ममता बॅनर्जी यांनी शुभेंदू अधिकारी यांचा केला पराभव

रविवार, 2 मे 2021 (17:48 IST)
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राम मतदारसंघात विजय झाला आहे. ममता बॅनर्जी यांनी भाजपचे उमेदवार सुभेंदू अधिकारी यांचा 1200 मतांनी पराभव केला आहे.
 
याशिवाय ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसनं 208 जागांवर आघाडी मिळवली आहे. त्यामुळे देशातील इतर राज्यांमधील नेत्यांनी अभिनंदन करण्यास सुरुवात केली आहे. तर भाजप 81 जागांवर आताच्या घडीला आघाडीवर दिसत आहे. निवडणूक आयोगाने ही आकडेवारी दिली आहे.
 
भाजप निवडणूक निकालांबाबत आत्मपरिक्षण करेल, असं वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी केलं आहे. दुसरीकडे तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र येऊन जल्लोष करताना दिसून येत आहे.
 
एकूण 294 जागा असणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभेवर वर्चस्व मिळवण्यासाठी 148 जागांचा आकडा पार करणं गरजेचं आहे.
 
शरद पवार, अखिलेश यादव, संजय राऊत यांच्याकडून अभिनंदन
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं आहे. पश्चिम बंगालमधील विजयाबद्दल ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन करणारं ट्वीट पवारांनी केलं आहे.
 
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं आहे.
 
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं, "पश्चिम बंगालच्या निकालांवरून हे स्पष्ट होतं की देशातली लोकशाही अमर आहे. एक जखमी वाघीण ज्या पद्धतीनं मैदानात उतरली, या वाघिणीच्या पक्षातल्या नेत्यांना फोडण्यात आलं, तिच्यावर केंद्रीय संस्थांचा दबाव टाकण्यात आला, तरीही या वाघिणीनं ऐतिहासिक विजय मिळवला आहे. दिल्लीतून येऊन तुम्ही कोणत्याही राज्यात दादागिरी करू शकत नाही, हे या निकालातून स्पष्ट झालं."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती