नितीश यांच्यावर टीका करणे मला आवडणार नाही - राहुल गांधी

शुक्रवार, 7 जुलै 2017 (09:10 IST)
बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे अध्यक्ष नितीशकुमार यांच्यावर टीका करू नका. अन्यथा, कारवाई केली जाईल, असा थेट संदेश त्या राज्यातील कॉंग्रेस नेत्यांना पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिला आहे. जेडीयूला शांत करण्यासाठी राहुल यांनी हे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे.
 
बिहारमध्ये जेडीयू, राजद आणि कॉंग्रेस महाआघाडीची सत्ता आहे. मात्र, राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीवरून या मित्रपक्षांमध्ये फाटाफूट पाहावयास मिळाली. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना जेडीयूने पाठिंबा दिला आहे. तर कॉंग्रेस, राजदसह 17 विरोधी पक्षांनी मीराकुमार यांना उमेदवारी दिली आहे. कोविंद यांना पाठिंबा दिल्यावरून बिहारमधील राजद आणि कॉंग्रेस नेत्यांनी नितीश यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू केला. त्यामुळे महाआघाडीमधील मित्रपक्षांचे संबंध ताणले गेल्याचे चित्र एकीकडे निर्माण झाले.
 
तर दुसरीकडे भाजपच्या विरोधात राजकीय संघर्ष करण्यासाठी विरोधकांना एकत्र आणण्यासाठी कॉंग्रेस प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांना तडा जाऊ नये या उद्देशातून राहुल यांनी कॉंग्रेस नेत्यांसाठी नितीश यांच्यावर टीका न करण्याचे फर्मान सोडल्याचे मानले जात आहे. दरम्यान, राहुल यांच्या कृतीमुळे सुखावलेल्या जेडीयूने उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधकांबरोबर राहण्याचे संकेत दिले आहेत.

वेबदुनिया वर वाचा