नरेंद्र मोदी भाषण : लशीचे 100 कोटी डोस पूर्ण, हा फक्त आकडा नाही, यात भारताच्या सामर्थ्याचं प्रतिबिंब

शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021 (11:05 IST)
एका बाजूला भारताने कर्तव्याचं पालन केलं. दुसरीकडे त्याला यशही मिळालं. भारताने 100 कोटी लशींचे डोस पूर्ण केले. हे खूप मोठं यश आहे. त्याबद्दल देशवासीयांचे अभिनंदन करतो. 100 कोटी हा फक्त एक आकडा नाही तर आपल्या सामर्थ्याचं ते प्रतिबिंब आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.
 
आज (शुक्रवार, 22 ऑक्टोबर) सकाळी 10 वाजता देशाला संबोधून भाषण करताना मोदी बोलत होते.यावेळी कोरोना लशीसंदर्भात भारताच्या कामगिरीचं जगभरात कौतुक होत असल्याचं मोदींनी सांगितलं. ते पुढे म्हणाले, "लोक भारताच्या लसीकरणाची तुलना इतर देशांशी करत आहेत. भारताने ज्या वेगाने लसीकरणाचा हा टप्पा पूर्ण केला, त्याचं कौतुक केलं जात आहे. पण याची सुरुवात कशी झाली तेसुद्धा महत्त्वाचं आहे.

जगातील इतर मोठ्या देशांसाठी लस शोधणं, त्याचं उत्पादन यासाठीचं तंत्रज्ञान पूर्वीपासून उपलब्ध होतं. आपणही त्यांच्याकडून मिळणाऱ्या लशींवर अवलंबून होतो. त्यामुळे 100 वर्षांतली सर्वात मोठी साथ भारतात आली, तेव्हा अनेक प्रश्न भारतासमोर उपस्थित झाले होते.

लसीचे 100 कोटी डोस सर्व प्रश्नांची उत्तरं देत आहेत
भारत या साथीशी कसा लढणार, इतर देशांकडून लस विकत घेण्यासाठी भारत इतका पैसा कुठून आणेल, भारताला लस मिळणार की नाही, मिळाली तरी नेमकी कधी मिळेल, साथीचा फैलाव रोखण्यासाठी पुरेशा प्रमाणात लसीकरण भारत करू शकेल का, अशा प्रकारचे कित्येक प्रश्न त्यावेळी उपस्थित करण्यात आले.
 
पण आज 100 कोटी लशींचे डोस त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देत आहेत, असं मोदींनी म्हटलं.
 
ते पुढे म्हणाले, "भारताने 100 कोटी लशींचे डोस तेसुद्धा मोफत दिले आहेत. त्यासाठी कोणतेच पैसे घेतले नाहीत. 100 कोटी डोस देण्याचा एक परिणाम असाही होईल की जग भारताला कोरोनापासून सुरक्षित मानेल. औषध निर्मिती क्षेत्रात भारताचं सामर्थ्य जगाला कळेल. संपूर्ण जग भारताची ही ताकद पाहत आहे, त्याची जाणीव त्यांना झाली आहे.
 
लसीकरणात भेदभाव नाही
भारताची लसीकरण मोहीम सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास याचं सर्वोत्तम उदाहरण आहे. भारतासारख्या लोकशाही देशात कोरोना साथीविरुद्ध लढणं खूपच अवघड असेल, असं म्हटलं जात होतं. इतकं संयम, इतके सगळे नियम देशात कसे पाळले जातील, असंही म्हटलं गेलं.
 
पण आमच्यासाठी लोकशाहीचा अर्थ सबका साथ, सबका विकास हा आहे. त्यामुळे सगळ्यांच्याच लसीकरणासाठी प्रयत्न करण्यात आले.
 
गरीब-श्रीमंत, शहरी-ग्रामीण अशा सगळ्या क्षेत्रात काम करण्यात आलं. आजार कोणाबाबतही भेदभाव करत नाही. त्यामुळे लसीबाबतही भेदभाव होऊ शकत नाही. त्यामुळे लसीकरण मोहिमेवर व्हीआयपी संस्कृतीचा प्रभाव पडू नये, याची खात्री केली गेली.
 
कुणी कितीही मोठ्या पदावर असो, कितीही श्रीमंत असो, त्याला लस सामान्य नागरिकांप्रमाणेच मिळेल, असं मोदींनी सांगितलं.लशीसंदर्भात जगभरात असलेल्या उदासीनतेचाही मोदींनी यावेळी उल्लेख केला.
 
ते म्हणाले, "सुरुवातीला असं म्हटलं गेलं की बहुतांश नागरीक लस घेण्यासाठी येणार नाहीत. जगभरात लसीबाबत उदासीनता हे मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे. पण भारतीय नागरिकांनी 100 कोटी लशींचे डोस घेऊन त्या लोकांना निरुत्तर केलं आहे."
 
कोरोनाविरुद्धच्या लढाईला जनआंदोलन बनवलं
कोणत्याही मोहिमेत जेव्हा सगळ्यांचा प्रयत्न जोडला जातो, तेव्हा त्याचे परिणाम अद्भुतच असतात.कोरोना साथीच्या सुरुवातीला महामारीविरुद्धच्या लढाईत आपण जनभागिदारी ही आपली पहिली ताकद बनवली.
 
तीच आपली संरक्षणासाठीही पहिली फळी होती. थाळी, दिवे यांच्या माध्यमातून कोरोनाविरुद्धच्या लढाईला जनआंदोलन बनवण्यात आलं, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती