केंद्रीय कृषीमंत्री राधा मोहन सिंह शनिवारी नागपूर दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खा. प्रकाश गजभिये यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला आर्थिक मदत करावी, अशी मागणी निवेदनाव्दारे केली. निवडणुकांच्या काळात भाजपा ने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र तीन वर्ष उलटल्यानंतरही सरकारने आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. आज राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात आहे. त्यामुळे लवकरात लवकर कर्जमाफी द्यावी, अशी मागणी आमदार गजभिये यांनी केली.
कर्जमाफीच्या आश्वासनामुळे राज्यातील जनतेने भाजपला भरभरुन मतदान केले. पण या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीच काय दुष्काळी मदतही दिली नाही. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत राज्यातील जवळपास १० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्य सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा म्हणजे फसवेगिरीचे आणखी एक उदाहरण आहे. राज्यातील बळीराजाला संताप अनावर झाला आहे. म्हणून राज्यभरात आक्रोश दिसून येतोय. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेत युपीए सरकारच्या काळात तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले होते. या सरकारनेही शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेत शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी या निवदनाच्या माध्यमातून करण्यात आली.