नितीश कुमार: वारंवार बाजू बदलूनही सत्ता अबाधित राखणारा नेता
सोमवार, 29 जानेवारी 2024 (12:25 IST)
रविवार, 28 जानेवारी 2024 रोजी नितीश कुमार यांनी नवव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना शपथ दिली. राजद आणि काँग्रेससोबतच्या महाआघाडीपासून विलग होऊन त्यांनी अवघ्या दीड वर्षांत पुन्हा एकदा भाजपसोबत हातमिळवणी करून नवीन सरकार स्थापन केलं आहे.
नितीश कुमार रविवारी सकाळी 11 वाजता राजभवनात पोहोचले आणि राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. त्यांनी महाआघाडीपासून विलग होण्याची घोषणाही केली.
प्रसारमाध्यमांना म्हणाले, "मी राजीनामा दिला आहे आणि आता सरकार बरखास्त झालंय. आम्ही लोकांचं आणि पक्षाचं मत विचारात घेऊन त्यानंतर हा निर्णय घेतलाय.”
गेल्या आठवड्यापासून नितीश कुमार राजदसोबतची युती तोडून पुन्हा भाजपसोबत युती करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात होती. शेवटच्या क्षणापर्यंत नितीश यांनी याबाबत अधिकृतपणे काहीही सांगितलं नाही, परंतु बिहारच्या राजकारणात त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड असा आहे की कोणताही अंदाज आणि शक्यता खरी ठरू शकते आणि तेच घडलं.
राज्यपालांची भेट घेतल्यानंतर नितीश काय म्हणाले?
नितीश कुमार यांना त्यांच्या राजीनाम्याचं कारण विचारण्यात आल्यावर ते म्हणाले, "गोष्टी सुरळीत सुरू नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली. काही अडचणी होत्या.
"आम्ही त्यावर लक्ष ठेवून होतो. पक्षांतर्गत आणि इकडून-तिकडून मतं ऐकायला येत होती. सर्वांचं म्हणणं ऐकल्यानंतर आम्ही सर्वांनी राजीनामा दिला आणि सरकार बरखास्त केलं."
ते म्हणाले, "आधीची युती सोडून आम्ही स्थापन केलेल्या नव्या आघाडीत येऊन दीड वर्षं उलटलं तरी परिस्थिती योग्य वाटत नव्हती आणि कामाबाबत त्यांच्याकडून जे दावे केले जात होते, त्यामुळे (आमच्या) लोकांना त्याचं वाईट वाटत होतं."
नितीश यांचा राजकीय प्रवास
नितीश कुमार यांनी ऑगस्ट 2022 मध्ये भाजपसोबतची युती तोडली आणि राजदसोबत हातमिळवणी केली.
नितीश कुमार यांचा हा राजकारणातील पहिलाच यू-टर्न नव्हता. त्यामुळेच त्यांनी भाजपसोबतची युती तोडून राजदसोबत नवीन सरकार स्थापन केल्याबद्दल तेव्हा आश्चर्य वाटलं नव्हतं.
गेल्या काही दिवसांपासून बिहारची राजधानी पाटणा येथून येणारे सर्व संकेत याच वस्तुस्थितीकडे बोट दाखवत होते की, 'इंडिया आघाडीला एकत्र करण्याचा प्रयत्न करणारे नितीश कुमार आता स्वतःच ही महाआघाडी सोडून दुसऱ्या आघाडीत सामील होऊ शकतात आणि एक नवा राजकीय पर्याय निर्माण करण्याचा ते प्रयत्न करत होते.
कदाचित उघडपणे नाही, पण इंडिया आघाडीतील जागावाटपाच्या दिरंगाईमुळे नितीश कुमार नाराज होते आणि त्यामुळे ते पुढचं राजकीय पाऊल उचलू शकतात, असे संकेत जदयूकडून दिले जात होते.
महाआघाडीत फूट पडल्याच्या सुरूवातीच्या संकेतांनंतर शनिवारी दुपारपर्यंत हे जवळजवळ स्पष्ट झालं की राजद आणि जदयूमध्ये सर्व काही आलबेल नाही आणि भविष्यात नितीश कुमार आणि राजद वेगवेगळ्या मार्गाने जातील. रविवारी नितीश यांच्या वक्तव्याने याला दुजोरा मिळाला.
नितीश कुमार यांची आतापर्यंतची राजकीय कारकिर्द 'यू-टर्न' घेऊन स्वहिताचे राजकारण करण्याची साक्षीदार राहिली आहे.
नितीश कुमार यांचा जन्म 1 मार्च 1951 रोजी पाटण्याला लागून असलेल्या बख्तियारपूर येथील एका स्वातंत्र्यसैनिकाच्या कुटुंबात झाला. बिहार अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतलेले नितीश कुमार यांचा कल नेहमीच राजकारणाकडे होता.
नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्या आश्रयाने राजकारण सुरू केलं असलं तरी स्वत:चं स्थान निर्माण करायचं असेल तर वेगळं व्हावं लागेल हेही त्यांच्या लक्षात आलं.
जवळपास पाच दशकं राजकारणात घालवलेल्या नितीश कुमार यांनी आपल्या सोयीनुसार पक्ष आणि आघाड्या बदलल्या आहेत.
नितीश कुमार यांनी 1974 ते 1977 दरम्यान जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात भाग घेतला. सत्येंद्र नारायण सिन्हा यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षातून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात केली.
1985 मध्ये नितीश कुमार पहिल्यांदा हरनौत मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. या काळात ते बिहारमध्ये विरोधी पक्षात बसलेले लालू प्रसाद यादव यांचे सहकारी होते.
आणीबाणीच्या विरोधात उभ्या राहिलेल्या जनता दलाची शकलं झाली. 1994 मध्ये जॉर्ज फर्नांडिस यांनी समता पक्षाची स्थापना केली. त्यात नितीश कुमारही सामील झाले. पुढच्या वर्षी बिहार विधानसभा निवडणुकीत समता पक्षाला फक्त 7 जागा मिळाल्या.
आधी समता पक्ष, नंतर भाजप
बिहारमध्ये समता पक्ष स्वबळावर लढू शकत नाही हे नितीश कुमार यांना लक्षात आलेलं. 1996 मध्ये त्यांनी भाजपसोबत युती केली.
1989 मध्ये पहिल्यांदा खासदार झालेल्या नितीश कुमार यांनी 1998 ते 2001 दरम्यान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये विविध खात्यांची केंद्रीय मंत्रिपदं सांभाळली.
नितीश कुमार 2001 ते 2004 दरम्यान वाजपेयी सरकारमध्ये रेल्वेमंत्री होते.
दरम्यान, 2000 साली 3 मार्च ते 10 मार्च दरम्यान नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्रीही झाले. नितीश कुमार यांना केवळ सात दिवसांचं मुख्यमंत्रीपद मिळालं असलं तरी त्यांनी लालूप्रसाद यादव यांच्या विरोधात स्वत:ला एक सशक्त पर्याय म्हणून उभं केलं होतं.
2004 पर्यंत केंद्रात मंत्री असलेले नितीश कुमार 2005 मध्ये राज्याच्या राजकारणात परतले आणि मुख्यमंत्री झाले.
गेल्या जवळपास 19 वर्षात 2014-15 मध्ये जीतनराम मांझी यांचा दहा महिन्यांचा कार्यकाळ वगळता नितीश कुमार बिहारच्या मुख्यमंत्रीपदी आहेत.
मात्र, या काळात नितीश कुमार आपल्या सोयीनुसार मित्रपक्ष बदलत राहिले.
पाटण्यातही शनिवारी राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं. जनता दल युनायटेड, राष्ट्रीय जनता दल, हिंदुस्थानी अवाम मोर्चा आणि भाजपचे नेते बैठकांमध्ये व्यस्त होते.
प्रसारमाध्यमांकडून असा दावा केला जात होता की, नितीश कुमार बाजू बदलून भाजपसोबत जातील आणि लवकरच भाजप आणि जदयूच्या नव्या युतीचं चित्र स्पष्ट होईल. परंतु रविवारी सकाळी नितीश कुमार यांनीच रविवारी राजीनामा देऊन आणि संध्याकाळी भाजपसोबत सरकार स्थापन करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत शक्यतांवर शिक्कामोर्तब केलं.
नितीश कुमार हे गेल्या दोन दशकांपासून बिहारच्या राजकारणाचे केंद्रबिंदू राहिले आहेत. नितीश कुमार यांनी गेल्या दशकभरात पाचव्यांदा बाजू बदलली आहे.
1996 मध्ये नितीश कुमार यांनी भाजपसोबत युती केली. भाजपसोबत नितीश कुमार यांची ही युती 2013 पर्यंत टिकली. नितीश यांनी भाजपसोबत निवडणूक लढवली आणि बिहारमध्ये सत्ता स्थापन केली.
भाजप आणि नितीश कुमार 17 वर्षे बिहारच्या राजकारणात एकत्र होते.
2014 मध्ये भाजपने नरेंद्र मोदींना लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून घोषित केल्यानंतर नितीश कुमार यांनी पहिल्यांदा भाजपपासून विलग होण्याचा मार्ग स्वीकारला.
17 वर्षांनी भाजपपासून दूर राहिले, मग पुन्हा एकत्र आले
मोदींना विरोध करत नितीश कुमार भाजपपासून वेगळे झाले आणि 2014ची लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवली.
गेल्या लोकसभेत 20 खासदार असलेल्या जदयूला केवळ दोन जागांवर विजय मिळाला. निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस पक्षासोबत युती केली.
2015 मध्ये नितीश यांनी राजद आणि काँग्रेससोबत महाआघाडी स्थापन करून निवडणूक लढवली आणि महाआघाडीला प्रचंड बहुमत मिळालं. नितीश पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले आणि तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री झाले.
ही महाआघाडी केवळ दोन वर्षे टिकली आणि नितीश यांनी 2017 मध्ये महाआघाडीशी संबंध तोडले. नितीश यांनी भाजपसोबत आघाडी करून सरकार स्थापन केलं आणि भाजप नेते सुशील मोदी त्यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले.
2020 मध्ये नितीश यांनी भाजपसोबत विधानसभा निवडणूक लढवली आणि सत्तेत परतले. मात्र, जदयूच्या जागा भाजपच्या तुलनेत कमी होत्या. भाजपला 74 तर जदयूला फक्त 43 जागा मिळाल्या होत्या. राज्यात तिसरा पक्ष असूनही नितीश कुमार मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले.
नितीश कुमार हे युतीचे मुख्यमंत्री होते पण त्यांच्या पक्षाच्या कमी जागांमुळे त्यांच्यावर भाजपचा दबाव वाढत होता. दोन वर्षे भाजपसोबत सरकार चालवल्यानंतर नितीश कुमार यांनी पुन्हा मार्ग बदलला आणि राजद आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केलं.
ऑगस्ट 2022 मध्ये नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि तेजस्वी यादव त्यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले.
यावेळी नितीश कुमार यांनी भाजपविरोधात कडक भूमिका घेतली. त्यांनी राष्ट्रीय पातळीवर भाजपविरोधात विरोधी पक्षांची आघाडी उभी करण्यासाठी प्रयत्न केले.
नितीश कुमार यांनी आपल्या एका वक्तव्यात भाजपबद्दल म्हटलेलं की, "मरण आलं तरी तरी चालेल, पण त्यांच्यासोबत जाणं आम्हाला कधीही मान्य होणार नाही."
नितीश कुमार यांनी 30 जानेवारी 2023 रोजी माध्यमांशी बोलताना हे वक्तव्य केलेलं. अवघ्या वर्षभराच्या आतच नितीश कुमार यांनी पुन्हा भाजपसोबत हातमिळवणी केली आहे.
या काळात नितीश कुमार यांच्याबाबत भाजपनेही कडक भूमिकाही घेतल्याचं पाहायला मिळालं. एप्रिल 2023 मध्ये भाजपचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले होते, "मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगू इच्छितो की, निवडणुकीच्या निकालानंतर नितीश बाबूंना पुन्हा भाजपमध्ये सामील केलं जाईल याबद्दल कोणाच्या मनात शंका असेल, तर बिहारच्या जनतेला आणि लल्लन बाबूंनासुद्धा मला हे स्पष्टपणे सांगायचंय की तुमच्यासाठी भाजपचे दरवाजे कायमचे बंद झालेले आहेत."
मात्र, आता नितीश कुमार आणि भाजप या दोघांची भूमिका बदलली आहे. नितीश कुमार यांना भाजपसोबत जाण्यास किंवा त्यांना देण्यास भाजपलाही कोणताच संकोच वाटला नाही.
भाजप नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदींना पत्रकारांनी नितीश कुमार यांच्या पुनरागमनाबद्दल प्रश्न विचारला असता ते म्हणाले, राजकारणात कोणतेही दरवाजे बंद होत नाहीत. गरजेनुसार दरवाजा बंद होतो आणि उघडत राहतो.
शुक्रवारी राजदचे खासदार मनोज कुमार झा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, "मुख्यमंत्री नितीश कुमार हे आघाडीचे प्रमुख आहेत त्यामुळे त्यांनी संध्याकाळपर्यंत आघाडीबद्दल उपस्थित केल्या जात असलेल्या शंकांना पूर्णविराम द्यावा."
तेव्हा जदयूचे मुख्य प्रवक्ते नीरज कुमार उत्तरादाखल म्हणाले की, "नितीश कुमार गोंधळाचं राजकारण करत नाहीत. नितीश कुमार राज्याचे निवडून आलेले मुख्यमंत्री आहेत आणि राहतील."
नितीश कुमार हे बिहारचे निवडून आलेले मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीवरून हे स्पष्ट झालंय की त्यांना भविष्यातही मुख्यमंत्रीपदी राहायचंय आणि कदाचित त्यामुळेच ते पुन्हा एकदा त्यांचे राजकीय मित्रपक्ष बदलण्याच्या मार्गाने जातायत.
बिहार विधानसभेत संख्याबळाच्या बाबतीत नितीश यांचा पक्ष राजद आणि भाजपपेक्षा खूपच कमकुवत असला तरी, नितीश कुमार यांचं राजकीय कौशल्य यातंच आहे की, त्यांच्या पक्षाची कोणतीही मजबूत रचना नसतानाही त्यांनी लोकांचं समर्थन मिळवून कार्यकर्ते असलेल्या पक्षांना कोंडीत पकडण्याची किमया साधली आहे.
महादलितांचं राजकारण
2007 मध्ये नितीश कुमार यांनी दलितांमधील सर्वांत मागासलेल्या जातींसाठी 'महादलित' श्रेणी तयार केली. यासाठी सरकारी योजना आणल्या. 2010 मध्ये घरं, शिक्षणासाठी कर्ज आणि शालेय गणवेश देण्याच्या योजना सुरू करण्यात आल्या.
आजघडिला बिहारमध्ये सर्व दलित जातींचा महादलित श्रेणीत समावेश करण्यात आलाय. 2018 मध्ये पासवानांना महादलित दर्जाही देण्यात आला होता.
रामविलास पासवान हे बिहारमधील दलितांचे सर्वांत मोठे नेते असले तरी नितीश कुमार यांनी दलितांसाठी ठोस काम केल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.
नितीश कुमार स्वत: 4 टक्के लोकसंख्या असलेल्या कुर्मी जातीतून येतात. परंतु सत्तेत असताना त्यांनी नेहमीच भक्कम जातीच्या वर्गाची मतं ज्या पक्षाकडे आहेत त्या पक्षाशी युती करून निवडणूक लढवली आहे.
नितीश कुमार नेहमी आपल्या सोयीनुसार युती करत राहिले आणि तोडत राहिले. त्यांचं पुढचं राजकीय पाऊल काहीही असलं तरी एक गोष्ट स्पष्ट आहे की त्यांना मुख्यमंत्रीपदी कायम राहायचंय.