राहुल गांधी : राजकीय रणांगणात लढणाऱ्या नेहरू-गांधी कुटुंबाच्या पाचव्या पिढीचा योद्धा
सोमवार, 27 मार्च 2023 (16:11 IST)
तैमूरने एकदा प्रसिद्ध इतिहासकार आणि समाजशास्त्रज्ञ इब्न खलदुन यांना राजवंशांच्या भवितव्याबद्दल विचारलं होतं. त्यावेळी खलदुन म्हणाले होते की, राजवंशांचं वैभव क्वचितच चार पिढ्यांच्या पुढे जातं.
पहिली पिढी विजय संपादन करते तर दुसरी पिढी प्रशासन सांभाळते. तिसरी पिढी विजय आणि प्रशासनापासून मुक्त झालेली असते. त्यांच्याकडे त्यांच्या पूर्वजांची संपत्ती खर्च करण्याचं काम असतं.
राजवंशाची चौथी पिढी आपल्या संपत्तीसोबत ऊर्जा देखील खर्च करते. म्हणून प्रत्येक राजवंशाच्या पतनाची सुरुवात त्यांच्या उदयापासूनच सुरू झालेली असते.
खलदुन यांना वाटतं त्याप्रमाणे, ही एक नैसर्गिक घटना असून यातून बाहेर पडणं शक्य नसतं.
नेहरू-गांधी कुटुंब आणि काँग्रेस
भारताच्या समकालीन इतिहासातील लोकशाही राजवटीत नेहरू-गांधी घराण्याचा उदय आणि अस्त पाहिला तर इब्न खलदुनने सांगितलेल्या गोष्टी तंतोतंत लागू पडतील.
ब्रिटीश साम्राज्यवादाविरुद्ध भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठीच्या लढ्यात महात्मा गांधींचे जवळचे सहकारी म्हणून जवाहरलाल नेहरू (1889-1964) देखील होते. त्यांची कन्या इंदिरा गांधी (1917-1984) यांनी पुढे जाऊन पाकिस्तान विरोधात लढून बांगलादेशाची निर्मिती केली. 20 व्या शतकातील सर्वात शक्तिशाली व्यक्तिमत्व म्हणून इंदिरा गांधींचा नावलौकिक होता.
इंदिराजींचा मुलगा राजीव (1944-1991) हे देखील भारताचे पंतप्रधान बनले. त्यांनी जे प्रयोग केले त्यासाठी त्यांनी मोठी किंमत मोजावी लागली. सोनिया गांधी यांच्या नावावरही एक विक्रम आहे. 138 वर्ष जुन्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या त्या सर्वाधिक काळ अध्यक्ष राहिल्या आहेत.
नेहरू-गांधी कुटुंबाच्या पाचव्या पिढीचं नेतृत्व राहुल गांधी करीत आहेत. काँग्रेसचं नेतृत्व करणाऱ्या गांधी कुटुंबातील ते सहावे सदस्य आहेत. 138 वर्ष जुन्या काँग्रेसचं नेतृत्व करणाऱ्यांपैकी नेहरू-गांधी कुटुंबातील सदस्यांनी सुमारे 51 वर्ष काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलंय. यात सोनिया गांधी सलग 22 वर्ष अध्यक्ष पदावर होत्या.
एआयसीसीचं नेतृत्व करताना जवाहरलाल नेहरू 11 वर्ष, इंदिरा गांधी सात वर्ष, राजीव गांधी सहा वर्ष आणि मोतीलाल नेहरू दोन वर्ष अध्यक्ष पदावर होते. राहुल गांधी एआयसीसीचे 87 वे अध्यक्ष होते आणि त्यांनी 16 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी अध्यक्षपद भूषवलं होतं. डिसेंबर 2017 ते मे 2019 हा त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ होता.
राहुल गांधींनी 2004 च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी राजकारणात एंट्री मारली. त्यांनी पारंपरिक राजकारणापासून फारकत घेत वेगळ्या पद्धतीने राजकारण केलं. 1998 मध्ये सोनिया गांधीच्या हिश्याला दुभंगलेली काँग्रेस आली होती. आपल्या परदेशी वंशामुळे त्या सावध पावलं टाकायच्या आणि यातूनच त्यांनी काँग्रेस नेत्यांना एकत्र आणलं.
त्यांनी जपानी मातृसत्ताक प्रणाली प्रमाणे काँग्रेस पक्ष चालवला. म्हणजे 1998-2017 आणि 2019-2022 पर्यंत त्या काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या. सोनिया गांधींनी काँग्रेसच्या वर्गीकरणाला जास्त महत्त्व दिलं.
सातत्याने बोलणारे राहुल गांधी
त्या तुलनेत वयाची पन्नाशी गाठलेले राहुल गांधी मात्र राजकीय परिणामांची तमा न बाळगता अत्यंत स्पष्ट आणि निर्भीडपणे बोलत असतात.
अलीकडेच त्यांनी लंडन आणि केंब्रिजमध्ये केलेल्या विधानांमुळे वाद निर्माण झाला होता. यावरून भाजपने राहुल गांधींच्या आई आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना 'आपल्या मुलावर नियंत्रण ठेवा' असं सांगितलं.
राहुल गांधींनी भारतीय लोकशाहीच्या दर्जावर प्रश्न उपस्थित केले. शिवाय 'पेगासस कॉन्ट्रोव्हर्सी', 'चीनचा धोका' याविषयांना देखील त्यांनी हात घातला.
राहुल गांधी सातत्याने दोन मुद्द्यांना हात घालताना दिसतात. त्यातलं एक म्हणजे 'भारत हा राज्यांचा संघ आहे' आणि दुसरं म्हणजे चीन-पाकिस्तान संबंध असो की पेगाससचा मुद्दा, या सगळ्यात मुत्सद्देगिरीत करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अपयशी ठरले आहेत.
पण निवडणुकांच्या दृष्टिकोनातून बोलायचं झाल्यास काँग्रेसमधील अनेकांना असं वाटतं की, या मुद्द्यांमुळे अनेक राज्यांमध्ये काँग्रेसचा वोट शेअर कमी झालाय.
राहुल गांधीचं वेगळ्या पद्धतीचं राजकारण भारतीय मतदारांना आकर्षून घेण्यात अपयशी ठरलं. परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांबाबत या मतदारांना सध्या सत्तेवर असलेल्यांच्या विरोधात जायचं नाहिये.
1962 चा भारत-चीन संघर्ष असो, 1965 चं भारत-पाक युद्ध असो किंवा 1999 चं कारगिल युद्ध असो या सर्व प्रकरणांमध्ये सरकार कमी पडलं होतं पण मतदानावेळी मतदारांनी या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. सरकारच्या विरोधात कधीच कोणता निर्णय आलेला नाही.
चीन म्हणजे काँग्रेसच्या गळ्यात अडकलेलं हाड आहे. चीनचा कोणताही उल्लेख आला की काँग्रेसला 1962 च्या पराभवाची आठवण होते. वायनाडच्या माजी खासदारांना म्हणजेच राहुल गांधींना 1971 च्या युद्धावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला द्यायला हवा होता. कारण त्यांच्या आजीने (इंदिरा गांधी) चीनच्या अघोषित पाठिंब्यानंतरही पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते.
प्रसिद्ध अर्थतज्ञ जेव्हा कौतुक करतात..
राहुल गांधींनी ऑक्टोबर 1994 ते जुलै 1995 दरम्यान ट्रिनिटी मध्ये डेव्हलपमेंट स्टडीजमध्ये एम.फिल केलं.
ऑगस्ट 2009 मध्ये विनोद मेहता आणि आउटलुक मासिकाच्या अंजली पुरी यांना दिलेल्या मुलाखतीत, अमर्त्य सेन यांनी राहुल गांधींचं कौतुक केलं होतं. सेन म्हणाले होते की, भारताच्या नुकसानाबद्दल खूप चिंता आणि व्यवस्थेत बदल घडवू इच्छिणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे राहुल गांधी.
सेन यांना 1999 मध्ये वाजपेयी सरकारने भारतरत्न हा पुरस्कार दिला होता. त्यावेळी सेन म्हणाले होते की, राहुल गांधी पंतप्रधान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अर्थतज्ञ सेन पुढे म्हणाले होते की, "मी राहूलला जास्त ओळखत नाही. पण ते मला ट्रिनिटीमध्ये भेटायला आले होते तेव्हा मी त्यांच्यासोबत एक संपूर्ण दिवस घालवला होता. त्यांचं वागणं बोलणं पाहून त्या एका दिवसात मी खूप प्रभावित झालो. त्यांच्या योजनांवर आम्ही चर्चा केली. त्यावेळी राजकारणात यायचा त्यांचा कोणता प्लॅन नव्हता आणि त्यांनीच मला तसं सांगितलं होतं. मला असं वाटतं की, हा त्यांचा मूळ विचार होता, पण नंतर त्यांनी तो बदलला. ते भारताच्या विकासासाठी ते प्रतिबद्ध असल्याचं मला त्यादिवशी जाणवलं."
राहुल गांधींच्या आर्थिक आणि राजकीय विचारसरणीवर डाव्यांचा मोठा प्रभाव असल्याचं दिसते. त्यामुळे बऱ्याचदा पक्षाच्या नेत्यांशी त्यांचे मतभेद झालेले दिसतात. 2010 मध्ये केंब्रिजमध्ये बोलताना राहुल गांधी यांनी स्वत:ला 'अर्थतज्ञ' संबोधलं होतं.
राहुल गांधींच्या आयुष्यावर लिहिणाऱ्या आरती रामचंद्रन यांनी मुलाखतकार मारो गोल्डन आणि अॅशले लॅमिंग यांच्याशी बोलताना सांगितलं होतं की, "मी जेव्हा राहुल गांधींशी आर्थिक विषयांवर बोलले होते तेव्हा त्यांनी 'मागणी आणि पुरवठा' या समस्येबद्दल सकारात्मक दृष्टिकोन सांगितला आणि सूचनांवर शिक्षकांचा एकाधिकार नसावा असंही सांगितलं."
मुलाखती दरम्यान डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्समध्ये एम.फिल केलेले राहुल गांधी म्हणाले होते की, "केंब्रिजमध्ये त्यांना जे काही शिकवलं त्यातल्या बऱ्याच गोष्टींशी ते सहमत नव्हते. ते पूर्वी जितक्या डाव्या विचारांचे होते त्यात आता बदल झालेत."
राहुल गांधींचा डाव्या विचासरणीकडे झुकाव असल्याचं त्यांच्या जवळच्या सल्लागारांनी देखील मान्य केलंय. यातले काहीजण जेएनयूचे असून ते एआयएसए- लेफ्ट विंगचे आहेत.
2013 मध्ये राजकारणातील दोषी आणि भ्रष्ट व्यक्तींना संरक्षण देणार्या मनमोहन सिंग यांच्या अध्यादेशाची प्रत राहुल गांधींनी फाडली होती आणि ते संपूर्ण जगाने पाहिलं होतं. पुढे काही दिवसांनी राहुल गांधींनी मनमोहन सिंग यांची माफी मागितली.
आता गंमत बघा, दहा वर्षांपूर्वी ज्या अध्यादेशाची कॉपी राहुल गांधींनी फाडली होती, तोच कायदा जर अस्तित्वात आला असता तर राहुल गांधींचं सदस्यत्व आज रद्द झालं नसतं.
राहुल गांधी इंदिरा गांधींच्या किती जवळ होते..
एखाद्याचं व्यक्तिमत्त्व अचूक ओळखणाऱ्या इंदिरा गांधी लहानग्या राहुलच्या वागण्याबोलण्याला आणि त्याच्या दृढतेला खूप महत्व द्यायच्या.
ऑक्टोबर 1984 मध्ये इंदिरा गांधींचं निधन झालं तेव्हा राहुल 14 वर्षांचे होते. त्यांच्या मृत्यूआधी त्या राहुल गांधींशी अशा मुद्द्यांवर चर्चा करायच्या जे विषय त्या राजीव किंवा सोनियांशी बोलू शकत नव्हत्या.
उदाहरण म्हणून बघायचं झाल्यास, 'ऑपरेशन ब्लू स्टार'नंतर इंदिरा गांधींना त्यांची हत्या होईल अशी भीती वाटायची. त्यांनी ही गोष्ट राहुल गांधींना बोलून दाखवली होती आणि माझ्या मृत्यूवर कोणीही रडू नका असं सांगितलं होतं.
जून 1984 मध्ये ऑपरेशन ब्लू स्टार पार पडलं. ऑपरेशननंतर भारतीय लष्कर पंजाबमधील सुवर्ण मंदिरातून अतिरेक्यांचे मृतदेह बाहेर काढत असताना पंतप्रधान इंदिरा गांधींना कळून चुकलं होतं की, त्यांचा मृत्यू आता जवळ आलाय.
त्या 14 वर्षाच्या मुलाशी त्यांच्या अंत्यसंस्काराच्या तयारीबद्दल बोलायच्या. त्यावेळी हे सगळं जाणून घेण्यासाठी राहुल कदाचित खूपच लहान असतील, पण आपल्या मनातल्या गोष्टी सांगण्यासाठी इंदिराजींना एक साथीदार मिळाला होता. त्याच्या निर्णयावर इंदिराजींना विश्वास होता.
आज 39 वर्ष उलटली, राहुल गांधी मोठया संकटात सापडले आहेत. राजकारणात धर्म आणणं राहुल गांधींना मान्य नाही. त्यांना असं वाटतं की, ही विचारसरणी धर्मनिरपेक्षतेच्या नेहरूवादी विचाराच्या विरुद्ध आहे.
जवाहरलाल नेहरूंची धर्मनिरपेक्षतेची व्याख्या स्पष्ट होती. धर्म हा राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनापेक्षा वेगळा आहे. धर्म ही त्या त्या व्यक्तीची खाजगी बाब असल्याचं नेहरूंचं मत होतं. आणि देशाने या गोष्टींपासून स्वतःला वेगळं ठेवलं पाहिजे.
नेहरूंनी 1953 मध्ये त्यांचे गृहमंत्री कैलाशनाथ काटजू यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं की, "भारताचं भवितव्य हिंदू दृष्टिकोनाशी निगडित आहे. आणि जर हा हिंदू दृष्टिकोन बदलला नाही तर मला खात्री आहे की, भारत विनाशाच्या वाटेवर आहे."
बहुसंख्य समाजाच्या सांप्रदायिकतेमध्ये राष्ट्रवादाशी बरोबरी करण्याची अपार क्षमता असल्याचं नेहरूंना वाटायचं.
पण दुसऱ्या बाजूला राहुल गांधी स्वतःला सत्ताधाऱ्यांच्या रुपात पाहत नाहीत. त्यांना आपण सत्तेचे विश्वस्त आहोत असं वाटतं. सोनिया गांधी देखील अशाच विश्वस्त म्हणून काम करत राहिल्या.
यामुळेच राहुल गांधीचे निकटवर्तीय इतर राजकीय पक्षांत गेले. काहींनी तर वैचारिक विरोधक असलेल्या भाजपची वाट धरली.
राजकीय निष्ठा ही अत्यंत व्यवहारी असते हे राहुलना एकतर कळलेलं नाही किंवा त्यांना ते समजून घ्यायचं नाही.