रॉम्प्टर अचानक थांबल्याने पंतप्रधान मोदींना पुढे बोलता आले नाही, असा आरोप करून त्यांच्यावर टीका सुरू झाली आहे. यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही टीका केली आहे. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी यावर वेगळे मत व्यक्त करत म्हणाले की, अशी खिल्ली उडवणं चुकीचे आहे.
या संदर्भात आमदार पवार बोलताना म्हणाले की, इकॉनॉमिक फोरम’च्या ऑनलाइन बैठकीत काल बोलत असताना टेलिप्रॉम्प्टर बंद पडल्याने पंतप्रधानांच्या भाषणात अडथळा आल्याचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होतोय. अनेकजण याबाबत खिल्ली उडवतात.
पण, मला वाटत अशी खिल्ली उडवणं चुकीचे आहे. एखाद्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यासपीठावर पंतप्रधान बोलत असताना ते देशाचे प्रतिनिधी म्हणून बोलत असतात. अशा वेळी टेलिप्रॉम्प्टरचाच आधार घ्यावा लागतो.
यावेळी चुकूनही एखादा शब्द चुकीचा गेल्यास ते देशासाठी परवडणारे नसते. त्यामुळे या गोष्टीची चेष्टा करणं योग्य नाही, असंही पवार यांनी सांगितले आहे. सोमवारी घडलेल्या या घटनेवर देशभर चर्चा सुरू आहे.
 
सोशल मीडियातून यावर चर्चा सुरू असून त्यांच्यावर मीम्सही येत आहे. अनेकांनी यावरून मोदींची खिल्ली उडविली आहे. तर दुसरीकडे हा टेलिप्रॉम्प्टरमधील तांत्रिक बिघाड नसून आवाज येतो की नाही, हे तपासले जात असल्याचेही पुढे आले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती