निठारी हत्याकांड : दोघा आरोपींना फाशीची शिक्षा

सोमवार, 24 जुलै 2017 (17:11 IST)
निठारी बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणात सीबीआय न्यायालयाने सोमवारी मोहिंदर सिंह पंढेर आणि त्याचा नोकर सुरेंद्र कोलीला फाशीची शिक्षा ठोठावली. सीबीआय न्यायालयाचे विशेष न्यायाधीश पवन कुमार त्रिपाठी यांनी पिंकी सरकार या  20 वर्षाच्या तरुणीच्या हत्या प्रकरणात पंढेर आणि कोलीला  फाशीची शिक्षा ठोठावली. बलात्कार, हत्या, अपहरण आणि गुन्हेगारी कट रचणे या आरोपांखाली पंढेर आणि कोलीला दोषी ठरवले. 
 
दोघांच्या विरोधात अनेक गुन्ह्यांची नोंद असून त्यापैकी हे एक प्रकरण आहे. 29 डिसेंबर 2006 रोजी सीबीआयने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. न्यायाधीश शिक्षा सुनावत असताना कोली आणि पंढेर दोघेही न्यायालयात हजर होते. सरकारी वकिल जेपी शर्मा यांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. कोलीने पिंकीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केला. नंतर तिची हत्या केली तसेच पुराव्यांशी छेडछाड केल्याचे फॉरेन्सिक पुराव्यांवरुन सिद्ध झाले आहे. त्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा द्यावी असा युक्तीवाद जेपी शर्मा यांनी केला. 

वेबदुनिया वर वाचा