उद्धव ठाकरेंना ‘मोहम्मद ठाकरे ’ म्हणणाऱ्या तेजिंदर बग्गांच्या अटकेवरून 3 राज्यांचे पोलीस भिडले

शुक्रवार, 6 मे 2022 (17:08 IST)
भाजप नेते तेजिंदर पाल सिंग बग्गा यांना पंजाब पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली. ते त्यांना पंजाबला घेऊन जात असतानाच हरयाणा पोलिसांनी पंजाब पोलिसांना अडवलं. अखेर त्यांनवी तेजिंदर यांची सुटका करून त्यांना दिल्ली पोलिसांसोबत दिल्लीकडे पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या प्रकरणाची सर्वत्र चर्चा आहे.
 
तेजिंदर पाल सिंह बग्गा हे दिल्ली भाजपचे प्रवक्ते आहेत. देशातील राजकीय घडामोडींवर ते भाजपची भूमिका मांडताना माध्यमांमध्ये दिसतात. सोशल मीडियावरही ते प्रचंड सक्रिय असतात.
 
बग्गा यांनी वापरलेल्या आक्रमक आणि आक्षेपार्ह भाषेमुळे अनेकवेळा वादही निर्माण झाल्याचं दिसून आलं आहे.
 
तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 'मोहम्मद' संबोधलं होतं. त्यावरूनही वाद निर्माण झाला होता.
 
आता बग्गा यांच्या अटकेलाही त्यांची आक्षेपार्ह वक्तव्येच कारणीभूत ठरली आहेत. या पार्श्वभूमीवर तेजिंदर पाल सिंग बग्गा कोण आहेत, हे संपूर्ण प्रकरण काय आहे, याची आपण आज माहिती घेऊ -
 
तेजिंदर यांना अटक का झाली?
पंजाबच्या मोहाली येथील सायबर क्राईम पोलीस ठाण्यात तेजिंदर पाल सिंह बग्गा आणि इतरांविरुद्ध धार्मिक वैमनस्य पसरवणं आणि धमकावणं या संबंधित गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे प्रवक्ते डॉ. सनी सिंह अहलुवालिया यांच्या तक्रारीवरून बग्गा यांच्याविरुद्ध FIR दाखल करण्यात आला.
 
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध शेरेबाजी केल्याचे आरोपही बग्गा यांच्यावर होते.
 
बग्गा यांनी द काश्मीर फाईल्स चित्रपटासंदर्भात केजरीवाल यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे बग्गा यांना नेमके कोणत्या प्रकरणात अटक झाली, याबाबत स्पष्ट माहिती अद्याप समोर आली नाही.
 
बग्गा यांनी 30 मार्च रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरासमोर आंदोलनही केलं होतं. त्यावेळी केजरीवाल यांना 'जगू देणार नाही' असं वक्तव्य बग्गा यांनी केलं होतं.
 
या घटनेनंतर पंजाबमध्येही तेजिंदर बग्गा आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल झाला होता.
 
बग्गा यांनी 22 एप्रिलला केलेल्या एका ट्वीटमध्ये केजरीवाल यांचा एकेरी उल्लेख करत म्हटलं होतं, "अरविंद केजरीवाल जर तुला वाटतं की तू खोटा गुन्हा दाखल करून मला घाबरवशील, तर ती तुझा तो गैरसमज आहे. तुझा दम असेल तितके गुन्हे दाखल कर. मी तुझी पोलखोल करतच राहीन."
 
पंजाब पोलिसांना हरयाणा पोलिसांनी रोखलं
पंजाब पोलिसांचं एक पथक आपल्याला अटक करण्यासाठी आलं होतं, असं ट्वीट तेजिंदर यांनी 2 एप्रिल रोजी केलं होतं. पण कोणत्या गुन्ह्यात आपल्याला अटक होणार, याची माहिती दिली जात नसल्याचं त्यांनी सांगितलं.
 
त्यानंतर पुन्हा पंजाब पोलिसांचं पथक शुक्रवारी पहाटे तेजिंदर यांना अटक करण्यासाठी दिल्लीत दाखल झालं. दिल्लीत अटकेची कारवाई पार पडल्यानंतर तेजिंदर यांना घेऊन ते पंजाबकडे रवाना झाले.
 
शुक्रवारी (6 मे) सकाळी साडेअकराच्या सुमारास पोलिसांचा ताफा हरयाणाच्या कुरुक्षेत्र याठिकाणी पोहोचला. त्यावेळी हरयाणा पोलिसांनी पंजाब पोलिसांना थांबण्यास सांगितलं.
 
कुरुक्षेत्रचे पोलीस अधीक्षक अंशु सिंगला, कर्नालचे पोलीस अधीक्षक गंगा राम पुनिया आणि अंबालाचे पोलीस अधीक्षक जशनदीप सिंह रंधावा याठिकाणी उपस्थित होते.
 
दुसरीकडे, तेजिंदर यांच्या वडिलांच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी पंजाब पोलिसांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला. दिल्ली पोलीस केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारित येतं. हरयाणामध्ये भाजपचं सरकार आहे. तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार आहे, हे या प्रकरणात आपण लक्षात घेतलं पाहिजे.
 
दरम्यान, इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीनुसार, दिल्लीच्या जनकपुरी परिसरात तेजिंदर यांना अटक करण्यापूर्वी पंजाब पोलिसांनी या प्रकरणाची माहिती जनकपुरी पोलीस ठाण्यात दिली होती, असा दावा करण्यात येत आहे.
 
आता मात्र तीन राज्यांच्या पोलिसांनी केलेल्या या नाट्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
 
तेजिंदर पाल सिंग बग्गा कोण आहेत?
36 वर्षीय तेजिंदर पाल सिंह बग्गा दिल्लीचे भाजप प्रवक्ते असल्याचं आपण वर वाचलंत. याशिवाय ते भाजपच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय सचिवसुद्धा आहेत.
 
तेजिंदर हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. 2020 च्या विधानसभा निवडणुकीत ते दिल्लीच्या हरीनगर मतदारसंघातून भाजपकडून उमेदवार होते. पण या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
 
त्यांच्या ट्वीटर खात्यावर 9.18 लाख फॉलोअर्स आहे. ट्वीटरवर मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्यामुळेच त्यांना भाजपची उमेदवारी देण्यात आली होती, असं म्हटलं जातं.
 
भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत तेजिंदर यांचं नाव आलं नव्हतं. तेव्हा त्यांच्या उमेदवारीसाठी ट्वीटरवर एक मोहिमसुद्धा चालवण्यात आली होती. इतकंच नव्हे तर यादीत नाव नसल्याच्या मुद्द्यावरून त्यांचं ट्रोलिंगही काही जणांनी केलं होतं.
 
तेजिंदर पाल सिंह बग्गा यांना 2017 मध्ये दिल्ली भाजपचे प्रवक्ते बनवण्यात आलं होतं.
 
सुरुवातीला बग्गा यांनी आम आदमी पक्षाचे माजी नेते ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला होता.
 
भूषण यांनी त्यावेळी काश्मीरमध्ये जनमताचा कौल घेण्याची मागणी केली होती. त्याविरोधात बग्गा यांनी हल्ला केला असा आरोप त्यांच्यावर होता.
 
हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट आहे. त्यावेळी या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले होते, "देश तोडण्याची भाषा करणाऱ्याचे असेच हाल होतील. कुणी तुमच्या आईला शिव्या देईल, तुम्ही ते ऐकून घ्याल का?"
 
2014 मध्ये काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी नरेंद्र मोदींविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावेळी चहा किटली घेऊन त्यांनी अय्यर यांच्या घरासमोर आंदोलन केलं होतं.
 
अशा प्रकारचे उपक्रम करण्यात ते पटाईत आहेत. कधी केजरीवाल बेपत्ता असल्याचे पोस्टर लावणं, नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदासाठी रॉक परफॉर्मन्स करणं, अशा लक्षवेधी गोष्टी करून ते माध्यमांमध्ये चर्चेत असतात.
 
उद्धव ठाकरेंना मोहम्मद संबोधलं
तेजिंदर पाल सिंग बग्गा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका ट्वीटमध्ये मोहम्मद म्हणून संबोधल्याची नुकतीच चर्चा झाली होती.
 
3 मे रोजी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर हिरव्या रंगात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. या फोटोवर प्रतिक्रिया देताना बग्गा यांनी उपरोधिकपणे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
 
मोहम्मद उद्धव ठाकरे यांच्या कामाने मी प्रभावित झालो आहे, असं वक्तव्य तेजिंदर बग्गा यांनी केलं होतं.
 
यानंतर लोकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर केलेल्या रोषणाईचे केल्याची आठवण त्यांना करून दिली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती