जेएनयू हिंसाचार: एक वर्षानंतरही न्याय मिळण्याची प्रतीक्षा

बुधवार, 6 जानेवारी 2021 (15:18 IST)
कार्तिकेय
वर्षभरापूर्वी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात नेमकं काय घडलं होतं?
 
26 वर्षांचा सूर्य प्रकाश, दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) संस्कृत विषयावर संशोधन करतोय. दृष्टिहीन असूनही तो, चांगला धावपटू आणि जूडो खेळाडू आहे.
 
पाच जानेवारी 2020 ला, सूर्य प्रकाश आपल्या लॅपटॉपवर अभ्यास करत होता.
 
त्याचवेळी रूममधील खिडकीची काच त्याच्या डोक्यावर पडली. दरवाजा उघडला..त्याला एका मुलीचा आवाज ऐकू आला. आंधळा म्हणून काय झालं? मारा त्याला...
 
जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचारात अनेक विद्यार्थी, प्रोफेसर आणि कर्मचारी जखमी झाले. सूर्य प्रकाश त्यांच्यातील एक आहे. दगडफेक आणि हातात लोखंडी सळ्या घेऊन आलेल्या जमावाने त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांमध्ये सहभागी मुला-मुलींनी ओळख लपवण्यासाठी चेहऱ्यावर मास्क लावला होता.
 
असं वाटलं की, हा हल्ला विद्यापीठात शुल्क वाढ आणि नागरीकत्व दुरूस्ती विधेयका विरोधातील आवाज दाबण्यासाठी करण्यात आला होता. जेएनयू कॅंपसमध्ये शिरलेल्या जमावाने विद्यापीठात दोन तास तोडफोड आणि मारहाण केली.
 
जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आइशी घोषसह 28 लोक या हल्ल्यात जखमी झाले होते.
 
कोणाला अटक किंवा शिक्षा झाली?
जेएनयूमधील विद्यार्थी आणि शिक्षकांकडून या हल्ल्याबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या. या हिंसाचाराला एक वर्ष पूर्ण झालंय. पण, आजतागायत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. हिंसाचाराचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले असूनही.
एक वरिष्ठ पोलीस अधिकारी पीटीआयशी बोलताना म्हणाला, 'जेएनयू हिंसाचार प्रकरणी तीन FIR दाखल करण्यात आले होते. याची चौकशी सुरू आहे. FIR मध्ये काही संशयितांची नावं आहेत. मात्र, कोरोना संसर्गामुळे तपासात अडथळा निर्माण झाला. या प्रकरणांची चौकशी सुरू आहे.'
जेएनयू प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं, 'चेहऱ्यावर मास्क घातलेल्या काही समाजकंटकांनी तोडफोड केली. लोकांवर हल्ला केला.'
 
डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटना आणि भाजपची युथ विंग एबीवीपी जेएनयूमधील हिंसाचाराबद्दल एकमेकांवर आरोप करत आहेत.
 
नऊ विद्यार्थी जेएनयू कॅंपस हिंसाचार प्रकरणी संशयित आढळून आले असल्याचा दावा, दिल्ली पोलिसांनी केला होता. यातील सात विद्यार्थी डाव्यापक्षांशी संबंधित आहेत. ज्यात आइशी घोषचं नाव शामिल आहे. मात्र, पोलिसांनी कोणत्याही विद्यार्थी संघटनेचं नाव घेतलं नाही.
 
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल इनव्हेस्टिगेटींग टीमने (SIT) जेएनयू हिंसाचार प्रकरणी प्राथमिक चौकशी केल्यानंतर सात संशयित आरोपींचे फोटो सार्वजनिक केले होते. पोलिसांचं म्हणणं होतं, पाच जानेवारीला झालेला हिंसाचार ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रक्रियेमुळे झाला. जेएनयू विद्यापीठात 1 जानेवारीपासूनच तणावपूर्ण वातावरण निर्माण होणं सुरू झालं होतं.
 
SIT चे प्रमुख डीसीपी क्राइम जॉय टिर्की यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं होतं, 'स्टूडंट फेडरेशन ऑफ इंडिया (SFI), ऑल इंडिया स्टूडंट्स असोसिएशन (आईसा), डेमोक्रेटिक स्टूडंट्स फेडरेशन (डीएसएफ) आणि ऑल इंडिया स्टूडंट्स फेडरेशन (एआयएसएफ) कडून कतिथ रित्या शीतकालीन सत्रात ऑनलाइन प्रवेशाविरोधात अडथळे आणले जात होते. विद्यार्थ्यांना धमकी दिली जात होती.'
 
एक वर्षानंतरही या हिंसाचारातील पीडित न्याय मिळण्याची प्रतीक्षा करत आहेत. यातील अनेकांनी हॉस्टेल कॅंपस सोडलाय.
 
त्या रात्रीचा विचार मनात आला की अनेकांना अजूनही भीती वाटतेय. जराजरी आवाज झाला, किंवा पायांचा आवाज आला तर, ते घाबरून उठतायत.
 
'नवीन सुरक्षाकर्मी पाकिस्तानी म्हणतात'
जेएनयू हिंसाचार जवळून पाहिलेल्या उदिता हलदर सांगतात, 'आम्हाला मानसिक धक्का बसला होता. पण, आम्हाला पुन्हा कॅम्पसमध्ये यायचं होतं. हिंसाचारानंतर अनेक लोक सोडून गेले. कोरोना संसर्गामुळे हॉस्टेल रिकामं झालं.'
 
29 वर्षांची उदिता अर्थशास्त्र या विषयावर संशोधन करतेय. दिल्लीतील डाव्या विचारधारेच्या 'कलेक्टिव' नावाच्या संघटनेची सदस्य आहे. या संघटनेची जेएनयू, दिल्ली विद्यापीठ आणि आंबेडकर विद्यापीठ संघटना आहेत.
उदिता दावा करतात, 'हल्ल्याच्या एक दिवस आधी. चार जानेवारीला काही शिक्षक एबीवीपीच्या समर्थनार्थ उभे राहीले. विद्यार्थ्यांवर हल्ला करून हिंसाचार करणाऱ्या गटाचं त्यांनी नेतृत्व केलं. या हल्लात मी देखील जखमी झाले होते.'
 
या हिंसाचाराप्रकरणी एबीवीपीच्या पदाधिकाऱ्यांची मुलाखत घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण, त्यांच्याकडून कोणतही उत्तर मिळालं नाही.
 
हल्ल्याच्या एक वर्षानंतर जेएनयू कॅंपसमध्ये परिस्थिती कशी आहे. यावर उदिता सांगते, 'जेएनयू हिंसा आता सामान्य घटना बनली आहे. नवीन सुरक्षा रक्षक कर्मचारी, विद्यार्थी कार्यकर्ते यांना घाबरवतात. त्यांना 'पाकिस्तानी' म्हणून संबोधित केलं जातं. '
 
मात्र, विद्यापीठातील सुरक्षा रक्षकांनी उदिता यांचे आरोप फेटाळून लावले. विद्यापीठ प्रशासन किंवा कुलगुरू कार्यालयाकडून या आरोपांवर स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.
 
पाच जानेवारीला काय झालं, याची प्रत्येक घटना 31 वर्षांच्या कमलेश मंद्रिया यांच्या डोळ्यासमोर ताजी आहे.
 
सकाळी 10-11 वाजता जेएनयूटीएसोबत मंद्रिया आणि त्यांच्यासोबत असलेल्या 300 विद्यार्थ्यांनी हॉस्टेलमध्ये शांततेत मोर्चा काढण्याचं ठरवलं.
 
कमलेश मंद्रिया सांगतात, 'पेरियार हॉस्टेलमध्ये दिल्ली पोलिसांची पीसीआर व्हॅन आणि जेएनयूचे जवळपास 60 सुरक्षा रक्षक उपस्थित होते. त्यांच्या मागे एबीवीपीचे विद्यार्थी हातात सळ्या आणि दगड घेऊन उभे होते. आम्ही त्यांच्या जवळ पोहोचल्यानंतर त्यांनी आमच्यावर दगडफेड सुरू केली.'
'काही वेळातच माझ्याभोवती 10 लोकांनी घेराव घातला. डोक्यावर सळ्यांनी हल्ला केला. मी कधीच राजकारणात सहभागी नव्हतो. कोणत्याच संघटनेशी माझा संबंध नाही. एक सामान्य विद्यार्थी या नात्याने उभा राहीलो होतो.' असं कमलेश पुढे सांगतात.
 
कमलेश म्हणतात, 'तो माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट अनुभव होता. अभ्यास करण्यासाठी बसलो की, ती घटना डोळ्या समोर येऊन उभी रहाते. आजही मेट्रोमध्ये बसण्यास भीती वाटते.'
 
28 वर्षाचे सतीश चंद्र यादव सांगतात, 'आम्हाला अजूनही भीती वाटते. कधीही काही होऊ शकतं. या हिंसाचारात सामील लोक आम्हाला काहीच होणार नाही या आविर्भावात बिनधास्तपणे फिरत आहेत. हिंसाचाराच्या या घटनेने कॅम्पसमधील वातावरण खूप खराब झालंय.'
पेरियार हॉस्टेल परिसर
 
रिसर्च स्कॉलर सतीश जेएनयू विद्यार्थी संघटनेचे महासचिव आहेत. ते पुढे सांगतात, 'पाच जानेवारीची घटना माझ्या कल्पनेपलीकडली आहे. विद्यार्थ्यांनी पोलिसांना वारंवार फोन केले. विद्यापीठाच्या मेन गेटबाहेर असूनही ते विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी पुढे आले नाहीत.'
 
दिल्ली पोलिसांनी हिंसाचार झाल्यानंतर जेएनयू कॅंपसमध्ये फ्लॅगमार्च केला. कॅंपसमधून तक्रार आल्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्यास उशीर केला. विद्यार्थ्यांचा हा आरोप पोलिसांनी फेटाळून लावला होता.
 
सतीश चंद्र यादव म्हणतात, 'विद्यापीठात आजही भीतीचं वातावरण कायम आहे. एखाद्या गोष्टीविरोधात आवाज उठवताना भीती वाटते.'
 
शिक्षकांचे अनुभव
जेएनयू शिक्षक संघटनेकडून आयोजित करण्यात आलेला शांती मार्च. साबरमती ढाब्याजवळ पाच जानेवारीला संपला होता.
 
सेंटर फॉर रिजनल डिव्हेलपमेंटच्या प्रोफेसर सुचित्रा सेन विद्यार्थ्यांना चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोकण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यांनी कोणाकडून तरी ऐकलं होतं की, विद्यापीठात हत्यारं घेऊन लोक जमा झाले आहेत.
शिक्षकांना वाटलं की त्यांच्यावर जमाव हल्ला करणार नाही. म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षकांमागे यावं अशी विनंती त्या करत होत्या. पण, काही मिनीटातच दगडफेड सुरू झाली. प्रोफेसर सेन यांना दोन दगड लागले. एक डोक्यावर आणि दुसरा खांद्यावर. जखमेतून रक्त वाहत होतं. नॉर्थ गेटमधून बाहेर काढलं जात असताना त्यांनी अनेक पोलिसांनी त्या ठिकाणी पाहिलं.
 
प्रोफेसर सेन म्हणतात, 'दोन पोलिसांनी माझ्याकडे पाहून न पाहिल्यासारखं केलं. ही घटना माझ्या मनात कायमची राहील. मी कधीच हे विसरू शकणार नाही.'
 
आजतागायत प्रशासन किंवा पोलिसांकडून त्यांना घडलेल्या घटनेबद्दल विचारणा करण्यात आलेली नाही. दोन महिन्यांनंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली. पण, प्रोफेसर सेन यांना अजूनही विचारणा करण्यात आलेली नाही.
 
प्रोफेसर सेन सांगतात, 'हल्ल्यानंतर काही दिवस माझ्या मनात भीती होती. पण, आता अजिबात नाहीये. मात्र, विद्यापीठाच्या प्रतिमेला यामुळे खूप ठेच पोहोचली आहे.'
 
पेरियार हॉस्टेरबाहेर जमाव जमा झालाय. याची माहिती सेंटर फॉर रिजनल डिव्हेलपमेंटचे सहाय्यक प्रोफेसर अमित थोरात यांना मिळाली. तीन वेळा त्यांनी पोलिसांना फोन केले. पोलिसांनी सांगितलं, फोर्स पाठवत आहोत.
मात्र, फोर्स आली नसल्याने त्यांनी स्वत: जाऊन काय सुरू आहे याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. अमित थोरात यांनी सळ्या आणि हातात काठ्या घेऊन 50-100 लोक उभे असलेले पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर पांढला रूमाल होता.
 
प्रोफेसर थोरात यांनी या जमावाचा एक फोटो घेतला.
 
जमावाने त्यांना फोटो घेताना पाहिलं. दोन लोक पुढे आले आणि त्यांनी अमित थोरात यांना फोटो डिलीट करण्यास सांगितलं.
 
त्यांना फोटो डिलीट करावा लागला. अमित थोरात यांनी फोन ठेवताच जमावाने त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. जमावाच्या तावडीतून सुटून ते साबरमती हॉस्टेलजवळ आले. त्यांनी इतरांना घडलेल्या घटनेची माहिती दिली.
 
थोरात आणि इतर शिक्षकांनी या संदर्भात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला. पण, आजतागायत त्यांच्याशी या प्रकरणी चौकशी करण्यात आलेली नाही.
 
प्रोफसर अमित थोरात म्हणतात, 'या हल्ल्यामुळे आता आम्ही निडर झालोय. विद्यार्थी आता घाबरत नाहीत.'
 
'हल्लेखोर बाहेरून आले असतील तर भिंतीवरून उडी मारून आले असतील'
जेएनयू विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी, सुरक्षेत चूक झाल्याचा किंवा सुरक्षा कर्मचारी या हिंसाचारात सहभागी असल्याचा आरोप फेटाळून लावतात. नाव न घेण्याच्या अटीवर ते सांगतात, 'जेएनयूची भिंत अनेक ठिकाणी तुटलेली आहे. हा कॅंपस 1000 एकर परिसरात आहे. एका मोठ्या भागात जंगल आहे. त्यादिवशी कॅंपसमध्ये येण्यासाठी भिंतीवरून उडी मारावी लागली असेल. हल्लेखोर मेन गेटमधून आले नाहीत, हे मी निश्चित सांगू शकतो. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत.'
 
'हल्लेखोर कॅंपसच्या आतील होते का बाहेरून आले याबद्दल मी ठोस सांगू शकत नाही. आत्तापर्यंत तीनवेळा चौकशी झाली आहे. पण, एकही चौकशी रिपोर्ट सादर करण्यात आला नाही.' असं ते पुढे म्हणतात.
 
पोलीस उशीरा आले का? यावर ते म्हणतात, 'कुलगुरूंच्या परवानगीशिवाय पोलीस कॅंपसमध्ये येऊ शकत नाहीत. पाच जानेवारीला तेच झालं.'
 
सूर्य प्रकाश तीन वर्षांपासून जेएनयूमध्ये आहेत. ते सांगतात, 'इतकी भीती वाटत होती की, कोणी बाथरूमलाही गेलं नाही. अनेकांनी लघवी करण्यासाठी मग आणि बादलीचा वापर केला.'
गेल्यावर्षीच्या घटनेनंतर कॅंपसमध्ये काय बदल झाले आहेत? यावर सूर्य प्रकाश सांगतात, 'विद्यार्थी भीतीच्या सावटाखाली आहेत. मात्र, ते आम्हाला थांबवू शकणार नाहीत.'
 
सूर्य प्रकाश, जेएनयूमध्ये शिक्षण घेणाऱ्या शशि भूषण पांडेची शायरी म्हणतात,
 
"हज़ारों ख़्वाब, नींद, अश्क और तेरा चेहरा...
 
जगह कहां है इन आंखों में रोशनी के लिए"

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती