Manipur : 'हिंसाचारात खूप काही गमावलं, आता बलात्कार आणि हत्या होताना नाही पाहू शकत'
शनिवार, 22 जुलै 2023 (21:34 IST)
कीर्ति दुबे
Manipur news मणिपूरमध्ये गेल्या अडीच महिन्यांपासून हिंसाचाराच्या ज्वाळा धगधगत आहेत. याच काळात अस्वस्थ करणारे अनेक फोटो, व्हीडिओ येत होते. त्यामुळे या हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या मौनावर विरोधक सतत प्रश्न उपस्थित करत होते.
मात्र एका महिलेचा व्हीडिओ व्हायरल झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर भाष्य केलं.
त्यांनी म्हटलं, “मणिपूरमधील घटनेमुळे माझे हृदय दु:खाने भरले आहे. ही घटना लज्जास्पद आहे. हे पाप करणारे किती लोक आहेत, ते नेमके कोण आहेत ते एकीकडे, पण संपूर्ण देशाचा यामुळे अपमान होत आहे.
140 कोटी देशवासियांना या प्रकारणाची लाज वाटत आहे. मी मुख्यमंत्र्यांना माता-भगिनींच्या रक्षणासाठी पावले उचलण्याचे आवाहन करतो."
राजस्थान, छत्तीसगड, मणिपूरचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, "घटना कोणत्याही राज्यातील असो, सरकार कोणतेही असो, महिलांच्या सन्मानासाठी राजकारणाला दूर ठेवून काम केले पाहिजे.
मी देशवासियांना हा विश्वास देऊ इच्छितो की कोणालाही सोडले जाणार नाही. मणिपूरच्या मुलींसोबत जे काही झाले त्याबद्दल कुणालाही माफ केले जाणार नाही."
ज्या व्हीडिओवर पंतप्रधानांनी प्रतिक्रिया दिली, त्या व्हीडिओमध्ये कुकी महिलांचे कपडे काढून त्यांच्याशी अश्लील चाळे करत असल्याचं दिसून येतं. तसेच नंतर त्या जमावाने त्यातील एका महिलेवर सामूहिक बलात्कार केला, असा आरोप केला जात आहे.
गेल्या 80 दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंसाचारात जळत असलेल्या मणिपूरच्या स्थितीवर काहीच बोलले नाहीत, असा आरोप विरोधकांनी केला आहे.
मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी या व्हीडिओनंतर, काही उपद्रवी लोकांमुळे सर्व राज्याचा अपमान होत आहे आणि यातील दोषींना कडक शिक्षा झाली पाहिजे असं म्हटलं आहे.
अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत
या प्रकरणामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. जी घटना 79 दिवसांपूर्वी झाली, जिची तक्रार 62 दिवसांपूर्वी करण्यात आली होती, त्यावर कारवाई करण्यासाठी व्हीडिओ व्हायरल होईपर्यंत वाट का पाहिली गेली, अशी विचारणा होत आहे.
हा व्हीडिओ व्हायरल झाल्यावर दोन दिवसांच्या आतच या घटनेतील 4 जणांना अटक झाली.
कुकी महिलांवरील अत्याचाराच्या व्हीडिओनंतर गुरुवारी (20 जुलै) कुकीबहुल चुराचांदपूर जिल्हयात शेकडो लोकांनी रस्त्यावर येऊन निदर्शनं केली.
याच काळात आता पंतप्रधान मोदी आणि मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानांवरही चर्चा होत आहे.
आम्ही चुराचांदपूरमध्ये राहाणाऱ्या कुकी समुहाच्या लोकांशी चर्चा केली आणि या विधानांकडे ते कसे पाहातात हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
'जगातली कोणतीच न्यायव्यवस्था भरपाई करू शकत नाही'
मणिपूरच्या कुकी समुहाची इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरम संघटनेची संयोजक मेरी जॉन यांनी बीबीसीला फोनवर सांगितलं, “व्हीडिओद्वारे आपल्याला ही घटना समजल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीही आहेत आणि तेच राज्यात घडलेल्या घटना माहिती नसल्याचं सांगत आहेत.”
त्या सांगतात, “मी तो व्हीडिओ पाहिलाय. संबंधित महिलेच्या आईला मी भेटले आहे. व्हीडिओ पाहिल्यापासून मला रात्री झोपच आली नाही. रात्री अचानक जाग येऊन मी आपल्या अंगावर कपडे आहेत की नाही हे तपासते. या व्हीडिओमुळे अगदी आतपर्यंत हलले आहे, मी हे शब्दात सांगू शकत नाही.”
त्या म्हणाल्या, पण यामुळे एक दिलासा मिळाला तो म्हणजे कुकी लोक हिंसा करत असल्याचं जे सांगितलं जात होतं त्यातील सत्य बाहेर आलं. आता सगळं जग पाहातंय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमंही सत्य दाखवत आहेत.
मेरी जॉन सांगतात, “पंतप्रधानांच्या विधानातून एक कडक संदेश मिळतो, तसेच मणिपूरमध्ये काहीच नीट सुरू नाहीये हेपण त्यांनी मान्य केलं. पण विधानांच्या पलिकडे जाऊन सरकार किती कठोर कारवाई करणार यातून सरकार आमच्यामागे कशी उभी आहे हे कळेल.
कोणती कारवाई झाली म्हणजे न्याय झाला, असं मेरीला वाटेल असा प्रश्न विचारल्यावर फोनवर मेरी भावूक झाल्या.
त्या कापऱ्या स्वरात म्हणाल्या, जो मानसिक त्रास त्या महिलांनी भोगलाय, जी भीती त्यांनी अनुभवली आहे, ज्याप्रकारे त्या आपल्या अब्रूसाठी हातापाया पडत होत्या, त्याकडे पाहाता जगातली कोणतीच न्यायव्यवस्था त्याची भरपाई करू शकणार नाही. मात्र जी काही कडक शिक्षा असेल ती त्या लोकांना व्हायला हवी.”
या संघर्षातून कुकी समुह आपल्यासाठी मैतेई लोकांपासून वेगळा प्रांत आणि प्रशासन मिळावं अशी मागणी करत आहेत.
या मागणीचं मेरी समर्थन करतात. त्या सांगतात, “ज्या लोकांनी आम्हाला माणूस म्हणूनही वागवलं नाही त्या लोकांबरोबर आम्हाला राहावं लागत आहे. मानवी मेंदू कोणाबरोबरही जे कृत्य करणार नाही अशा गोष्टी त्यांनी आमच्याबरोबर केल्या आहेत.”
...तर परिस्थिती एवढी बिघडली नसती
चुराचांदपूरमध्ये राहाणारे कुकी समुहाचे मुआन तोंबिंग सांगतात, “आम्हाला राज्य सरकारकडून कोणतीही आता अपेक्षा उरलेली नाही, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानामुळे आशा पल्लवित झाली आहे. आम्हाला वाचवा अशी विनंती आम्ही केंद्र सरकारडे करत आहोत.”
परंतु तोंबिंग सांगतात, “केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता असल्यामुळेच पंतप्रधान त्यांचं सरकार आमचं संरक्षण करण्यात अपयशी ठरत असल्याचं स्पष्टपणे सांगत नाहीयेत. मात्र आम्ही भारताचेच नागरिक आहोत त्यामुळे अंतिम आशा आम्हाला भारत सरकारकडूनच आहे. त्यांना आता कारवाई करावी लागेल. या हिंसेत बरंच काही गमावलेलं आहे. आता यापुढे आमच्या महिलांवर बलात्कार होताना आणि आमच्या बंधूंची हत्या होताना पाहाणं सहन केलं जाणार नाही.”
ते सांगतात, “पंतप्रधानांच्या विधानानंतर आता मणिपूरवर चर्चा होईल, आम्ही जे भोगलंय त्यावर चर्चा होईल अशी आशा वाटत आहे. ज्याप्रकारे दोन दिवसांत घडामोडींना वेग आलाय, ते आधी झालं असतं तर कित्येक महिला, मुली आणि आमच्या लोकांना हे सगळं होताना पाहावं लागलं नसतं. व्हीडिओ फक्त तीन मिलांचा आहे. परंतु अनेक महिला लैंगिकशोषण सहन करुन शिबिरात पोहोचल्या आहेत.”
फेक न्यूज आणि व्हायरल व्हीडिओला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न
शुक्रवारी (21 जुलै) अनेक लोकांनी कुकी महिलांवर अत्याचार करणारा प्रमुख आरोपी मोहम्मद इबुंगो उर्फ अब्दुल हलीमला पोलिसांनी अटक केल्याचं सोशल मीडियावर लिहिलं होतं. उजव्या विचारसरणीच्या अनेक ट्विटर हँडल्सनी हे ट्वीट केलं होतं.
शेफाली वैद्य यांनी लिहिलं, “ही मणिपूर पोलिसांचं प्रसिद्धीपत्रक आहे. या भयंकर घटनेचा मुख्य आरोपी अब्दुल हलीम आहे म्हणून सिलेक्टिव्ह होऊन संताप व्यक्त करणारे आता बोलणार की नाही?”
अर्थात 8 तासांनी शेफाली वैद्य यांनी ते ट्वीट डिलिट केलं.
यावर भाजपाचे दिल्लीतील नेते तेजिंदर सिंह बग्गा यांनीही ट्वीट केलं आणि मणिपूर केसचा मुख्य आरोोपी अब्दुल खानला अटक झाली आहे असं त्यांनि लिहिलं.
हे सगळं एका चुकीच्या आणि भ्रामक ट्वीटमुळे झालं. एएनआय वृत्तसंस्थेनं हे ट्वीट केलं होतं.
20 जुलै रोजी 9.47 मिनिटांनी एएनआयने मणिपूर पोलिसांच्या आधारे हे ट्वीट केलं होतं. “मणिपूर व्हायरल केस-पीपल्स रिव्हॉल्युशनरी पार्टी ऑफ कांगलेइपाकच्या एका सदस्याला पूर्व इंफाळ जिल्ह्यातून पकडलं आहे. त्याचं नाव मोहम्मद इबुंगो उर्फ अब्दुल हलीम (38) आहे.”
एएनआयने हे ट्वीट थोड्यावेळाने डिलिट केलं मात्र तोपर्यंत एनडीटीव्हीसह काही माध्यमांनी या माहितीचं ट्वीट केलं. अर्थात ही ट्वीट्स काठली तरी लोक या चुकीच्या ट्वीट एखाद्या माहितीसारखं सोशल मीडियावर पसरवू लागले.
या चुकीच्या ट्वीटवर एएनआयने माफी मागत 12 तासांनी 21 जुलै रोजी 10.29 ला ट्वीट केले. त्यात “काल संध्याकाळी एएनआयने मणिपूर पोलिसांनी केलेल्या एका अटकेबद्दल चुकीचे ट्वीट केले होते. आम्ही मणिपूर पोलिसांचे ट्वीट वाचण्यात चूक केली आणि पोलिसांनी आधी केलेल्या एका ट्वीटशी ते जोडले. चूक झाल्याचं समजताच ते तात्काळ डिलिट केलं.” असं म्हटलं आहे.
मणिपूर पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात आतापर्यंत व्हायरल व्हीडिओ प्रकरणातील 4 लोकांना अटक झाल्याचं आणि बाकीच्या लोकांना अटक करण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत असं स्पष्ट लिहिलेलं आहे.
मणिपूर पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकातच एका अगदीच वेगळ्या प्रकरणाचा उल्लेख करुन 20 जुलै रोजी पीआरइपीएकेच्या मोहम्मद इबुंगो उर्फ अब्दुल हलीमला अटक केल्याचं म्हटलं आहे.
ही अटक व्हायरल व्हीडिओशी संबंधित नव्हती.
मणिपूर पोलिसांनी व्हीडिओ प्रकरणात ज्या 4 लोकांना अटक केलीय त्यांची फक्त ओळख सांगितलीय पण ती सार्वजनिक केलेली नाही.
फायनान्शिअल एक्सप्रेसने या प्रकरणी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत संपादकीयात लिहिलं आहे, केंद्र आणि राज्य सरकारने आजवर पोलिसांनी यावर कोणतीही कारवाई का केली नाही हे सांगितलं पाहिजे. हे 70 दिवस थंडबस्त्यात का ठेवलं गेलं. हा काही सामान्य गुन्हा नव्हता. आपल्या लोकांचं संरक्षण करण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरलंय हे सिद्ध झालंय
व्हीडिओमुळे नेत्यांनी विधानं केली असली तरी निवाराशिबिरातल्या महिला न्यायाची प्रतीक्षा करत आहे. ती किती दीर्घ असेल याचं उत्तर आता तरी कोणाकडे नाहीये.