‘आयआरसीटीसी’ने तात्काळ तिकीट आरक्षित केल्यानंतरच्या पेमेंटसाठी एक नवा पर्याय दिला आहे. याआधी हा पर्याय केवळ तात्काळ तिकीट आरक्षित न करणाऱ्या प्रवाशांसाठीच उपलब्ध होता. मात्र आता या पर्यायाचा वापर तात्काळ तिकीट आरक्षित करणाऱ्या प्रवाशांनाही करता येईल. यामुळे तात्काळ तिकीट आरक्षित केल्यानंतर पैसे भरण्यासाठी १४ दिवसांची मुदत दिली जाणार आहे. ‘ईपेलेटर’च्या (ePaylater) माध्यमातून ही सेवा पुरवण्यात येणार आहे.
रेल्वेत दररोज तात्काळ तिकीट आरक्षित करण्यासाठी १ लाख ३० हजार व्यवहार केले जातात. तात्काळ तिकीटाचा कोटा सुरु होताच अवघ्या काही मिनिटांमध्ये हे व्यवहार होतात. एसी क्लाससाठी सकाळी १० वाजता तात्काळ तिकिटांचे आरक्षण सुरु होते. तर नॉन एसीसाठीचे तात्काळ तिकीटांचे आरक्षण ११ वाजता सुरु होते. प्रवासाच्या एक दिवसआधी तात्काळ तिकीटांचे बुकिंग सुरु होते. तात्काळ तिकिटाच्या बुकिंगवर कोणतीही सवलत दिली जात नाही. मात्र आता तात्काळ तिकीट आरक्षित करणाऱ्या प्रवाशांना ‘ईपेलेटर’मुळे पेमेंट करण्यासाठी १४ दिवसांचा कालावधी मिळेल.