जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने अनेक पाकिस्तानी युट्यूब चॅनेल्सवर प्रक्षोभक आणि संवेदनशील सांप्रदायिक सामग्री पसरवल्याबद्दल कठोर कारवाई केली आहे. 6.3 कोटी सबस्क्रायबर्स असलेल्या एकूण 16 पाकिस्तानी युट्यूब चॅनेलवर बंदी घालण्यात आली आहे. ज्या चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे त्यात माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तरचा यूट्यूब चॅनेल देखील समाविष्ट आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या शिफारशींनुसार यूट्यूब चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे.
बंदी घातलेल्या प्लॅटफॉर्ममध्ये डॉन, समा टीव्ही, एआरवाय न्यूज, बोल न्यूज, रफ्तार, जिओ न्यूज आणि सुनो न्यूज या वृत्तवाहिन्यांचे यूट्यूब चॅनेल समाविष्ट आहेत. पत्रकार इर्शाद भट्टी, आस्मा शिराजी, उमर चीमा आणि मुनीब फारूख यांच्या यूट्यूब चॅनेलवरही बंदी घालण्यात आली आहे. बंदी घातलेल्या इतर हँडलमध्ये द पाकिस्तान रेफरन्स, समा स्पोर्ट्स, उजैर क्रिकेट आणि रझी नामा यांचा समावेश आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानशी तणावपूर्ण संबंध असताना, अशा YouTube चॅनेल भारत, त्याचे सैन्य आणि सुरक्षा एजन्सींविरुद्ध प्रक्षोभक आणि संवेदनशील सामग्री, खोटी आणि दिशाभूल करणारी विधाने आणि चुकीची माहिती पसरवत होते. या दहशतवादी हल्ल्यात 25 पर्यटक आणि एका काश्मिरीची दहशतवाद्यांनी निर्घृण हत्या केली.
जर कोणी या बंदी घातलेल्या YouTube चॅनेलना भेट देण्याचा प्रयत्न केला तर त्याला असा संदेश दिसेल - 'राष्ट्रीय सुरक्षा किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित सरकारी आदेशांमुळे, ही सामग्री सध्या या देशात उपलब्ध नाही.'
या हल्ल्यात सहभागी असलेल्यांना आणि त्यांच्या आश्रयदात्यांना अशी शिक्षा दिली जाईल की ज्याची त्यांनी कल्पनाही केली नसेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. त्यांनी देशवासीयांना वचन दिले की प्रत्येक दहशतवादी आणि त्याचे सहाय्यक शोधले जातील, पकडले जातील आणि त्यांना शिक्षा केली जाईल.