सध्या प्रवर्तन निदेशालय ईडी च्या नावाने अनेकांना धास्ती भरते, त्यामुळे आता भामट्यांनी या दहशतीचा उपयोग करायचे सुरु केले आहे. ईडी हा शब्द प्रयोग जास्त प्रसिद्ध झाल्याने तर त्याबद्द्दल पूर्ण माहिती नसल्याने याचाच फायदा घेऊन आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघड झाला आहे. जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील दोघा भामट्यांनी सुध्दा ‘ईडी’नावाचा आधार ‘ईडी हेल्पिंग लाइन’ नावाच्या बनावट कंपनीद्वारे तीघांना लाखो रूपयांना गंडा घातला आहे. याबद्दल पोलिसांकडे तक्रार दाखल झाली आहे.
भद्रकाली पोलिसांनी दिलेली माहिती की, सिन्नर तालुक्यातील वावी गावातील दोघे संशयित सतीश बनसोडे (३५) व सचिन वेलजाले (३६) यांनी फिर्यादी सीमा भाऊसाहेब काळे (३२, रा. आळे फाटा, नारायणगाव) यांच्यासह संदीप काठे, संदीप लामखेड यांना प्रत्येकी अनुक्रमे २ लाख, ३ लाख आणि १ लाख रुपयांची गुंतवणूक करा असे सांगितले. दोघा भामट्यांनी त्यांना ‘ईडी हेल्पिंग लाइन’ नावाच्या बनावट कंपनीद्वारे दामदुप्पट रक्कम केवळ आठ दिवसात देण्याचे आमिष दिले, यातील तिघांचा त्यांनी पूर्ण विश्वास संपादन केला आणि फिर्यादी काळे यांच्यासोबत काठे, लामखेडे यांच्याकडून गुंतवणुकीची रक्कम ‘गुगल पे’द्वारे आॅनलाइन स्वत:च्या खात्यात जमा केली.
काही दिवसांनी गुंतवणूक केलेले पैसे मिळावे म्हणून तिघांनी वारंवार संपर्क केवळ, मात्र संबंधित दोघा भामट्यांनी त्यांना कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे यांच्या लक्षात आले. काळे यांनी भद्रकाली पोलीस ठाणे गाठून संशयित दोघांविरुध्द फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी बनसोडे व वेलजाले यांच्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक वर्हाडे करीत आहेत.