'गौतम अदानींनी भाजपला किती पैसे दिले हे मोदींनी सांगावे' - राहुल गांधी
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023 (16:02 IST)
लोकसभेत मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काय नाते आहे हा प्रश्न विचारला. गौतम अदानी हे असं नेमकं काय करतात की ते प्रत्येक व्यवसायात यशस्वी होतात.
नरेंद्र मोदींची व्हायब्रंट गुजरातची जी संकल्पना होती त्याला गौतम अदानींनी सर्व शक्तीनिशी सहकार्य केलं. गौतम अदानी हे नरेंद्र मोदींच्या व्हायब्रंट गुजराचा कणा होते.
गौतम अदानी हे आधी जगातील 609 व्या स्थानी होते ते जगातील तिसऱ्या क्रमांकावर कसे पोहोचले.
गौतम अदानी यांना विमानतळाच्या व्यवस्थापनातील अनुभव नसताना त्यांना कंत्राट कसे मिळाले, असा सवाल राहुल गांधी यांनी केलाय.
गौतम अदानींसाठी नियम बदलण्यात आल्याचा आरोप राहुल गांधींनी केला.
ऑस्ट्रेलियात पंतप्रधान जातात त्यानंतर अदानींना कोळसा खाणीचे कंत्राट मिळतात. मग त्यानंतर मोदी बांगलादेशला जातात आणि त्यानंतर पुन्हा कंत्राट अदानींना मिळतं.
एलआयसीचा पैसा हा अदानींच्या शेअर्समध्ये का गुंतवला गेला, अदानींना इतकं कर्ज कसं मिळतं.
SBI, PNB या बॅंकांनी अदांनीना भरमसाठ कर्ज देऊन ठेवले आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं.
इकडे अदानी सांगतात की ते हायड्रोजन पॉवरमध्ये मोठी गुंतवणूक करणार आहे तर काही दिवसांनी लगेच निर्मला सीतारामन अर्थसंकल्पात सांगतात की भारत सरकार हायड्रोजन पॉवरसाठी अनुदान देणार आहेत.
'आतापर्यंत अदानींनी भाजपला किती पैसे दिले हे मोदींनी सांगावे' - राहुल गांधी
आतापर्यंत गौतम अदानींनी भाजपला किती पैसे दिले हे नरेंद्र मोदीने जाहीर करावे. कितीवेळा मोदींसोबत अदानी हे परराष्ट्र दौऱ्यावर गेले हे देखील त्यांनी सांगावे.
अदानी यांनी इलेक्ट्रॉल बाँडच्या माध्यमातून किती पैसे दिले हे जाहीर करावे, असे राहुल गांधी यांनी म्हटले.
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या वेळी म्हटले होते की लोकसभेचे अध्यक्ष विरोधी पक्षातील नेते बोलत असताना माइक बंद करतात. त्यावर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला यांनी नाराजी व्यक्त केली आणि तुम्ही हे जाहीरपणे बोलायला नाही पाहिजे असं म्हटलं.
त्यावर राहुल गांधी यांनी म्हटले की 'सर, पण ही वास्तविकता आहे की तुम्ही माईक बंद करतात आमचा.'
हिंडनबर्ग रिसर्च संस्थेचा अहवाल आल्यानंतर काय झाले?
अमेरिकेतील हिंडनबर्ग रिसर्च या संस्थेचा अदानी समूहावरील अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर गडगडले. गेल्या काही दिवसांपासून अदानी समूहांच्या शेअर्सची पीछेहाट सुरुच आहे. त्याचा फटका अदानी समूहाच्या उद्योगांना बसला.
गेल्या काही दिवसात अदानींची संपत्ती 9 लाख अब्जांनी घटली आहे. हिंडनबर्गच्या अहवालाला उत्तर देताना अदानींनी म्हटले होते की हा भारताच्या उद्योग क्षेत्रावर हल्ला आहे. पण हिंडनबर्गने म्हटले की राष्ट्रवादाची झूल पांघरून तुम्ही घोटाळे लपवू शकत नाही.
अदानी एंटरप्राइजेसचा 20,000 कोटी रुपये किमती FPO येणार होता पण हिंडनबर्गच्या पार्श्वभूमीवर तो रद्द करण्यात आला.
अदानींने FPO रद्द झाल्यानंतर म्हटले होते की सध्या शेअर बाजाराची स्थिती नाजूक असल्यामुळे आम्ही हा FPO रद्द करत आहोत.