अम्मा कालवश

मंगळवार, 6 डिसेंबर 2016 (07:39 IST)
देशाच्या आणि तमिळनाडूच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाची छाप सोडणार्‍या एआयएडीएमकेच्या सर्वेसर्वा, तमिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि सर्वांच्या लाडक्या 'अम्मा' जयललिता यांचे सोमवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 68 व्या वर्षी जयललिता यांनी चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. 
 
भारतीय राजकारण्यात गेली तीन दशके घोंगावणारे वादळ शांत झाले. जयललिता यांच्या निधनानंतर अपोलो रुग्णालयासह संपूर्ण तमिळनाडूत प्रचंड बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. 
 
प्रकृती अस्वास्थ्यामुळे जयललिता यांना 22 सप्टेंबर रोजी चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या दोन महिन्यापासून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. हे उपचार सुरू असतानाच त्यांना रुग्णालयातच हृदयविकाराच्या झटका आला. त्यांची प्रकृती अधिकच चिंताजनक झाल्याने त्यांना वाचविण्याचे शथींचे प्रयत्न सुरू करण्यात आले होते. दिल्लीच्या एम्सच्या डॉक्टरांच्या पथकासह लंडन येथील डॉक्टर रिचर्ड बेल यांनाही अपोलो रुग्णालयात पाचारण करण्यात आले होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. डॉक्टरांनी पत्रकार परिषद घेऊन जयललिता यांचे निधन झाल्याचे अधिकृतपणे जाहीर केले. 
 

वेबदुनिया वर वाचा