पीएमओच्या माहितीनुसार, ३० जून रोजी पंतप्रधान मोदींची निव्वळ संपत्ती २.८५ कोटी रुपये होती. यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ३६ लाख रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्यावर्षी त्यांची संपत्ती २.४९ कोटी रुपये होती. त्यांच्या बँक खात्यात ३.३ लाख रुपये जमा झाल्याने तसेच गुंतवणुकीची ३३ लाख रुपयांची रक्कम खात्यात जमा झाल्याने ही वाढ दिसून येत आहे.
दरम्यान, जून महिन्याच्या शेवटी पंतप्रधान मोदींकडे ३१,४५० रुपये रोख रक्कम होती. तर गांधीनगरच्या एसबीआय बँकेच्या खात्यात २,३८,१७३ रुपये रक्कम होती. त्याचबरोबर याच शाखेत मोदींची मुदत ठेव असून विविध प्रकारे जमा झालेली रक्कम १,६०,२८,९३९ इतकी आहे.
पंतप्रधानांकडे ८,४३,१२४ रुपयांची राष्ट्रीय बचत पत्रे, १,५०,९५७ रुपयांच्या एलआयसी पॉलिसीज आणि २०,००० रुपयांचे करबचतीचे इन्फ्रा बॉण्ड्सही आहेत. तर १.७५ कोटी रुपयांची अस्थावर संपत्ती आहे.