केरळ स्फोट : एका व्यक्तीचं आत्मसमर्पण ख्रिश्चन कन्व्हेंशन सेंटरमधल्या बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारली

सोमवार, 30 ऑक्टोबर 2023 (09:14 IST)
केरळमधील कोची येथील एका कन्व्हेंशन सेंटरमध्ये आज (29 ऑक्टोबर) सकाळी दोन बॉम्बस्फोट झाले.
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कलामसेरीमध्ये झालेल्या या दोन स्फोटांमध्ये आतापर्यंत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
 
या स्फोटात 36 जण जखमी झाले असून त्यापैकी पाच जण गंभीर जखमी आहेत.
 
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं असून, हा स्फोट 'दुर्दैवी' असल्याचं म्हटलं आहे.
 
या स्फोटांबाबत नवीन माहिती समोर आली आहे.
 
एका व्यक्तीनं येहोवा व्हिटनेस ख्रिश्चन समुदायाच्या कार्यक्रमात झालेल्या स्फोटाची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा केल्याची माहिती, राज्याचे कायदा आणि सुव्यवस्था अतिरिक्त पोलीस महासंचालक अजित कुमार यांनी दिली आहे.
 
"सकाळी एका व्यक्तीनं त्रिशूर ग्रामीणच्या कोडाकरा पोलीस ठाण्यात सरेंडर केल्यानंतर हा स्फोट त्यानं घडवल्याचा दावा केला," असं अजित कुमार म्हणाले.
 
पोलिसांना शरण आलेल्या व्यक्तीचं नाव डोमिनिक मार्टिन असून तो स्वतःदेखिल येहोवा समुदायाचा सदस्य असल्याचा दावा करत आहे.
 
अमित शहांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घटनेबाबत माहिती घेतली आहे.
 
पीटीआय वृत्तसंस्थेनं सुत्रांच्या हवाल्यानं म्हटलं की, "स्फोटानंतर निर्माण झालेल्या स्थितीवर आणि आगामी पावलांबाबत शहा यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी चर्चा केली आहे. "
 
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दहशतवादविरोधी एनएसजी आणि एनआयएची पथके लगेचच केरळला रवाना करण्याचे आदेशही दिले आहेत.
 
 
पीटीआयच्या माहितीनुसार, कलामसेरीमध्ये झालेल्या दोन स्फोटांमध्ये आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला आहे.
 
एएनआय या वृत्तसंस्थेनंही एका व्यक्तीच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. स्फोटांत 36 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी 5 जणांची प्रकृती गंभीर आहे.
 
मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी घटनेबाबत दुःख व्यक्त केलं आहे. ही घटना दुर्दैवी असल्याचं ते म्हणाले. सरकार याचा गांभीर्याने तपास करत असल्याचं त्यांनी म्हटलं.
 
केव्हा आणि कुठे झाला स्फोट?
केरळचे पोलीस महासंचालक शेख दरवेश म्हणाले की सकाळी जवजवळ 9 वाजून 40 मिनिटांजी ज्रमा इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरमध्ये स्फोट झाला. रविवारी या कार्यक्रमाचा शेवटचा दिवस होता.
 
ते म्हणाले, “इथे येहोवा विटनेस कार्यक्रम सुरू होता. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 1 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे आणि 36 लोकांवर उपचार सुरू आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी सर्वं शक्यता तपासून पाहत आहेत. जे लोक यामागे आहे त्यांना कडक शिक्षा केली जाईल.”
 
“हा स्फोट आईडी डिव्हाईसने केल्याचे प्राथमिक तपासात समजलं आहे.”
 
“आम्ही प्रकरणाची चौकशी करत आहोत. शांतता प्रस्थापित करण्याची मी विनंती करत आहे आणि सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारची हेट पोस्ट टाकू नका.”
 
येहोवा विटनेस हा एक ख्रिश्चन समुदाय आहे. प्रत्यक्षदर्शींनी बीबीसीला सांगितलं की त्यांनी स्फोटांचा आवाज ऐकला.
केरळच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अजित कुमार यांनी बीबीसीचे सहयोगी पत्रकार इम्रान कुरेशी यांना सांगितलं की, हॉलमध्ये दोन स्फोट झाले आहेत. स्फोटाच्या वेळी हॉलमध्ये दोन हजार लोक होते. केरळचे उद्योगमंत्री पी.राजीव यांनी स्फोटाच्या जागेला वेढा घालण्यात आला आहे आणि अग्निशमन दल त्यांचं काम करत आहे.
 
स्फोटानंतर राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. जखमी लोकांच्या उपचाराची योग्य व्यवस्था करण्यात अल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
 
तसंच त्यांनी कलामसेरी मेडिकल कॉलेज, एर्नाकुलम जनरल हॉस्पिटल, आणि कोट्टायम मेडिकल कॉलेजलाही आपात्कालीन स्थितीत तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.
 
काय प्रतिक्रिया येत आहेत?
PTI ने दिलेल्या बातमीनुसार केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी NSG आणि NIA च्या टीम्सला तातडीने केरळला रवाना होण्याचे आदेश दिले आहेत.
 
ANI ने बातमी दिली आहे की अमित शाह यांनी पिनराई विजयन यांच्याशी चर्चा केली आणि परिस्थितीची माहिती घेतली.
 
त्याचवेळी तिरुवनंतरपुरमचे खासदार शशी थरूर यांनी सोशल मीडियावर लिहिलं की स्फोटाची बातमी ऐकून त्यांना धक्का बसला.
 
ते म्हणाले, “मी या स्फोटाचा स्पष्ट निषेध करतो आणि तातडीने पोलीस कारवाईची मागणी करतो. मात्र हे इतकं पुरेसं नाही. आपल्या राज्यात अशी घटना होणं दु:खद आहे. मी सर्व धर्मगुरुंना विनंती करतो की त्यांनी घटनेची निंदा करावी आणि सगळ्यांना सांगावं की हिंसेने काही साध्य होईल तर ते फक्त हिंसा बाकी काही नाही.”
 
काय आहे यहोवाज विटनेसेस पंथ?
यावर्षी मार्चमध्ये जर्मनीच्या हॅमबर्ग शहरात याच पंथाच्या कन्वेन्शनवर हल्ला झाला होता. बंदूकधारी हल्लेखोर हा या पंथाचाच माजी सदस्य होता.
 
यहोवाचा अर्थ होतो देव. ही एक अमेरिकेतून सुरू झालेली ख्रिश्चन धार्मिक चळवळ आहे. जगभरात त्यांचे 85 लाखांहून अधिक सदस्य आहेत. त्यातले अनेकजण ख्रिश्चन धर्माच्या प्रसाराचं काम करतात.
 
या संघटनेवर बायबलचा अर्थ लावण्यावरून आणि सदस्यांना मिळालेल्या वागणुकीवरून अनेकदा टीकाही होताना दिसते. अनेक इस्लामिक आणि कम्युनिस्ट देशांत त्यांच्यावर बंदी आहे.
 





Published By- Priya Dixit 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती