भाजपच्या येथील मुख्यालयात 63 वर्षीय रॉय यांनी त्या पक्षाचे औपचारिक सदस्यत्व स्वीकारले. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि पक्षाचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय उपस्थित होते. भाजप जातीयवादी नव्हे तर धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. भाजपचा भविष्यात पश्चिम बंगालमध्ये नक्कीच विजय होईल. राज्यातील जनतेला पर्याय हवा आहे. आजवर तृणमूलने जे यश मिळवले आहे; ते भाजपच्या पाठिंब्यामुळेच शक्य झाले, असा दावा रॉय यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना केला. तृणमूल आणि भाजपमध्ये काही वर्षांपूर्वी हातमिळवणी झाली होती.
तृणमूलचे संस्थापक सदस्य असणारे रॉय एकेकाळी त्या पक्षाच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात. प्रभावी संघटनात्मक आणि राजकीय कौशल्यामुळे तृणमूलचे चाणक्य म्हणूनच त्यांना ओळखले जाई. तृणमूलमध्ये ममतांनंतर त्यांना दुसऱ्या क्रमांकाचे स्थान होते. मात्र, मतभेद वाढीस लागून ममता आणि रॉय यांच्यात दुरावा निर्माण झाला. त्यानंतर रॉय यांनी मागील महिन्यात तृणमूलला रामराम ठोकला. ते भाजपमध्ये प्रवेश करतील किंवा स्वतंत्र पक्ष स्थापन करतील, अशी जोरदार चर्चा होती. अखेर रॉय यांच्या भाजप प्रवेशाने या चर्चांना पूर्णविराम मिळाला.