पहिल्या पत्नीचा खून, मित्राची ओळख चोरून दुसरीसोबत संसार, 15 वर्षांनी कसा सापडला हा आरोपी?
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2023 (15:00 IST)
15 फेब्रुवारी 2003 रोजी अहमदाबादमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तपत्रांनी 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी टाकलेल्या दरोड्याच्या वेळी एका विवाहित महिलेची हत्या झाल्याचं वृत्त होतं.ही महिला मूळची केरळची होती. तिच्या लग्नाला वर्षही झालं नव्हतं.
जेव्हा या खुनातील संशयिताचं नाव समोर आलं, तेव्हा अजून एक धक्का बसला.
या हत्येचा संशय मृत महिलेचा पती तरुण जिनाराज याच्यावर होता. तो फरार असल्याने संशयाला बळ मिळाले होते.
विवाहबाह्य संबंधांमुळे तरूणने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. पळून गेल्यानंतर त्याने स्वतःच्याच मित्राची ओळख चोरली, दुसरे लग्न केले आणि नवीन आयुष्य सुरू केले.
भूतकाळातील त्याच्या एका चुकीमुळे त्यांना 15 वर्षांनी अटक झाली.
त्यामागे पोलिसांच्या एका मानसशास्त्रीय सिद्धांताचाही महत्त्वाचा वाटा आहे.
त्याने कायद्याचा वापर करून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण एक छोटीशी चूक केली आणि त्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आणि देश सोडून पळून जाण्याचा डावही फसला.
विवाह आणि विवाहबाह्य संबंध
2002 मध्ये तरुण जिनाराज अहमदाबादमधील एका खाजगी शाळेत शारीरिक शिक्षण (पीटी) शिक्षक म्हणून कार्यरत होते. यादरम्यान ते एका मुलीच्या प्रेमात पडले. तरुण यांची आई सरकारी बँकेत कामाला होती, तर वडील निवृत्त झाले होते. त्यांनी या नात्याला नकार दिला.
तोपर्यंत ऑनलाइन विवाह संकेतस्थळं किंवा डेटिंग अॅप्स प्रचलित नव्हते. रेल्वे, बँका, शैक्षणिक किंवा वैज्ञानिक संस्थांमध्ये नोकरी करता यावी यासाठी अहमदाबादमध्ये स्थायिक झालेल्या केरळी कुटुंबांमध्ये धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांच्यावेळी लग्नाची बोलणी केली जायची.
मूळ केरळचा असलेल्या आणि अहमदाबादमध्ये राहणाऱ्या तरूणची सजनीसोबत एका जवळच्या व्यक्तीच्या माध्यमातून ओळख झाली. सजनी त्यावेळी एका खाजगी बँकेत कामाला होती आणि तिचे वडील निवृत्त गिरणी कामगार होते.
तरूण कुटुंबाच्या इच्छेविरूद्ध गेला नाही आणि हे लग्न ठरले. अहमदाबादमध्ये राहणाऱा तरुणचा मोठा भाऊ आणि मेहुण्याने या नात्याची आणि लग्नाची सर्व जबाबदारी घेतली.
लग्नानंतर नवविवाहित जोडप्याने भोपाळ परिसरात वैवाहिक जीवन सुरू केले, तर तरुणच्या मोठ्या भावाचे कुटुंब सॅटेलाइट परिसरात राहत होते.
सुरुवातीच्या काही महिन्यांत तरुण आणि सजनी यांच्यात भांडणं सुरू झाली.
पत्नी आणि प्रेयसीसाठी 'व्हॅलेंटाईन डे' गिफ्ट
14 फेब्रुवारीला तरुण आणि त्यांच्या भावाचे कुटुंब एका रेस्टॉरंटमध्ये भेटणार होते. सजनीला प्रमोशन आणि दुसऱ्या दिवशी पुण्याला जायचं तिकिटही एकत्रच हातात आलं. मात्र, हा आपल्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल याची तिला जराही कल्पना नव्हती.
संध्याकाळी तरुणने सासरच्या मंडळींना फोन केला की, 'अज्ञात व्यक्ती लूटमारीच्या उद्देशाने घरात घुसली आणि त्यांनी सजनीची हत्या केली आहे.'
पोलिस आणि फॉरेन्सिक व्यतिरिक्त, श्वान पथकं घटनास्थळी पोहोचली. सजनीच्या गळ्यात गुंडाळलेला स्कार्फ श्वानपथकातील श्वानाने हिसकावला, त्यानंतर श्वान पथकातील श्वान घराबाहेर पडण्याऐवजी आजूबाजूलाच काहीतरी संशयास्पद असल्याचे संकेत देत घरातच भुंकत होता.
तरुण सांगक होता की तो घटनास्थळी उपस्थित नव्हता. घरी येताना वाटेत केक आणि टेडी बेअर खरेदी करण्यासाठी तो थांबला होता.
आपल्या सुखी वैवाहिक आयुष्याचं चित्र उभं करण्याचा त्यांचा शक्य तितका प्रयत्न होता.
यानंतर, 26 वर्षीय सजनीचा मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला, तिथे तरुण यांने छातीत दुखत असल्याची तक्रार केली, त्यामुळे त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
दुसरीकडे घरात सर्व काही विखुरलेले असले तरी रोख रक्कम, मंगळसूत्र, मुद्देमाल तसाच पडून राहिल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यामुळे तरुणला दुसऱ्या दिवशी पोलिस ठाण्यात बोलवण्यात आले.
आपल्या मैत्रिणीवर विनाकारण पैशाची उधळपट्टी करतोय हे लक्षात आल्यानंतर तरुणने अहमदाबाद सोडण्याचा निर्णय घेतला. सजनीच्या खात्यातून एटीएममधून पैसे काढले. यानंतर तरुणने आपल्या मैत्रिणीला फोन करून 'व्हॅलेंटाईन डे' गिफ्ट त्यांच्या 'मार्गातील अडथळा' बनलं असल्याचं सांगितलं.
हे ऐकून तरूण आणि त्याच्या मैत्रिणीमध्ये वादावादी होऊन नात्याचा शेवट झाला. त्यानंतर तरुण त्यांचा मित्र प्रवीण भाटेली यांना भेटायला गेला. पोलिसांच्या श्वानाने संशय व्यक्त केला असतानाही तरुणवर पाळत का ठेवली गेली नाही, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.
नवी ओळख, नवा अध्याय
1990 च्या मध्यात, प्रवीण आणि तरुण यांनी मध्य प्रदेशातील एका महाविद्यालयात शारीरिक प्रशिक्षक म्हणून एकत्र शिक्षण घेतले. दोघेही वसतिगृहात एकत्र राहायचे, त्यामुळे त्यांची जुनी ओळख होती.
ग्वाल्हेरमध्ये काही काळ प्रवीणसोबत काम केल्यानंतर तरुण दिल्लीला गेला. 2019 मध्ये प्रवीणने केलेल्या पोलिस तक्रारीनुसार, ते आणि तरुण जुलै 1995 ते डिसेंबर 1996 पर्यंत एकत्र होते.
दरम्यान, तरुणने ओळखपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रांची प्रत बनवली होती आणि त्या आधारे पासपोर्ट बनवून तो परदेशात गेला होता.
दरम्यान, वकिलांनी सर्व पुरावे सादर केल्यानंतर मध्य प्रदेश उच्च न्यायालयातर्फे 2019 मध्ये या प्रकरणात तरुणला जामीन मंजूर करण्यात आला होता.
काही काळ दिल्लीतील कॉल सेंटरमध्ये घालवल्यानंतर त्याने पुण्यात नोकरी स्वीकारली. इथे त्याने प्रवीण भाटेली ही ओळख धारण केली. प्रवीणच्या नावाने स्वत:चे प्रमाणपत्रही दिले. इथेच त्याला निशा नावाची मुलगी भेटली आणि तो तिच्या प्रेमात पडला.
स्वतःची ओळख प्रवीण म्हणून सांगणा-या तरुण याने निशाला सांगितले की, त्याच्या आई-वडिलांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे आणि अन्नम्मा नावाच्या काकूने त्यांचे संगोपन केले. जे प्रत्यक्षात त्याच्या आईचे नाव आहे.
लग्नानंतर या जोडप्याला दोन मुलेही झाली. तरुणने बंगळुरूमधील एका आयटी कंपनीत उच्च पदावर नोकरी केली. कंपनीच्या खर्चाने प्रवीण या नावाने तो परदेशातही जाऊन आला.
एक चूक आणि पंधरा वर्षांनी सापडला पत्ता
सजनीच्या नातेवाईकांनी सासरच्यांविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार दाखल केली. फरार झालेल्या तरुणच्या अटकेसाठी सजनीच्या कुटुंबीयांनी स्थानिक पातळीपासून ते गांधीनगरपर्यंत निवेदने दिली, मात्र तरीही तरुणचा शोध लागला नाही.
पोलीस वेळोवेळी छडा न लागलेल्या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवतात. दीड दशकांच्या कालावधीत या प्रकरणावर अनेकवेळा काम सुरू झाले, मात्र ठोस प्रगती न होता फाइल पुन्हा धूळ खात पडली.
पोलिसांचा असा मानसशास्त्रीय सिद्धांत होता की जो माणूस सराईत गुन्हेगार नसतो आणि कौटुंबिक वातावरणात वाढलेला असतो, तो एकवेळ आपल्या भावंडांशी संबंध तोडू शकतो; परंतु आपल्या आईशी संबंध तोडू शकत नाही आणि तिच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करू शकतो.
या कल्पनेतून मंदसौरमध्ये राहणाऱ्या तरुणच्या आईवर पाळत ठेवण्यास सुरूवात केली गेली. त्यांचे कॉल डिटेल्स तपासले असता, त्यांना बंगळुरूमधील एका आयटी कंपनीच्या लँडलाइन नंबरवरून कॉल येत असल्याचे आढळून आले. ही चूक तरुणबद्दलच्या संशयाचे खात्रीत रूपांतर करणारी होती.
तपास अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या वेळी प्रत्यक्ष भेट देऊनही आईकडून विशेष माहिती मिळाली नाही. मात्र, या वृद्ध महिलेला दोन मुलं असल्याची माहिती शेजाऱ्यांकडून मिळाली. एक अहमदाबादमध्ये आणि दुसरा दक्षिणेत कुठेतरी राहत असल्याचे कळले.
हातातील दोषामुळे पकडला गेला
फरार तरुणच्या प्रोफाइलच्या आधारे पोलिसांनी गुजरात व्यतिरिक्त मध्य प्रदेश, केरळ आणि दिल्ली येथे तपास केला, परंतु कोणताही महत्त्वपूर्ण पुरावा हाली आला नाही. आता त्यांना दक्षिणेकडे आशेचा किरण दिसला.
शेजाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी अन्नमाचे सोशल प्रोफाइल तपासले. त्यामध्ये दक्षिण भारतात राहणा-या काही मोजक्याच प्रोफाईल्स होत्या. त्याआधारे पोलिसांनी प्रवीण भाटेलीशी लग्न केलेल्या निशावर लक्ष केंद्रित केलं. तरुण याने स्वतःबद्दल सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट टाकलेली नसल्याने प्रत्यक्षपणे तपास करण्याचा निर्णय घेतला गेला.
अहमदाबाद पोलिसांचे एक पथक नोव्हेंबर 2018 मध्ये बंगळुरू येथील एका नामांकित आयटी कंपनीत चौकशी करण्यासाठी गेले असता, तिथे तरुण जिनाराज नावाचा कोणीही कर्मचारी काम करत नसल्याचे आढळून आले. मात्र प्रवीण भाटेली नामक व्यक्ती तिथे काम करत असल्याचे कळले. फ्रेंच कट दाढी, डोक्यावर थोडेसे केस आणि चष्मा. पहिल्यादा पाहिले असता तो सामान्य आयटी कर्मचाऱ्यासारखा दिसतो.
2011 पासून या प्रकरणावर काम करणारे तत्कालीन पोलिस निरीक्षक किरण चौधरी यांच्या म्हणण्यानुसार, "आरोपी प्रवीण भाटेलीला बेड्या घालताना मला त्याच्या उजव्या हाताच्या अंगठीच्या बोटात दोष दिसला. ही जखम त्याला लहानपणी बास्केटबॉल खेळताना झालेल्या दुखापतीमुळे झाली होती."
ओळख पटल्याने इन्स्पेक्टर चौधरी यांनी त्याला 'तरुण' असे संबोधले. हे ऐकून कथित प्रवीण भाटेली हादरला आणि इन्स्पेक्टर चौधरी म्हणाले, 'तरुण, आता सर्वकाही संपलंय. चल जाऊया.'
पोलीस अधिकाऱ्याने तरूणला टीमसोबत जाण्यास सांगितले. वाटेत तरुण याला एकच प्रश्न सतावत होता, 'तुम्हाला माझ्याबद्दल माहिती कशी मिळाली?'
बदलीच्या आदेशानुसार त्यांना अहमदाबादमध्ये अटक करण्यात आली होती, त्याचवेळी त्याचा मित्र आणि खरा प्रवीण भाटेली यांनीही पोलिसात तक्रार दाखल केलेली.
नवीन ओळख, जुना अध्याय
अटकेनंतर तरुण जिनाराजचा नवीन पत्ता होता अहमदाबादमधील साबरमती मध्यवर्ती कारागृह. जिथे त्याला सहकारी कैद्यांना इंग्रजी शिकवण्याचे काम देण्यात आले होते. याच काळात त्याने धर्मांतर केलं आणि जस्टिन जोसेफ हे नाव धारण केलं.
कारागृहात असताना तरुणने अनेकवेळा जामिनासाठी अर्ज केला होता, परंतु 15 वर्षे फरार असल्याने त्यांना जामीन नाकारण्यात आलेला. अखेर गुजरात उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर 4 ऑगस्ट 2023 रोजी तरूण बाहेर पडला.
हे स्वातंत्र्य 15 दिवस टिकणारच होतं, त्यामुळे प्रवीणच्या कपटी मनाने पुन्हा पळून जाण्याचा विचार सुरू केला. प्रवीण अहमदाबादहून त्यांच्या मूळ गावी मंदसौरला गेले, जिथे त्यांनी वडिलोपार्जित मालमत्ता विकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
काही दिवस आईकडे राहिल्यानंतर तो उदयपूरला निघून गेला. हिंदी, गुजराती, इंग्रजी, मराठी, कन्नड, मल्याळम, पंजाबी आणि हरियाणवी भाषांवर प्रभुत्व असलेल्या तरुणने तिथल्या एका व्यक्तीशी मैत्री केली आणि पुन्हा एकदा दिल्लीची वाट धरली.
दुसरीकडे, 15 दिवस उलटूनही तरुण फिरकला नाही, तेव्हा साबरमती मध्यवर्ती कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली, त्याआधारे पोलिसांनी तरुणचा माग काढण्यास सुरुवात केली. पाळत ठेवल्यानंतर तरुण दिल्लीत असल्याचे उघड झाले.
तरुणला परत अटक केल्यानंतर, अहमदाबाद सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त (डीसीपी) अजित राज्य यांनी या प्रकरणाबाबत प्रसारमाध्यमांना सांगितले की, "तो 19 ऑगस्ट 2023 रोजी तुरुंगात परतणार होता, परंतु तो परत आला नाही. त्याने धर्मांतर केले आणि जस्टिन जोसेफ हे नाव धारण केले. या नावाने तो दिल्लीतील नजफगड येथे राहू लागला होता."
केश प्रत्यारोपण आणि टॅटूच्या माध्यमातून पोलिसांपासून सुटका करून नवी ओळख मिळवून नेपाळमार्गे परदेशात पळून जाण्याचा तरुणचा प्रयत्न फसला होता.
निशा आणि तिच्या मुलांनी परदेशात नवीन आयुष्य सुरू केल्याचे बोलले जात आहे. हत्येनंतर भावाने तरुणशी संबंध तोडले. मुलाची सुटका करण्यासाठी आई पेन्शनची रक्कम खर्च करत्येय.