पुंछमध्ये सर्च ऑपरेशन, NIA करणार तपास, PAFF ने घेतली दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी
शुक्रवार, 21 एप्रिल 2023 (08:56 IST)
Terrorist attack on army vehicle in Poonch नियंत्रण रेषेला लागून असलेल्या पुंछ जिल्ह्यातील भींबर गली भागात गुरुवारी लष्करी वाहनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. सुरक्षा दल संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबवत आहेत. या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. लष्कराच्या वाहनावरील हल्ल्याची जबाबदारी PAFF या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.
आधी दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला, त्यानंतर ग्रेनेड फेकून लष्कराच्या वाहनाला आग लावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या गोळ्या चीनमध्ये बनवल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. खराब हवामानाचा फायदा घेत दहशतवादी घटनास्थळावरून पळून गेले.
भटाधुलियानला लागून असलेल्या चामरेड जंगलात अनेकदा दहशतवादी हल्ले झाले आहेत. एनआयएचे पथक घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू केला आहे. दिल्लीतील गुप्तचर अधिकारीही पुंछमध्ये पोहोचले आहेत. लष्करप्रमुखांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी 3 च्या सुमारास आगीमुळे पूर्णपणे जळून खाक झालेले लष्करी वाहन भिंबर गली येथून लष्करी जवानांना घेऊन सांगोटच्या दिशेने जात होते. आग एवढी भीषण होती की काही मिनिटांतच वाहन पूर्णपणे जळून खाक झाले. लष्कराच्या एका जवानावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला करण्यात आल्याचे मानले जात आहे.
वाहनातील जवान इफ्तार पार्टीसाठी सामान घेण्यासाठी जात होते. या पार्टीसाठी आजूबाजूच्या गावातील लोकांना बोलावण्यात आले होते.
पूंछ जिल्ह्यापासून 90 किमी अंतरावर झालेल्या या हल्ल्यात हवालदार मनदीप सिंग, हरकिशन सिंग, लान्स नाईक कुलवंत सिंग, शिपाई सेवक सिंग आणि लान्स नाईक देबाशिष बसवाल हे पाच जवान शहीद झाले. यातील 4 जवान पंजाबचे होते.