रोझा मोडत 50 किमीचा प्रवास केला, लहान मुलाचे प्राण वाचवण्यासाठी केलं रक्तदान

बुधवार, 6 मे 2020 (11:26 IST)
रमझानच्या पवित्र महिन्यात इबाबत काय असते ते झारखंडमधील एका तरुणाने साकार करुन दाखवले. एका लहान मुलाचे प्राण वाचविण्यासाठी गिरिडीह येथील कुसमरजा या गावामध्ये राहणाऱ्या सलीम अंन्सारीने तब्बल 50 किमीचा प्रवास केला. आणि हजारीबाग येथे त्याच्या गावातील एका आठ वर्षाच्या मुलाचे प्राण वाचवण्यासाठी रक्तदान केले. 
 
कुसमरजा येथील निखिल कुमारला न्युमोनियाचा आजार झाला असून हजारीबाग येथील नर्सिंग होममध्ये त्यावर उपचार सुरु आहे. निखिलची प्रकृती खालावल्याने त्याला सतत रक्त द्यावे लागत होते. ही बातमी समजल्यानंतर सलीमने रक्तदान करण्यासाठी थेट हजारीबाग गाठले. दोन शहरांमधील 50 किमीहून अधिक अंतर कापत सलीमने रक्तदान केल्याने निखिलचे प्राण वाचले. इतकचं नाही त्यासाठी त्याने रमझान महिन्यातील रोझाही मोडला.
 
निखीलचा मोठा भाऊ फलजीत याने दिलेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यापासून निखिलवर उपचार सुरु असून ब्लड बँकेतून ए पॉझिटीव्ह रक्त मिळवण्यासाठी त्याने स्वत: रक्तदान केलं होतं. नंतर अचानक निखिलची प्रकृती खालावली आणि डॉक्टरांनी रक्त चढवण्याची गरज लागणार असल्याचे सांगितले. मात्र रक्तपेढीत ए पॉझिटीव्ह रक्त उपलब्ध नव्हते. मुलाला ए पॉझिटीव्ह रक्ताची गरज असल्याची माहिती गावातील सलीमला मिळाली. त्याने रक्तदान करण्याची तयारी दर्शवली. 
 
लॉकडाउनमुळे नाकाबंदीवर डॉक्टरांच्या चिठ्ठीचा फोटो दाखवत सलीम 50 किमीचा प्रवास करत हजारीबागला पोहचला आणि रक्तदान केल्यानंतर वैद्यकीय कारणांमुळे त्याला रोझाचा उपवासही मोडावा लागला. मात्र मुलाचा जीव वाचवण्यासाठी त्याने हा उपवास सोडला. संकटाच्या काळात देखील असे लोक भेटणे म्हणजे ईश्वर भेटल्यासारखं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती