जगात विश्वासार्ह देशांच्या सरकारांमध्ये भारत तिसरा

केंद्रातील मोदी सरकार हे जगातील विश्वासार्ह देशांच्या सरकारांमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जगातील सर्वाधिक विश्वासार्ह सरकारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये स्वित्झर्लंड आणि इंडोनेशियातील सरकार अव्वलस्थानी आहेत तर भारत यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे आश्चर्यकारकपणे जगातील सर्वात शक्तीशाली देशात सत्तांतर घडवून आणून राष्ट्रप्रमुख बनलेल्या अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारवरही अमेरिकन नागरिकांनी पुरेसा विश्वास दाखवलेला नाही.
 
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अहवालानुसार, भारतातील तीन तृतीयांश अर्थात ७४ टक्के भारतीयांनी केंद्र सरकारवर विश्वास व्यक्त केला आहे. यासाठी फोरमने जगभरातील देशांची अर्थव्यवस्था, तेथील राजकीय घडामोडी आणि भ्रष्टाचार मिटवण्यासाठी केलेल्या उपाययोजना यांचा निकष लावला आहे.
 
जगातील इतर देशातील सरकारांच्या विश्वासार्हतेबाबत ग्रीसची परिस्थिती भयावह आहे. कारण या देशातील केवळ १० नागरिकांनीच देशाच्या सरकारवर विश्वास व्यक्त केला आहे.
 
विश्वासार्ह सरकारांच्या यादीमध्ये अनुक्रमे स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, भारत, ल्युक्झेंबर्ग, नॉर्वे, कॅनडा, तुर्की, न्युझीलंड, आयर्लंड, नेदरलँड, जर्मनी, फिनलँड, स्वीडन, डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा क्रमांक लागतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती