नीना सिंह : CISF च्या 54 वर्षांच्या इतिहासातील पहिल्या महिला महासंचालक

शनिवार, 30 डिसेंबर 2023 (10:57 IST)
युनिफॉर्मवरील लावलेली पदकं, खांद्यावर आयपीएसचं प्रतीक असलेल्या अशोक स्तंभांचं चिन्ह, एक एक पाऊल सावकाश टाकत त्या चालत होत्या आणि तलवार घेऊन मागे चालणारा एक सैनिक.
हे वर्णन केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या म्हणजेच CISF च्या पहिल्या महिला संचालक बनलेल्या नीना सिंह यांच्या पदग्रहण सोहळ्यावेळचं आहे.
 
वरिष्ठ आयपीएस अधिकारी नीना सिंह यांना 29 डिसेंबर 2023 रोजी दिल्लीतील CISF मुख्यालयात जवानांनी 'गार्ड ऑफ ऑनर' दिला. नीना सिंह या CISF च्या पहिल्या महिला महासंचालक बनल्या आहेत.
 
CISF च्या महासंचालकपदी नीना सिंह यांची नियुक्ती म्हणजे या केंद्रीय दलाच्या इतिहासातील मैलाचा दगड असल्याचं CISF ने म्हटलं आहे.
 
केंद्रीय गृह मंत्रालयाने गुरुवारी (28 डिसेंबर) केंद्रीय राखीव पोलीस दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि इंडो-तिबेट सीमा पोलिसांच्या नवीन महासंचालकांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले.
 
यामध्ये भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकारी नीना सिंह यांची सर्वाधिक चर्चा झाली आहे.
 
नीना सिंह या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) महासंचालकपदी नियुक्त झालेल्या पहिल्या महिला आहेत.
 
आयपीएस अधिकारी नीना सिंह यांनी दिल्लीतील CISF मुख्यालयात महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला.
 
असा आहे नीना सिंह यांचा प्रवास
1969 मध्ये स्थापन झालेल्या CISF ला 54 वर्षांनंतर पहिल्या महिला महासंचालक मिळाल्या आहेत.
 
नीना सिंह 31 जुलै 2024 रोजी सरकारी सेवेतून निवृत्त होणार आहेत.
 
नीना सिंह यांनी 2021 मध्ये CISF मध्ये अतिरिक्त महासंचालक म्हणून काम केलं आहे.
 
महासंचालक पदावर नियुक्तीचे आदेश जारी होण्यापूर्वी त्या CISF मध्ये विशेष महासंचालक पदावर कार्यरत होत्या.
 
11 जुलै 1964 रोजी जन्मलेल्या नीना सिंह या राजस्थान केडरच्या 1989 बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्या मूळच्या बिहारची राजधानी पाटणा येथील आहे.
 
नीना सिंह यांनी एमएपर्यंत शिक्षण घेतले आहे. याशिवाय, राजस्थानमधील पोस्टिंग दरम्यान, जुलै 2004 मध्ये त्या हार्वर्ड विद्यापीठाच्या केनेडी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटमध्ये परदेशात अभ्यासासाठी गेल्या होत्या.
 
2013 ते 2018 पर्यंत त्यांनी दिल्लीतील सेंट्रल ब्यूरो ऑफ इन्वेस्टिगेशन (CBI) मध्ये सहसंचालक म्हणून प्रतिनियुक्तीवर काम केलं.
 
सीबीआयमध्ये पोस्टिंग दरम्यान त्या शीना बोरा हत्या, जिया खान आत्महत्या यांसारख्या अनेक प्रसिद्ध प्रकरणांच्या तपासाशी संबंधित होत्या.
 
नीना सिंह यांचे पती रोहित सिंह हे 1989 च्या बॅचचे आणि राजस्थान कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत.
 
मूळचे उत्तर प्रदेशचे असलेले रोहित सिंह 2021 पासून केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहे. सध्या ते केंद्र सरकारमध्ये सचिव आहेत.
 
राजस्थानच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक
आयपीएस झाल्यानंतर नीना सिंह 1992 मध्ये राजस्थान पोलीसात जयपूरमधील एएसपी महिला पोलिस स्टेशनमध्ये रुजू झाल्या.
 
राजस्थान केडरच्या आयपीएस अधिकारी नीना सिंह यांच्या नावावर आणखी एक ऐतिहासिक कामगिरी आहे.
 
2021 मध्ये डीजी (महासंचालक) पदावर नियुक्ती झालेल्या राजस्थानच्या त्या पहिल्या महिला पोलीस अधिकारी आहेत. त्या काळात नीना सिंह यांच्याकडे डीजी (सिव्हिल राइट्स एंड एंटी ह्यूमन ट्रॅफिकिंग) पदाची जबाबदारी होती.
 
त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक, अति उत्कृष्ठ सेवा पदक आणि पोलीस पदक देऊन गौरविण्यात आलं आहे.
 
सरकारी सेवेतील बहुतांश वर्षे त्यांची पोस्टिंग जयपूरमध्ये राहिली. 2020 या वर्षासाठी त्या महिला आयोगाच्या सदस्य सचिव होत्या.
 
यावेळी त्यांनी महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला ज्याची बरीच चर्चा झाली आणि त्यासाठी त्यांनी कार्यक्रम हाती घेतला. ज्यामध्ये महिला आयोगाच्या सदस्या वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन महिलांशी संपर्क साधून त्यांच्या तक्रारी सोडवत होत्या.
 
राजस्थान केडरच्या एका आयपीएस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर म्हणाले, "मॅडम नेहमी 'टू द पॉईंट' बोलतात आणि कामाच्या बाबतीत कठोर असतात. त्या इनफॉर्मली खूप चांगल्या व्यक्ती आहेत. मॅडमची कार्यशैली सर्वांना परिचित आहे. त्यांची निर्णय घेण्याची क्षमता चांगली आहे. निर्णय घेणारे अधिकारी असेल तर ज्युनिअर शिकतात."
 
CISF चं काम काय असतं?
CISF ची स्थापना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल कायदा 1968 अंतर्गत करण्यात आली आहे. हे एक सशस्त्र निमलष्करी दल आहे, ज्यात जवळपास अडीच लाख कर्मचारी आहेत.
 
CISF विमानतळ, दिल्ली मेट्रो, बंदरे, ऐतिहासिक वास्तू, वीज, अंतराळ विभाग, अणुऊर्जा विभाग यासह भारतीय अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रांना सुरक्षा पुरवते.
 
CISF देशाची राजधानी दिल्लीतील महत्त्वाच्या सरकारी इमारती आणि काही खाजगी युनिट्सनाही सुरक्षा पुरवते.
 
विशेष व्यक्तींना देण्यात येणारी झेड प्लस, झेड, एक्स, वाय श्रेणींना CISF सुरक्षा पुरवते..
 
'ती' प्रथम...
54 वर्षांच्या इतिहासात प्रथमच CISFला नीना सिंह यांच्या रूपाने महिला महासंचालक मिळाल्या आहेत. त्याचप्रमाणे इतर अनेक क्षेत्रातही महिलांची प्रथमच नियुक्ती करण्यात आली आहे.
 
जेव्हा डिसेंबर 2019 मध्ये भारतीय नौदलाला बिहारच्या शिवांगी सिंह यांच्या रूपाने पहिल्या महिला पायलट मिळाली.
 
कॅप्टन शिवा चौहान यांना जानेवारी 2023 मध्ये जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीनमध्ये तैनात करण्यात आलं होतं.
 
प्रतिकूल परिस्थितीत जगातील सर्वोच्च रणांगणावर महिला लष्कर अधिकारी तैनात होण्याची ही पहिलीच वेळ होती.
 
नीना सिंह यांनी ज्या राज्यासाठी सेवा दिली त्या राजस्थान विद्यापीठाच्या 76 वर्षांच्या इतिहासात प्रथमच या वर्षी एका महिला कुलगुरूचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
 
2023 पर्यंत राजस्थान विद्यापीठात 43 पुरुष कुलगुरू होते. इथे अल्पना काटेजा यांच्या रूपाने प्रथमच महिला कुलगुरूंची नियुक्ती करण्यात आली.
 
Published By- Priya Dixit
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती