तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. हैदराबादमधील ऐतिहासिक चारमिनार परिसरातील एका इमारतीला भीषण आग लागली. या घटनेत आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 11 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुलजार हाऊस घटनेवर दुःख व्यक्त केले आणि सानुग्रह अनुदानही जाहीर केले.
अग्निशमन दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माध्यमांना सांगितले की, सुमारे नऊ जण भाजले आणि उर्वरित लोकांचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाला. चारमिनारजवळील एका दागिन्यांच्या दुकानात आग लागली. अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग तीन मजली इमारतीच्या तळमजल्यावर लागली, जिथे एक दागिन्यांचे दुकान होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले. आगीत झालेल्या मृत्यूंमुळे पंतप्रधान मोदींनी त्यांना खूप दुःख झाल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधानांनी मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000रुपयांची मदत जाहीर केली आहे
या घटनेवर प्रतिक्रिया देताना भारत राष्ट्र समितीचे कार्यकारी अध्यक्ष के टी रामाराव यांनी लिहिले, "अत्यंत धक्कादायक आणि दुःखद!!" जुन्या शहरातील गुलजार हाऊसमधील आगीच्या घटनेबाबत समोर येणारे तपशील खूपच दुःखद आहेत. या दुर्घटनेतील बळींच्या कुटुंबियांना माझ्या मनापासून सहानुभूती आहे. जखमींना लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो. मला आशा आहे आणि प्रार्थना आहे की ही आग लवकरच आटोक्यात येईल.