सीता सुरक्षित नाही, राम मंदिर बनवून काय करणार : तृप्ती देसाई

बुधवार, 30 सप्टेंबर 2020 (14:58 IST)
'योगी जी क्या करोगे राम मंदिर बनाकर जब आपके अंगण में पल रही सीता ही सुरक्षित नही है ? असा संतप्त सवाल हाथरस येथील घटनेनंतर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विचारला आहे. 'योगी आदित्यनाथजी जेव्हा तुम्ही महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल, तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप मोठा आनंद होईल,' असे मतही देसाई यांनी मांडले आहे.
 
उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये तरुणीवर निर्भयासारखे कृत्य केल्याची घटना उघड झाल्यानंतर राजकारण तापलं आहे. सोशल मीडियावरील नागरिकांचा आक्रोश दिसून येत आहे. हाथरस प्रकरणाचा भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी निषेध करत योगी सरकारवर टीका केली आहे.
 
'हाथरसमध्ये जी घटना समोर आली आहे, युवतीचा सामूहिक बलात्कार केला जातो. त्यानंतर तिने आरोपींचे नाव सांगू नये म्हणून तिची जीभ कापली जाते. जेव्हा कुटुंबीय तक्रार देण्यास जातात, तेव्हा पोलीस हे गुन्हा दाखल करण्यास तपास करण्यास टाळाटाळ करतात. पाच ते सहा दिवसानंतर आरोपीला अटक होते. आता या मुलीने जीव सोडला आहे. हे सर्व पाहता योगी सरकार नेमकं करतय काय ? असा प्रश्न देसाई यांनी उपस्थित केला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती