भारताने तांदूळ निर्यातीवर घातली बंदी, अमेरिकेत तांदळाचे भाव गगनाला भिडले

सोमवार, 24 जुलै 2023 (07:05 IST)
भारत सरकारने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.
त्यामुळे अमेरिकेसारख्या देशात तांदळाच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत.
परदेशात राहणारे भारतीय तांदूळ खरेदीसाठी लांबच लांब रांगा लावत असल्याचं सांगितलं जात आहे.
20 जुलै रोजी केंद्र सरकारने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, "भारतीय बाजारपेठेत बिगर-बासमती पांढर्‍या तांदळाची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि देशांतर्गत बाजारपेठेतील किमतीतील वाढ कमी करण्यासाठी, या तांदळाच्या निर्यातीवर तात्काळ बंदी घालण्यात आली आहे."
 
दरम्यान, अन्न सुरक्षेच्या आवश्यकतेनुसार केंद्र सरकारने परवानगी दिलेल्या देशांना निर्यात करण्यासाठी सूट देण्यात आली आहे.
 
भारतातील तांदळाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत्या. गे्लया एका वर्षात तांदळाच्या किरकोळ किंमतीत 11.5 टक्के आणि गेल्या एका महिन्यात 3 टक्क्यांनी वाढ झाल्याचं केंद्र सरकारने सांगितलं आहे.
गेल्यावर्षी रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे जगभरात अन्नधान्याच्या किमतीत मोठी वाढ झालीय.
 
आंतरराष्ट्रीय बाजारत तांदळाच्या निर्यातीत 40 टक्के वाटा भारताचा आहे.
 
सध्या भारताने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर घातलेल्या बंदीमुळे अन्नधान्याच्या किंमती आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
 
‘अमेरिकेत तांदळाचे भाव दुपटीने वाढले’
टेक्सासमध्ये राहणाऱ्या बालनागम्मा सांगतात की भारत सरकारने घातलेल्या तांदूळ निर्यात बंदीमुळे अमेरिकेतील बहुतांश राज्यांमध्ये तांदळाच्या किमती वाढल्या आहेत.
 
“भारत सरकारने बंदी घालण्यापूर्वी 10 किलो तांदळाची किंमत 20 डॉलर (1639 रुपये) होती. आता ती 30 डॉलर्स ( 2459 रुपये) पर्यंत वाढलीय. लोकांना तांदूळ खरेदीसाठी दुकानांच्या दारात लांबच लांब रांगा लावून थांबावं लागतंय,” असं त्यांनी सांगितलं.
 
आपल्याकडे आता महिनाभर पुरेल इतकाच तांदूळ उरला असल्याचं आहे बालनागम्मा सांगतात.
 
“आमच्याकडे सध्या 10 किलो तांदूळ आहे. हे एका महिन्यासाठी पुरेसे असेल. भारत सरकारची ही बंदी अजून किती दिवस चालू राहील हे माहीत नाही.
 
याआधी भारत सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती तेव्हा पण आंतरराष्ट्रीय पातळीवर गव्हाची किंमत वाढली आणि तुटवडा निर्माण झाला होता, असं बालनागम्मा यांनी बीबीसीला सांगितलं.
 
वॉशिंग्टनमध्ये राहणाऱ्या दिनेशनेही ही बाब सांगितली. “दोन दिवसांपूर्वी मी 24 डॉलरला 10 किलो तांदूळ विकत घेतला. सध्या 5 किलो तांदूळ 20 डॉलरला विकला जातोय. ते खरेदी करणे देखील सोपे नाही. कारण तुम्हाला 30 ते 60 मिनिटे रांगेत थांबावे लागते.”
 
अमेरिकेत काही ठिकाणी तांदळाचे भाव जवळपास दीडपट वाढले आहेत. तेही मिळेल की नाही या भीतीने लोक मोठ्या प्रमाणात तांदूळ खरेदी करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
 
अमेरिकेतील भारतीय इटालियन तांदूळ खूप वापरतात. पोन्नी तांदूळ, सोनमसूरी यांसारख्या जातीही विकल्या जातात. सध्या या तिन्ही प्रकारच्या तांदळाची तीव्र टंचाई आहे.
 
तांदळाच्या किमती वाढू नयेत म्हणून भारताने गेल्या वर्षी 8 सप्टेंबर रोजी बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर 20% निर्यात कर लादला होता.
 
पण सप्टेंबर 2021 ते मार्च 2022 च्या तुलनेत सप्टेंबर 2022 ते मार्च 2023 या कालावधीत तांदूळ निर्यात 33.66 लाख मेट्रिक टन वरून 42.12 लाख मेट्रिक टन पर्यंत वाढली आहे.
 
चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जून या कालावधीत भारतातून 15.54 लाख मेट्रिक टन तांदूळ निर्यात करण्यात आला आहे.
 
गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत हे 4 लाख मेट्रिक टन जास्त आहे.
 
विशेष म्हणजे भारताच्या तांदूळ निर्यातीमध्ये बिगर बासमती पांढर्‍या तांदळाचा वाटा 25% आहे. तर भारत 140 देशांमध्ये तांदूळ निर्यात करतो आणि जगातील तांदूळ निर्यातीत भारताचा वाटा 40 टक्के आहे.
 
भारतानंतर थायलंड, व्हिएतनाम, पाकिस्तान आणि अमेरिका हे तांदूळ निर्यात करणारे देश आहेत.
 
2022 पर्यंत जागतिक तांदूळ निर्यात 5.54 कोटी टन झाली. त्यापैकी 2.22 कोटी टन एकट्या भारतातून निर्यात झाले.
 
यामध्ये बिगर बासमती तांदूळ 1.8 कोटी टन आहे.
 
तांदूळ निर्यात बंदीतून कोणाला सूट दिली जाईल?
अन्न सुरक्षा आवश्यकतांनुसार केंद्र सरकारने परवानगी दिलेल्या देशांना निर्यात करण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत.
 
याचा अर्थ असा की ज्या देशांची पौष्टिक, सकस अन्नाची मागणी पूर्ण करण्यात तूट आहे त्यांना त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी तांदूळ निर्यात बंदीतून सूट दिली जाईल.
 
अशा अन्न सुरक्षेच्या गरजेच्या आधारावर केंद्र सरकार परवानगी देते अशा कोणत्याही देशांना तांदूळ निर्यात करण्यावर कोणतेही बंधन नाही.
 
तसेच ही अधिसूचना प्रसिद्ध होण्याच्या कालावधीत जहाजांवर भरलेल्या मालाच्या निर्यातीलाही सूट देण्यात आली आहे.
 
तुलसी एक्झिम इंटरनॅशनलचे थमराय कन्नन सांगतात की ऑस्ट्रेलियातील दुकानात तांदूळ मिळानासे झाले आहेत
 
“मी सिडनीमध्ये राहतो आणि तांदूळसारख्या अनेक भारतीय उत्पादनांची ऑस्ट्रेलियाला आयात करतो. जेव्हा भारत सरकारने तांदूळ निर्यातीवर बंदी घालण्याची घोषणा केली तेव्हा लोकांनी येथे तांदूळ खरेदी आणि साठवणूक करण्यास सुरुवात केली. आम्ही पुरवठा करणाऱ्या दुकानांना भाव न वाढवता तांदूळ पुरवठा केला.
 
“त्यामुळे ऑस्ट्रेलियात तांदूळ चढ्या भावाने विकला जात नाही. पण सध्या एकाही दुकानात तांदळाचा साठा नाही. सर्व विकले गेले. काल आमच्या गोदामात 90 टन तांदूळ होता आणि आता तो सर्व विकला गेला, असं कन्नन सांगतात.
 
पण नजीकच्या काळात ऑस्ट्रेलियातही तांदळाच्या किमती वाढू शकतात, असं कन्नन यांना वाटतं.
 
“भारत सरकारची बंदी किती महिने टिकेल हे मला माहीत नाही. ऑस्ट्रेलियात मोठ्या प्रमाणात तांदूळ विकला जातो. जास्त मागणीमुळे तांदळाच्या किमती दीड ते दोन पटीने वाढू शकतात,” असंही कन्नन यांनी पुढं सांगितलं.
 
ऑस्ट्रेलियात येणाऱ्या भारतीयांची संख्या वाढली आहे. आधी कन्नन तांदळाचा एकच कंटेनर आयात करायचे. नंतर ते दोन कंटेनर आयात करू लागले. पण गेल्या काही काळापासून ते तीन कंटेनर तांदूळ आयात करत आहे.
 
Published-By Priya dixit

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती