नेट परीक्षेची तारीख लवकरच जाहीर

शनिवार, 16 मे 2020 (16:31 IST)
राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) 2020 च्या परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली.
 
वेबिनारच्या माध्यमातून त्यांनी देशभरातील शिक्षकांशी संवाद साधला. ज्यांनी  नवोदय विद्यालयाची भरती प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांना लॉकडाउननंतर नियुक्ती मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
सध्या देश अभूतपूर्व अशा आरोग्य विषयक आणिबाणीच्या परिस्थितीतून जात आहे. पालक आणि विद्यार्थी दोघांनाही आपापल्या विवंचना आहेत. अशावेळी शिक्षकांची जबाबदारी वाढते. कारण ते एकाच वेळी बरच मुलांचे पालक असतात आणि त्यांना कोणताही पक्षपात न करता प्रत्येकाची काळजी घ्यावी लागते. शिक्षकांनी त्यांची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल ते कौतुकास पात्र आहेत. शिक्षकांनी केलेल्या प्रयत्नांमुळे देशातील ऑनलाईन शिक्षण व्यवस्था  यशस्वी झाली आहे. बरेच शिक्षक तंत्रज्ञानामध्ये तज्ञ नव्हते परंतु तरीही त्यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी स्वतः प्रशिक्षण घेतले आणि ऑनलाइन शिक्षणामध्ये योगदान दिले आहे, असे पोखरीयाल यांनी सांगितले.
 
लॉकडाऊन नंतर शाळा सुरू करण्याबाबत ते म्हणाले शाळा प्रशासन आणि शिक्षक हे शाळा स्तरावर सर्व संबंधितांच विशिष्ट भूमिका व जबाबदार निश्चित करणे, आरोग्य व स्वच्छता आणि इतर गोष्टी निश्चित करणे यासारखी विविध कामे पार पाडतील.
 
शिक्षकांना प्रशिक्षण देण्याच्या विषयावर बोलताना म्हणाले की, ऑनलाइन शिक्षण प्रणालीसाठी पूर्ण तयारीनिशी प्रशिक्षण सुरु असून लाखो शिक्षकांनी याचा लाभ घेतला आहे. ई-लर्निंग संसाधनांच्या वापरासाठी पंडित मदन मोहन मालवी राष्ट्रीय शिक्षक प्रशिक्षण अभियानांतर्गत शिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये शिक्षकांचा सहभाग वाढला असून विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी स्वतःला नवीन तंत्रज्ञानाशी जोडण्याची तयारी शिक्षकांनी दर्शविली आहे, असे मंत्र्यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती