रमेश बिधुडी : भर संसदेत खासदाराला शिव्या देणाऱ्या भाजप नेत्याच्या वादांचा 'हा' आहे इतिहास

शुक्रवार, 22 सप्टेंबर 2023 (23:14 IST)
ANI

 
भाजपचे खासदार रमेश बिधुडी यांनी लोकसभा सभागृहात बसपा खासदार दानिश अली यांना शिवीगाळ केली. काल (21 सप्टेंबर) खासदार रमेश बिधुडींनी हे आक्षेपार्ह वक्तव्य लोकसभा सभागृहात केलं. या वक्तव्यानंतर काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी रमेश बिधुडींची खासदारकी रद्द करण्याची मागणी केलीय.
 
रमेश बिधुडी यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानं भाजपची राजकीय कोंडी झालीय.
 
गुरुवारी (21 सप्टेंबर) रात्री लोकसभेत 'चंद्रयान-3 यश' या विषयावरील चर्चेदरम्यान बिधुडी यांनी बहुजन समाज पक्षाचे खासदार कुंवर दानिश अली यांना लक्ष्य करत वादग्रस्त वक्तव्य केलं.
 
यानंतर सभागृहात गदारोळ झाला आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी खासदार रमेश बिधुडी यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली.
 
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी भाजप खासदार रमेश बिधुडी यांच्या सभागृहातील वादग्रस्त विधानाची दखल घेतली असून भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती झाल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
 
पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, बिधुडी यांच्या वक्तव्यानंतर लगेचच सभागृहात उपस्थित असलेले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेबद्दल खेद व्यक्त केला. बहुजन समाज पक्षाचे खासदार दानिश अली यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, "मला आशा आहे की मला न्याय मिळेल आणि लोकसभा अध्यक्ष कारवाई करतील. तसं झालं नाही तर मी सभागृह सोडण्याचा विचार करेन."
 
दरम्यान, एएनआय आणि पीटीआय या वृत्तसंस्थांनी त्यांच्या वृत्तात म्हटलं आहे की, भाजप खासदार रमेश बिधुडी यांना त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या सूचनेनुसार बसपा खासदार दानिश अली यांच्या विरोधात असंसदीय भाषा वापरल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
 
कोण आहेत रमेश बिधुडी?
बिधुडी आणि त्यांचं कुटुंबीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य आहेत.
 
बिधुडी यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला विद्यार्थीदशेपासूनच सुरुवात केली.
 
विद्यार्थी नेता म्हणून त्यांनी 1983 पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम केलं.
 
1993 पासून त्यांनी राजकारणात सक्रियपणे काम केलं. 2003 ते मे 2014 या कालावधीत ते दिल्ली विधानसभेत आमदार होते.
 
रमेश बिधुडी हे 2014 पासून भाजपचे खासदार आहेत. 2014 आणि 2019 मध्ये भाजपच्या तिकिटावर दक्षिण दिल्ली लोकसभा मतदार संघातून ते निवडून आले आहेत.
 
भाजप नेते डॉ.हर्षवर्धन यांचं वक्तव्य
या व्हीडिओमध्ये रमेश बिधुडी आक्षेपार्ह शब्द वापरत असताना, भाजप खासदार आणि माजी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धनही त्यांच्या मागे बसून हसताना दिसत होते.
 
यावर सोशल मीडियावर काही लोकांनी आक्षेप घेत डॉ. हर्षवर्धन यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
 
त्यानंतर डॉ. हर्षवर्धन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिलं, "मी पाहिलं की माझं नाव ट्विटरवर ट्रेंड करत आहे. लोकसभेत दोन खासदारांनी एकमेकांविरुद्ध असंसदीय भाषा वापरल्याच्या प्रकरणी माझं नाव ओढलं जात आहे.”
 
ते म्हणाले, "आमचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी यापूर्वीच दोन्ही बाजूंनी केलेल्या अक्षम्य भाषेच्या वापराचा निषेध केला आहे."
 
डॉ. हर्षवर्धन यांनी लिहिलं, "मी माझ्या मुस्लिम मित्रांना विचारू इच्छितो जे सोशल मीडियावर माझ्या विरोधात लिहितात, त्यांना असं वाटतं का की मी कोणत्याही समुदायाच्या संवेदना दुखावणारी भाषा वापरणाऱ्यांसोबत असेन?"
 
ते म्हणतात, "माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्या 30 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मी लाखो मुस्लिम बांधवांसोबत काम केलं आहे. माझ बालपण हे चांदणी चौकातील फाटक तेलीयन भागात मुस्लिम मित्रांसोबत खेळण्यात गेलं.”
 
ते म्हणतात, "मी चांदणी चौकातून खासदारकीची निवडणूक जिंकलो आणि सर्व समाजांनी मला साथ दिली नसती तर हे शक्य झालं नसतं. काही लोक यात माझं नाव ओढत आहेत याचं मला दु:ख आहे. या सत्य हे आहे की, या गोंधळात काय बोलले ते मला स्पष्टपणे ऐकू येत नव्हतं. मी माझे जीवन माझ्या तत्त्वांनुसार जगतो."
 
बिधुडी याचं लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची काँग्रेसची मागणी
बिधुडी यांच्या वक्तव्यावर तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.
 
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, "त्यांनी (रमेश बिधुडी) दानिश अली यांच्या विषयी जे म्हटलंय, ते अत्यंत निंदनीय आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी माफी मागितली आहे, पण ती पुरेशी नाही. अशी भाषा सभागृहाच्या आत किंवा बाहेर वापरली जाऊ नये."
 
जयराम रमेश पुढे म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की नवीन संसद भवनाची सुरुवात महिला शक्तीनं झाली असली तरी त्याची सुरुवात रमेश बिधुडी यांच्यापासून झाली आहे. ही रमेश बिधुडी यांची नसून भारतीय जनता पक्षाची विचारसरणी आहे. बिधुडी यांचं सदस्यत्व रद्द करा, अशी आमची मागणी आहे."
 
तर काँग्रेसच्या सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या, "लोकसभेत भाजप खासदार रमेश बिधुडी यांनी बसपा खासदार दानिश अली यांना लोकसभेत या नावांनी हाक मारली... ते ही देशाच्या सभागृहात..."
 
दुसरीकडे, काँग्रेसच नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून, खासदार रमेश बिधुरी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केलीय.
 
तृणमूल खासदार महुआ मोईत्रा काय म्हणाल्या?
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी बिधुडी यांच्या भाषणाचा व्हीडिओ शेअर केला आहे.
 
महुआ यांनी लिहिलं, "या व्हीडिओमध्ये बिधुडी हे खासदारासाठी अनेक आक्षेपार्ह शब्द वापरत आहेत. प्रतिष्ठेचे रक्षक, स्पीकर ओम बिर्ला आणि विश्वगुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा - कृपया कारवाई करा."
 
महुआ मोईत्रा पुढे लिहितात, "मुस्लिम आणि मागासवर्गीयांना शिवीगाळ करणे हा भाजपच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे, बहुतेक लोकांना आता यात काहीही चुकीचं दिसत नाही. नरेंद्र मोदींनी भारतीय मुस्लिमांना त्यांच्याच भूमीवर अशा भीतीच्या अवस्थेत जगण्यास भाग पाडलं आहे. की ते हे सर्व काही हसतमुखानं सहन करत जगत आहेत. पण मी त्याचा निषेध करत राहीन कारण मां कालीनं मला पाठीचा कणा दिला आहे."
 
यावर संताप व्यक्त करत नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी ‘एक्स’वर लिहिलं, "हे द्वेषानं भरलेले खासदार किती सहजतेनं असं आक्षेपार्ह शब्द वापरत आहेत. मुस्लिमांविरुद्ध द्वेष इतका मुख्य प्रवाहात कधीच नव्हता. भाजपचे मुस्लिम नेते अशा द्वेष करणाऱ्यांसोबत कसं राहू शकतात?"
 
ओमर अब्दुल्ला श्रीनगरमध्ये म्हणाले, "जर त्यांनी फक्त 'दहशतवादी' म्हटलं असतं, तर आम्हाला त्याची सवय झाली आहे. ते शब्द संपूर्ण मुस्लिम समाजाविरोधात वापरले गेले. भाजपशी संबंधित असलेले मुस्लिम हे कसं सहन करू शकतात हे मला समजत नाही." ते आपल्याबद्दल काय विचार करतात हे दर्शवितं. त्यांना लाज वाटली पाहिजे."
 
आम आदमी पक्षाचे नेते अमानतुल्ला खान यांनी ट्विटरवर लिहिले की, "रमेश बिधुडी यांना तात्काळ बडतर्फ करून तुरुंगात टाकावं."
 
दरम्यान, या वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि केसी वेणुगोपाल यांनी बसपाचे खासदार दानिश अली यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली.
 
सुप्रिया सुळेंनी रमेश बिधुडींविरोधात दिली हक्कभंग नोटीस
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भर सभागृहात बसपा खासदार दानिश अलींना शिवीगाळ करणाऱ्या भाजप खासदार रमेश बिधुडी यांच्या विरोधात हक्कभंगांची नोटीस लोकसभा सचिवालयाकडे दिलीय.
 
खासदार सुप्रिया सुळे यांनी यांनी लोकसभा महासचिवांना लिहिलंय की, "खासदार रमेश बिधुरी यांनी प्रथमदर्शनी केलेली विधानं हक्कभंग आहे. कारण ते लोकसभेच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचवतात. नियमानंनुसार मी तुम्हाला या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती करते आणि हक्कभंगाचा हा प्रश्न हक्कभंग समितीकडे पाठवावा."
 
सुप्रिया सुळेंनी म्हटलंय की, "लोकसभेतील कार्यपद्धती आणि कामकाजाच्या नियमांच्या नियम 222 अन्वये, 'एखादा सदस्य हा सभापतींच्या संमतीनं एखाद्या सदस्याच्या किंवा सभागृहाच्या किंवा त्याच्या समितीच्या हक्कभंगांचा प्रश्न उपस्थित करू शकतो.' या नियमानुसार मी सभागृहाच्या हक्कभंग उल्लंघनाचा प्रश्न उपस्थित करू इच्छिते."
 
लोकसभेतील कार्यपद्धती आणि कामकाजाचे नियम 227 नुसार हक्कभंग समितीकडे हक्कभंगाचा कोणाताही प्रस्ताव सभापती पाठवू शकतात. राज्यसभा अॅट वर्कच्या पृष्ठ 244 मध्ये प्रत्येक सभागृहाला अवमानाची शिक्षा देण्याचा हक्क देखील आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.
 
बिधुडी आणि वाद
अशा वादात रमेश बिधुडी यांचं नाव पहिल्यांदाच समोर आलंय असं नाही. 2017 मध्ये त्यांनी काँग्रेसवर हल्ला करण्यासाठी सोनिया गांधींच्या इटालियन असण्याचा मुद्दा उपस्थित केला होता.
 
मथुरेतील एका जाहीर सभेत ते म्हणाले होते की, "इटलीमध्ये लग्नानंतर पाच ते सात महिन्यात नातवंडं जन्माला येत असतील. तेच तिथले संस्कार आहेत. पण भारतीय संस्कृतीत अशा प्रकारचे संस्कार नसतात."
 
मात्र नंतर त्यांनी या विधानावर स्पष्टीकरण दिलं आणि ते म्हणाले की, "आमचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी 'अच्छे दिन'चा हिशेब मागता येणार नाही."
 
सरकार स्थापन होऊन अडीच वर्ष झाली तरी भाजप सरकारने दिलेली आश्वासनं पूर्ण केली नसल्याच्या काँग्रेसच्या टीकेला उत्तर देताना बिधुडी यांनी हे वक्तव्य केलं होतं.
 
चार महिला खासदारांची तक्रार
बिधुडी यांच्यावर यापूर्वीच संसदेत 'असंसदीय' आणि 'अभद्र' वक्तव्यं केल्याचा आरोप आहे.
 
गुरुवारी त्यांनी एका मुस्लिम खासदाराच्या धार्मिक ओळखीला लोकसभेत लक्ष्य केलं. तर गेल्या वेळी चार महिला खासदारांनी सभापतींकडे जाऊन त्यांच्या कथित वर्तनाबद्दल तक्रार केली होती.
 
ही घटना 4 ऑगस्ट 2015 रोजी घडली होती. रंजीत रंजन, सुष्मिता देव, अर्पिता घोष आणि पी के श्रीमती टीचर यांनी बिधुडी यांच्यावर 'अभद्र आणि असभ्य' भाषा वापरल्याचा आरोप केला होता.
 
मात्र, बिधुडी यांनी हे आरोप फेटाळून लावले होते.
 
इकॉनॉमिक टाईम्स या इंग्रजी वृत्तपत्राने त्यांना या विषयावर प्रश्न विचारला असता ते उत्तरात म्हणाले की, "माझं आणि त्यांचं कोणतंही वैयक्तिक भांडण नाहीये आणि मी अशी कोणतीही भाषा वापरली नाही. त्या लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी असे डावपेच वापरत असतात. त्या महिला असल्याचा गैरफायदा घेत आहेत."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती